सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ दिवाळीची सांगता… ☆ सौ राधिका भांडारकर  

चार दिवसांची दिवाळी.धामधूमीत आली आणि गेलीही.

खप्पून ,पूर्वतयारी करून केलेले फराळाचे भरले डबे तळाशी गेले.रांगोळीतले रंग भुरकटले .तेलवातीत भिजलेल्या पणत्या गोळा करून ठेवल्या. काही दिवसांनी आकाश कंदीलही उतरवले जातील.ईलेक्ट्रीकच्या माळा गुंडाळून पुढच्या दिवाळीपर्यंत नीटनेटक्या कपाटात ठेवल्या गेल्या.

अंगणातला फटाक्यांचा ,धूम्मस वास असलेला कचराही गोळा करुन झाला..

गॅलरीतल्या एका टाईलवर सारवलेला गेरु मात्र होता.

कसा रिकामा ,रंगहीन दिसत होता.सकाळी झाडपूस करणारी बाई मला विचारत होती,”अव ताई पुसु का आता हे तांबड..?लई वंगाळ दिसतय्…”

मी म्हटलं,”पुस बाई..झाली आता दिवाळी….”

करोना,सुरक्षित अंतर,भयभीत मने या सगळ्या पार्श्वभूमीवरही प्रत्येकाने आपापली दिवाळी साजरी केलीच.अंधारावर मात करणारा प्रकाशाचाच सण …

धाग्यांच्या गुंतागुंतीत एखादा कलाबुतीचा तार कसा चमकून जातो ना …तशीच या दिवाळीनं चमक आणली…

चार दिवसांचे चार सोहळे..गायीला घास भरवला,धनाची पूजा केली,लक्ष्मीलाही पूजलं,रूपकात्मक नरकासुराचाही वध केला,ईडा पीडा टळो,बळीचं राज येवो,असा गजर केला,सहजीवनाची आनंद औक्षणे केली, आनलाईन भाऊबीजही साजरी केली..तेल ऊटणे सुगंधी साबणांनी स्नानं ऊरकली… रांगोळ्यांनी दार सजले.

फुलांच्या तोरणांनी चौकट नटली..कोपरा न् कोपरा प्रकाशानं ऊजळवला…झुमवर सगळं गणगोत गोळा झालं..व्हर्चुअल फराळ .व्हर्चुअल फटाके…शुभेच्छा ,आशिर्वाद. सगळं सगळं आॅनलाईन…

कसं असतं ना ,मनुष्यप्रवृत्ती मूळातच आनंद साजरा करणारी असते.भले आनंदाची माध्यमे बदलोत पण हेतु नाही बदलत…दिवाळी हा तर आनंदाचा, प्रकाशाचा,
स्नेहबंधनाचा ,स्नेहवर्धनाचा सण!!

शिवाय या सणांत निसर्ग,देवदेवता ,पशुपक्षी झाडंपानं सार्‍यांचं संवर्धन असतं…आपल्या संस्कृतीत केरसुणीलाही लक्ष्मी मानून तिचीही पूजा केली जाते.

यामागचा संदर्भ खूप अर्थपूर्ण आहे…चराचरात लहान थोर असं काही नसतं…मनातली विषमता दूर करुन सार्‍यांना सामावून घ्यायचं असतं… एका वातीनं दुसरी वात पेटते म्हणूनच तेलाचा दिवा पूजनीय…

मनातल्याच आसुरांचा संहार करायचा…नको लोभ,नको स्वार्थ..नको हिंसा नको असत्य…नको द्वेष नको मत्सर..असुया…वृद्धी प्रेमाची ,स्नेहाची..परोपकाराची व्हावी..
दिवाळी म्हणून साजरी करायची…

दिवाळी आली,संपली पण जाताना याच जाणीवा देऊन पुन्हा येण्यासाठीच परतली…

कवीवर्य ना.धो.महानोर परवा म्हणाले,

“मोडलेल्या माणसांचे..

दु:ख ओले झेलताना..

त्या अनाथांच्या ऊशाला..

दीप लावू झोपतांना..।।

दिवाळीची सांगता करताना याच ओळी सोबत रहाव्यात…

शूभ दीपावली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments