श्री सुहास सोहोनी
विविधा
☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆
हो!! ब्यायशी वर्षं पूर्ण झाली अलिकडेच! दोन-चार दिवसांपूर्वीच. मुलांनी अगदी झोकात वाढदिवस साजरा केला! या वयापर्यंत पौर्णिमेचा चंद्र हजार वेळा येऊन गेलेला असतो आयुष्यात, असं म्हणतात. मी काही एवढं गणित मांडून बसत नाही. खूप नातेवाईक, मित्र सुद्धा आले होते शुभेच्छा द्यायला. खरंच कौतुक वाटतं सगळ्यांचं.
खरं म्हंजे आता डोळे दमलेत. नजर अर्धीमुर्धी शिल्लक आहे. भुरकट, मळकट दिसतं सगळं. डोळ्यांना पाणी येत रहातं सारखं सारखं. पण अंदाजपंचे माणूस ओळखतो!
आं? काय? काय म्हटलंत? काऽऽऽन होय!! आता काय सांगणार कानांचं?? एव्हांना तुम्हालाही कळलंच असेल. आता काप गेले आणि भोकं ऱ्हायली! तुम्ही बंड्या म्हणायचं आणि आम्ही खंड्या ऐकायचं!! इतकंच! हा हा हा!
दांत कधीच गळून पडलेत. बोळकं झालाय् तोंडाचं. पण हिरड्या इतक्या टणक, की काहीही चावून खातो! अगदी पोळी-भाकरी सुद्धा. दाणे खावेसे वाटले, तर कुटून खातो. पण कुटाला दाण्याची चव नाही. कोवळ्या बारिक चिंचा सुद्धा खातो. दांत नसल्यामुळे ते आंबायचा तर प्रश्नच नाही. काय ते? कवळ्या नां? केल्यात ना. पण मला त्या कवळ्यांचं तंत्र कधी जमलंच नाही. पुढे देखिल जमेल असं वाटतं नाही. बोलतांना तोंडाच्या बाहेर पटकन उडी मारेल की काय, अशी भीती वाटते! आणखी म्हणजे कवळीच्या आतमधे कण अडकतात अन्नाचे आणि हिरड्यांना टोचतात!! मग जेवतांना कवळी तोंडाबाहेर काढायची, मिचमिच्या डोळ्यांनी बघत फडक्याला पुसायची आणि पुन्हा तोंडांत कोंबायची – म्हणजे इतरांना घाण वाटते!! आणि आपल्याला स्वतःला सुद्धा. घाण पण आणि लाज पण! असो.
कवळी म्हटल्यावर एक गंमतीची मजा आठवली. आम्ही तिसरी-चौथीत असतांना आम्हाला वाठारे या नांवाचे एक वयस्कर पण हिंस्त्र मास्तर शिकवायला होते. यम परवडला! एकदा ते बोटीने मुंबईला चालले होते. त्यांना बोट लागली. बोटीच्या काठावरून समुद्रात उलटी करतांना त्यांची कवळी सुद्धा समुद्रात पडली! फजितीच की! नंतर मास्तरांच्या तोंडाच्या चिपळ्या झाल्या. आम्हाला खूप मजा वाटायची. पण हसायची भीती! आता आज तो सण साजरा करतो!
हा हा हा!!
हात-पाय ना? ते तर कायमचेच संपावर गेलेत! भारी दुखतात!! कोणाला सांगणार तेल लावून चोळायला? हल्ली लोकांना नसतो वेळ! मग आपलं आपणच लावायचं! पायांना जरा बरं वाटतं आणि हातांना चांगला व्यायाम होतो! बोटं दुखतात बऱ्याच वेळा हातांची. पण आपल्या हाताचा पंजा कॉटवर पालथा टाकून त्याच्यावर आपलंच बूड टेकून पाच-दहा मिनिटं बसलं ना की बरं वाटतं, असा मला शोध लागलाय्!
स्मरणशक्ती तशी ठीक आहे. जुनं जुनं अजून सगळं आठवतं. पण नवीन विसरायला होतं. समोरच्याचा चेहरा काहीसा लक्षात असतो, पण त्याचं नांव जाम आठवत नाही! एखादं पुस्तक आणायला कपाटाच्या खोलीत जातो, पण खोलीत गेल्यावर आपण इथे कशाला आलो होतो, हे जंग जंग पछाडूनही डोक्यात येत नाही! अशा वेळी पूर्वी मी स्वतःवरच चिडायचो. पण आता माझं मलाच हसायला येतं!
पण हे तर आता असंच चालायचं. यंत्राचे भाग झिजायचेच. निकामी व्हायचेच. असो. पण काही वेळा माझं मलाच आश्चर्य वाटतं. नीट, निरोगी जगायला आवश्यक असलेल्या गोष्टी नसून सुद्धा, मी ब्यायशीची वेस ओलांडली. यानं मी तर अचंबितच होतो!
एक गोष्ट मात्र खरी. आज मितीपर्यंत आजारपण असं कधी आलंच नाही. हा नशिबाचा भाग. कधी तरी सटीसामाशी सर्दी होते. पण मी बिंधास गोळी घेतो. गोळी घेतली तरी सर्दी जायला दोन-तीन दिवस जातातच, हे गृहितच धरायचं.
मन आणि बुद्धी अजून शाबूत असावी असं वाटतंय्! काय सांगावं? स्वतःला स्वतःचाच भास नसेल ना होत? कधी कधी मनांत विचार येतो –
शंभरी गाठेन कां?
काही माहीत नाही!
कोणालाच माहीत नसतं!!
शंभरी गाठण्याची दुर्दम्य इच्छा वगैरे काहीही नाही. आज्ञा आली की आनंदानं प्रस्थान ठेवायचं!
गाडी जोपर्यंत स्वतःहून चालत आहे तोपर्यंत चालावी.
ढकलायची वेळ येऊ नये. तशी वेळ येणार असली तर तिन स्वतःहूनच स्तब्ध व्हावं, अशी मात्र
दुर्दम्य इच्छा आहे!
ॐ शांती.
? ? ?
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈