सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

दीप हे अग्नीचे व तेजाचे प्रतिक आहे तर ज्योती हे ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतिक आहे. मानवी  जीवनात दिव्याला फार महत्व आहे. कारण दिवसा तळपणारा सूर्य असतो पण रात्री अंधार नष्ट करण्यासाठी मानव निर्मित दिव्याची गरज असते.

पूर्वी प्रकाशासाठी व कुठेही नेण्याला सोपे असे कंदील, चिमणी वापरली जायची. देवळात काचेच्या हंड्यातील दिवे असायचे तर बाहेर दीपमाळ असते आणि गाभाऱ्यात नंदादीप अखंड तेवणारा!श्रीमंतांच्या दिवाणखान्यात हंड्या, झुंबरे असत. त्यांचा वापर मेणबत्या लावून व्हायचा. समूहासाठी आधी मशाली मग बत्त्या, नंतर पेट्रोमॅक्स चे दिवे आले. कंदील कालबाह्य झाले तसं घरोघरी विजेवर चालणारे दिवे आले. त्यांच्या अनिश्चिततेमुळे emergency दिवे, मेणबत्या आल्या. आता तर सोलर दिवे वापरात आले आहेत.पूर्वी सजावटीसाठी आधी तेलाच्या पणत्या, मग मेणाच्या पणत्या, अलिकडे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या, विविध आकारातल्या लाईट च्या, LED च्या माळा असतात.

अर्थात दिव्यांचे प्रकार, नमुने, त्यांचं सौंदर्य यात विविधता असली तरी त्यांची गरज बदलली नाही व आपली संस्कृतीही बदलली नाही.आजही तिन्हीसांजेला ‘दीपज्योती नमोस्तुते ‘ म्हणत देवघरात समई लावली जाते, तुळशीसमोर दिवा ठेवला जातो. कांहीही म्हणा पण तेल, तूप यात तेवणारी मंद ज्योत जी प्रसन्नता, मंगलता, सात्विकता, शुभकारकता यांची अनुभूती देते ती दुसरी कोणतीही ज्योत देऊ शकत नाही.आपण नकळत तिच्यासमोर नतमस्तक होतो.

आपल्या संस्कृतीत दीप प्रज्वलनाला फार महत्व आहे. दिवा तमनाशक असल्याने तो प्रकाशाची आस जागवणारा, ऊर्जा देणारा, शुभकारक!म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करतात. कोणतीही पूजा पूर्ण होईपर्यंत तेलाचा व तुपाचा दिवा तेवत ठेवलेला असतो. षोडशोपचारे पूजा करताना शंख, घंटा, कलश याबरोबर दिव्याची ही पूजा करतात. नवरात्रासारख्या कुळाचाराच्या वेळी किंवा अनुष्ठानाच्यावेळी अखंड दीप, नंदादीप ठेवला जातो. आषाढ अमावस्या दिव्याची अवस म्हणून साजरी केली जाते. दीपावली सारखा दिव्याचा सण साजरा करतो. दीप- आवली, म्हणजे दिव्यांची ओळ! कार्तिक पौर्णिमेला पाण्यात दिवे सोडले जातात.

तसं पाहिलं तर हिंदू संस्कृतीत अग्निलाच खूप महत्व आहे. तो अग्नेय दिशेचा रक्षक असून पंचमहाभूतांपैकी एक आहे. इंद्राखालोखाल महत्वाचा देव अग्नि आहे. हिंदू संस्कारात नामकरणापासून मृत्यूपर्यंत सगळे संस्कार अग्निच्या साक्षीने होतात. फक्त नामकरणादिवशी होम नसतो पण तेलाचे दिवे लावले जातात. अग्नि ही उर्जा असल्याने निर्मिती, पोषण, नाश सर्वांना कारणीभूत आहे. म्हणून अग्नि हा परिवर्तनशील मानतात. गर्भ निर्मिती करतो, पोषणाने त्याचे बाल्यात, मग शैशवात , तारुण्यात , गृहस्थात परिवर्तन करतो आणि  शेवटी देहाचा नाश करून मुक्त आत्म्याला  दुसऱ्या देहात परिवर्तीत करतो. कांही घरात संध्याकाळी अग्निहोत्र करतात. अग्निद्वारे होमातील आहुती देवांपर्यंत पोचविल्या जातात. होळीदिवशी अग्नीची पूजा केली जाते.

दिव्याचा एक प्रकार रोजच्या वापरातला म्हणजे निरांजन!निरांजन हा शब्दच किती शांत, मृदू, नि वत्सल आहे.मूळ शब्द निरंजन, निः + अंजन, पवित्र, निष्कपट, काजळी न धरणारे, शुभकारक, सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांचे वहन करणारे!

आपल्याकडे ज्या ओवाळण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्या सविस्तर सांगणार आहे कारण सिरीयल मधलं ओवाळणं पाहून हीच खरी पद्धत आहे असं वाटायला लागलंय.आपण

देवाला ओवाळतो त्याला देवाची आरती म्हणतात. आरतीसाठी ताम्हनात दोन निरंजने ठेवावी, त्यात तुपाच्या दोन दोन फुलवाती(फुलासारख्या दिसणाऱ्या कापसाच्या तयार केलेल्या )घालव्यात. कापूर घालून कापुरारती ठेवावी व अक्षता ठेवाव्या. आपण आरतीतून देवाची स्तुती करतो व त्याच्याकडे आशीर्वाद मागतो. त्यामुळे आरती करताना ज्या देवाची आरती करणार असू त्या देवावर अक्षता टाकायच्या व ओवळायचं. आरती झाली कि ज्योतीत जे तेज येतं किंवा देवाचा आशीर्वाद येतो, तो उपस्थित सर्वांना मिळावा यासाठी आरतीचं ताट फिरवतात. सगळे ओंजळीने ते तेज घेऊन मस्तकावरून तो हात फिरवतात. आरतीचं ताम्हन परत देवासमोर ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवतात. बऱ्याचवेळा आरती नंतर मंत्रपुष्प म्हणतात त्यावेळी उपस्थितांना फूल व अक्षता किंवा नुसत्या अक्षता देतात. उजव्या हातात अक्षता ठेवून त्यावर डावा हात झाकावा. म्हणजे त्या अभिमंत्रित होतात अशी कल्पना. मंत्रपुष्प झाल्यावर त्या अभिमंत्रित अक्षता देवावर वाहून नमस्कार करावा. कधी कधी निरंजना ऐवजी पुरणाचे पाच दिवे करून त्यात तुपाच्या पाच वाती लावून देवाची आरती करतात. नंतर कांही लोकांच्यात त्या पुरणाच्या आरतीने घरातल्या मुलांना ओवाळतात.ज्योतीमधील देवाचा आशिर्वाद मुलांना मिळावा यासाठी, (इथे सुपारी फिरवत नाहीत ) कारण हे ओवाळणे बहुधा श्रावण शुक्रवारी करतात त्यावेळी  आपण ज्या जीवतीच्या कागदाची पूजा व आरती करतो ती लहान मुलांचं रक्षण करणारी आहे.

अक्षताही पवित्र व सकारात्मकता वाहणाऱ्या मानतो. मूळ शब्द अक्षत, म्हणजे छिद्र किंवा जाळी नसलेला, म्हणून अक्षता करण्यासाठी अखंड तांदूळ घेऊन त्याला तेलाचा हात लावून कुंकवाने लाल करतात. तसेच फक्त देवाची पूजा, आरती करताना तूप व फुलवाती लागतात. एरवी केंव्हाही निरांजन किंवा दिवा, समई लावताना तेल व वळलेल्या वाती लागतात.

जेंव्हा आपण माणसांना ओवाळतो त्याला औक्षण म्हणतात. औक्षण म्हणजे आशिर्वाद देणे, दृष्ट काढणे.उदा. वाढदिवस, यासाठी ताम्हनात दोन निरांजने घ्यावीत, त्यात वळलेल्या वाती, प्रत्येक निरांजनात दोन दोन च्या दोन, अशा एकूण आठ वाती व तेल घालतात. ताम्हनात अक्षता व सुपारी ठेवावी. सोन्याची अंगठी प्रत्येक घरात असेलच असे नाही त्यामुळे ती हौस म्हणून असेल तर घ्यावी. महत्व सुपारीला आहे.ज्याचं औक्षण करायचं त्याला उभं किंवा गोल (मुलगा, मुलगी याप्रमाणे )कुंकू लावावे.हे मात्र कुठल्याही प्रसंगी ओवाळताना लावावे.मुलाला उभे कुंकू लावणे यालाच नाम ओढणे म्हणतात. मग डोक्यावर अक्षता टाकून एकदा ताम्हन गोल फिरवावे,हातात सुपारी घेऊन ओवाळणाऱ्याने आपल्या डाव्याबाजूने उजवीकडे अर्धगोलात सुपारी फिरवावी व ताम्हनात टेकवावी, मग उजवीकडून डावीकडे ताम्हनात टेकवावी व शेवटी आणखी एकदा डावीकडून उजवीकडे आणून ताम्हनात ठेवावी. त्यापूर्वी कांही ठिकाणी सुपारी व अंगठी कपाळाला लावतात. हे औक्षण आशीर्वादाचे असल्यामुळे मोठ्यानी छोट्याना ओवाळायचे असते. याशिवाय गणपती, गौर आणणाऱ्यालाही पायावर दूध पाणी घालून दारातून आत आल्यावर ओवाळतो. तेंव्हा आशिर्वाद द्यायचा नसल्याने सुपारी फिरवत नाहीत फक्त दोनदा अक्षदा टाकून ताम्हन फिरवतात. कदाचित ते फक्त देवाचं स्वागत असावं. असं ओवाळून स्वागत, जिंकून आलेल्या व्यक्तीचं दारात करतात.

भाऊबीज, रक्षाबंधन, पाडवा हे नाजूक बंध असणाऱ्या नात्यासाठीचे सण असतात. त्यावेळी ओवाळणी घालणं असल्यामुळे  वयाचा विचार केला जात नाही. ओवाळताना सुपारी फिरवली जात नाही. ज्याला ओवाळतो त्याच्या हातात सुपारी द्यायची व त्याने ती ओवाळणीसह ताम्हनात ठेवायची. ओवाळणी म्हणून एक रुपायचं नाणं सुद्धा चालतं, एकमेकांतलं प्रेम ओवाळणी पेक्षा महत्वाचं असतं.नेहमीप्रमाणे दोनदा अक्षता टाकून ताम्हन फिरवायचं.

मोठ्यांच्या 61,75,81,100 अशा महोत्सवाच्या वेळी वयाएवढ्या वातीनी ओवाळतात, त्यावेळी ओवाळणारे बहुधा त्या व्यक्तीपेक्षा लहानच असतात त्यामुळे फक्त वातींचे ताट फिरवतात.

अर्थात यांसगळ्या गोष्टी श्रद्धेच्याच आहेत. हे असंच का याला तर्कशुद्ध उत्तर देता येणार नाही. कदाचित कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी प्रेम भावनेने जोडून ठेवावं, प्रत्येकाला कुटुंबात कांही विशिष्ट स्थान असावं, कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असावी, घर आनंदी असावं. आपलं कुटुंब कोणत्याही संकटापासून दूरअसावं, एवढाच निर्मळ विश्वास किंवा आशावाद असावा.श्रद्धेचा पाया असला कि नात्यांची इमारत सहज कोसळत नाही. आणि असंच करावं, अशी पद्धत घालून दिली कि आत्मियतेने गोष्टी केल्या जातात.ऊरका पाडून प्रसंगाचं, सणाचं महत्व कमी होऊ नये यासाठीही!

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमम् l

गृहाणं मत्कृतां पूजा, सर्वकाम प्रदो भवः॥

हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामधे उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्विकार कर. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments