सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
हवीहवीशी वाटणारी थंडी आणि उत्साहवर्धक वातावरण ही डिसेंबर ची खास वैशिष्ट्य. डिसेंबर मध्ये रानमेव्याची सुद्धा लयलूट असते . त्यामुळे भाजीपाला आणि फळफळावळ ह्यांची पण चंगळ असल्याने हा काळ खूप संपन्न वाटतो. बोरं,गाजरं,हरबरा, ऊस,वाटाणा, वाल,अंबाडीची बोंड,भरताची वांगी ह्यांनी जेवणाचे चार घास जरा जास्तच जातात आणि मग ह्या अशा सकस घरी केलेल्या पदार्थांवर ताव मारल्याने जरा थोडसं वजन हे वाढतंच आणि त्या वाढत्या वजनाचा दोष मात्र आपल्या माथी येतो.बरं एकदा हिवाळ्यात वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी होईल अस म्हणता का, तर अजिबात तसूभरही वजन कमी होण्याचं मुळी नावच घेत नाही.
डिसेंबर महिना अजून एका गोष्टीसाठी आवडतो. दत्तजयंती ! उत्साहात साजरा होणारा एक उत्सव. जसजसं आयुष्य पुढेपुढे जातं तसतसे नवनवीन अनुभव गाठीशी लागत असतात. काही भले तर काही बुरे. भले अनुभव लक्षात ठेवावे आणि बुरे अनुभव तेथेच विसरून सोडून द्यावे. दरवर्षी संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जाणे व्हायचे नाही फक्त दत्तजयंती ला मात्र न चुकता मंदिरात जायचे. ह्यावर्षी मात्र हा संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जावसं आपणहून वाटलं. त्यामुळे रात्री बँकेतून आल्यावर दत्तगुरुंच्या दर्शनासाठी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात जायचे. दिवसभराचा सगळा शीण,मरगळ ह्या दर्शनाने कुठल्याकुठे गायब व्हायची.त्या मंदिराच्या शांत,पवित्र वातावरणाच्या परिसरात रात्री भक्तीसंगीताचे सुमधुर सूर कानात साठवत दोन घटका तेथे टेकल्यानंतर एका अतीव शांत, समाधानी वृत्तीची अनुभूती मिळायची.
ह्यावेळी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात काही काळ घालवतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दत्ततत्वाने भारलेल्या परिसरात आपण वास्तव्य करतांना आपोआप एक प्रकारचा अलिप्तपणा,निर्मोही वृत्ती मनात ठसायला लागते. मोह,लालसा काही क्षण का होईना मनातून हद्दपार झाल्यागत वाटतं.जणू कमळाच्या पानावरील दवबिंदू आपल्यात वास करीत असल्याचा अनुभव येतो. जसं कमळा च्या पानावरील थेंबाच अस्तित्व तर असतं पण तो थेंब मात्र कुठल्याही गोष्टी ला न चिकटता अलिप्त होऊन जगतो.
ह्या महिन्यात बहुतेकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान असलेल्या श्री.दत्तगुरुंची जयंती.मार्गशीर्ष पोर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तगुरुंचा जन्म झाला. आपले प्रमुख चार अवतारी दैवत असलेल्या दैवतांपैकी श्री दत्तगुरुंचा जन्म संध्याकाळी सहाचा तर शक्तीचे दैवत मारुतीरायांचा जन्म पहाटे सहाचा, श्रीरामचंद्रांचा जन्म दुपारी बारा तर कृष्ण जन्म रात्री बाराला साजरा केल्या जातो.
दत्तजयंती ला “दत्ततत्व”हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक कार्यरत असते.म्हणून ह्या दिवशी दत्तगुरुंची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो अशी आख्यायिका आहे.दत्तात्रयांच्या हातातील जपमाळ ब्रम्हदेवाचे शंखचक्र श्री विष्णूंचे,तर त्रिशूळ डमरू हे भगवान शंकराचे प्रतीक समजल्या जातं.दत्तजन्माच्या सात दिवस आधीपासूनच गुरुचरीत्राचे पारायण करायला सुरवात केली जाते.
श्री दत्तगुरुंच्या प्रमुख अवतारांपैकी पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ,दुसरा अवतार नृसिंह सरस्वती तर तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांचा मानला जातो.
आपल्या भागातील जागृत देवस्थांनां विषयी आपल्या मनात काकणभर श्रद्धा जरा जास्तच असते त्यामुळे मला अमरावती जवळील कारंजा आणि झिरी ही दोन्ही ठिकाणं जरा जास्तच जवळची आपली वाटतात.
बडने-या जवळच दोन किमी. वर “झिरी”नावाचे दत्तगुरुंचे जागृत देवस्थान आहे. काही ठिकाणं,काही स्थानचं अशी असतात की प्रत्यक्ष परमेश्वर तेथे वास करीत असतील असं आपल्याला मनोमन जाणवतं.झिरी येथील पवित्रता परमेश्वराच्या अस्तित्वाची ग्वाही देत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं झिरीचे दत्तमंदिर हे मानसिक स्वस्थता, शांतता,तृप्ती, व समाधान देणा-या स्थानांपैकीच एक.ह्या मंदिरातील शांत,हसरी,तेजस्वी मुर्ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा, संकटातही तारुन नेणारे पाठबळ आणि कितीही संपन्नता असली तरी जमिनीवर दोन पाय घट्ट रोवण्यासाठी आवश्यक असलेली थोडी विरक्ती शिकविते.ह्या मंदिराजवळच एक भव्य असे श्रीराममंदिरही आहे.दोन्ही मंदिरांचा परिसर हा जवळपास सव्वाशे ते दिडशे वयाच्या वटवृक्षांनी घेरलेला आहे. हे धीरगंभीर वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्या आपल्याला चांगल्या सकारात्मक गोष्टी ह्या चिरंतर वा शाश्वत असतात हे शिकवून जातात.
मन ओढ घेऊन दर्शनासाठी जावे असे उद्मेगून वाटणारे दुसरे ठिकाण म्हणजे अमरावती जवळ चाळीस किमीवर असलेले श्री नृसिंह सरस्वतींचे कारजांलाड येथील जागृत देवस्थान. ह्या मंदिरातील प्रसन्न, मानसिक स्थैर्य सकारात्मक ऊर्जा देणारे. ते स्वामींचा प्रत्यक्ष वास असल्याची जाणीव देणारे ते सभागृह.ह्या मंदिरात उपनयन संस्कार करण्यासाठी शुभवेळ
शुभदिवस, शुभघडी हे काहीही बघण्याची गरजच नसते असा समज,अशी श्रद्धा आहे.स्वामींच्या नजरेच्या समोर झालेले उपनयन संस्कार आयुष्यात खूपकाही देऊन जातात असा ब-याच भक्तांचा अनुभव आणि श्रद्धा आहे.
दत्तजयंती च्या निमीत्ताने झिरीला दर्शनासाठी गेल्यावर मंदिराच्या पवित्र वातावरणात आपल्याला आलेले अनुभव आठवतात, आस्तिकता जागृत होते आणि आपोआपच त्याची महती आपल्याला अजून पटायला लागते.आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपली कार्यक्षमता, सकारात्मकता, उत्साह वाढून आपल्यात चुकून शिरलेल्या नकारात्मकतेला पिटाळून लावण्यात होतो.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈