सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ दैवजात दुःखे भरता ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
प्रख्यात कवी, पटकथा, संवाद व लेखक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते सर्वांचे लाडके ग.दि.मा.. गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये शेटफळ येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे बालपण अतिशय गरीब व प्रतिकूल परिस्थितीत गेले. वयाच्या सोळाव्या, सतराव्या वर्षी त्यांनी मराठी साहित्यीक क्षेत्रात प्रवेश केला आणि बघता बघता सम्राट पद प्राप्त केले. कथाकार, पटकथाकार, संवाद लेखन, गीतकार अभिनेता, निर्माता या सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर होता. त्यांनी 157 पटकथा लिहिल्या आणि 2000 पेक्षा जास्त गाणी लिहिली.
माडगूळ येथे बामणाचा पत्रा तेथे त्यांनी बरेच लेखन केले. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस ,चैत्रवन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.
1969 मध्ये “पद्मश्री”किताब देऊन त्यांना गौरविले गेले. 1971 मध्ये यवतमाळ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषवले.
त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले असले तरी ते कवी च होते., त्यांना शब्दाची अडचण भासली नाही. त्यांच्या काव्य रचनेला दाद मिळाली. पण गीत रामायण या काव्याने किर्तीचा कळस गाठला आणि “आधुनिक वाल्मिकी”म्हणून त्यांचीनवीन ओळख झाली. वाल्मीकि रामायणात वाल्मिकींनी 28000 श्लोकात राम कथा लिहिली. याच श्लोकावरून माडगूळकरांनी राम कथा ५६ गीतात शब्दबद्ध केली. गीत रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच कवीने वर्षभर रचले ,एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केले आणि हाच गीत रामायण कार्यक्रम पुणे आकाशवाणी केंद्रावर वर्षभर चालला. गीत रामायणातील बरीच गीते ८-१०-१२-१४-१६ कडव्यांची आहेत. सर्वच गाणी सुंदर आहेत पण”पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”हे गीत मला विशेष आवडते. ह्या गीतात अयोध्येत परत येण्यासाठी आग्रह करणाऱ्या भरताचे राम सांत्वन करतात व त्याला जीवनाचे सत्य उलगडून सांगतात. थोडक्यात मानवी जीवनाचे सार या गीतात सांगितले आहे.
दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात
राज्यत्याग कानन यात्रा सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःखेयेतात, बऱ्याच वेळा मुलाला आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नाही तेव्हा त्यात आई-वडिलांचा दोष असतो असे नाही. प्रत्येकाच्या नशिबात जे घडणार असते तसेच घडते .आपल्यावर अन्याय झाला तरी मर्यादा न सोडता संयमाने वागले पाहिजे ही शिकवण मिळते.
जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात?
प्रत्येकाला बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था येणार आणि शेवटी मरण हे अटळ आहे., जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोणाची सुटका होत नाही. त्यासाठी दुःख करण्यात काहीच अर्थ नाही. आलेल्या परिस्थितीत हतबल न होता धैर्याने सामोरे गेले पाहिजे.
दोन ओंडकयांची होते सागरात भेट
एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही भेट
क्षणिक तोचि आहे बाळा मेळ माणसाचा
सागरात दोन ओंडकयांची भेट होते पण पाण्याच्या प्रवाहाने त्यांच्या दिशा बदलू शकतात. आजच्या जीवनात असेच घडत असते ना! मनुष्य आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कधी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यात काही लोकं भेटतात, काही दिवस, काही वर्ष आपल्या सहवासात राहतात पण काही कारणाने दुरावतात, दूर जातात ,भूतकाळात जातात माणसं मौल्यवान असतात जोपर्यंत ती सहवासात आहेत तोपर्यंत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, त्यांना फोन करा, त्यांना भेटा.
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ दे कृतार्थ
माणसाने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे त्याची पूर्तता करून आयुष्य जगले पाहिजे.
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈