सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ दिवाळी–नव्या जाणिवांची ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—६ ?

!! दिवाळी–नव्या जाणिवांची !!

यावर्षी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपण दिवाळीचा सण साधेपणाने पण मनापासून साजरा केला.आनंद घेतला.

मुळामध्ये या सणात धार्मिक अधिष्ठानाबरोबर आपल्या दैनंदिन व्यवहाराची सांगड घातलेली आहे.त्यामुळे लक्ष्मीची पूजा करायची तशीच गाय-वासराची करायची.निसर्गाचे जतन करायचे तसेच आपल्या नात्यांची जपणूक करायची.विजयाचा उत्सव साजरा करायचा तशीच प्रकाशाची उधळण करायची.

दरवर्षी आपण काही संकल्प करतो.काही गोष्टी परंपरा म्हणून,रूढी म्हणून करतो.पण यातल्या किती गोष्टी आपण मनापासून करतो ? किती संकल्प आपण पूर्ण करतो ? याचा ताळमेळ यानिमित्ताने घेतला पाहिजे.याच बरोबर आपल्या आयुष्याचा आढावा घेतला पाहिजे. मागच्या वर्षात किती नवीन नाती जोडली. याचबरोबर जुनी किती नाती दुरावली हेही समजून घेतले पाहिजे.म्हणजे त्याचा पुन्हा ताळमेळ घालणे सोपे होते.

आज बाजारात सर्व काही उपलब्ध आहे. फक्त प्रेमाचे, जिव्हाळ्याचे माणूस मिळत नाही. तेव्हा रुक्ष व्यवहारापायी, मानापमानाच्या गैरसमजुतींपायी जवळ असलेल्या आपल्या माणसांना का दूर करायचे ? प्रसंगी स्वतः कमीपणा घेऊन सुद्धा माणसे जपली पाहिजेत. मग त्यात नातलग, स्नेही, मित्र, शेजारी, सहकारी, कर्मचारी सगळे सगळे येतात.शेवटी आपण एकटे कधीच राहू शकत नाही.त्यामुळे ह्या माणसांची खरी गरज ही आपल्यालाच असते असा विचार दोन्ही बाजूंनी केला गेला तर, आपोआप सर्वच नाती जपली जातील आणि कुणालाही कधी एकाकीपण  जाणवणार नाही. तेव्हा सर्वांनीच आपली सगळीच नाती जपली पाहिजेत.

निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. पूजा-आरास यासाठी पानाफुलांची लूट करायची नाही.स्वच्छतेसाठी पाण्याची नासाडी करायची नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

या सणात दिवे पणत्या यांना खूप महत्त्व आहे.पूर्वी लाईट नव्हती तेव्हा दिवेच पेटवावे लागत. आज-काल लाईटने  अक्षरशः क्रांती केली आहे. लाईटच्या माळा,वेगवेगळे दिवे आपण लावतो.तरीही पणत्या का लावायच्या ? तर हेच या दीपोत्सवाचे सार आहे.दिवा हा चैतन्याची,मांगल्याची उधळण करतो.तेला-तुपाच्या दिव्यांनी तेज पसरते. विजेच्या दिव्यांनी डोळे दिपवणाऱ्या उजेडाचे प्रदर्शन होते. मुख्य फरक म्हणजे हा दिवा असंख्य दिवे पेटू शकतो.लाईटचा दिवा दुसरा एकही दिवा पेटवू शकत नाही आणि हेच या पेटत्या दिव्याचे वैशिष्ट्य आहे.

दिव्याने दिवा पेटविणे यामागे खूप मोठा अर्थ आहे. हा दिवा स्वतः जळून जगाला प्रकाश देण्याची प्रेरणा देतो. आपण आनंदात जपताना इतरांनाही आनंद देणे, त्यांचे जीवन उजळणे हे खूप महत्त्वाचे असते.या दिपावलीतून हा संदेश घेऊन प्रत्येकाने इतरांना साहाय्य करणे, कटूता सोडून सर्वांशी प्रेमाने वागणे, भ्रष्टाचार, व्यसनं, शत्रुत्व यांना कटाक्षाने दूर ठेवणे, निसर्गाचे स्नेहाने जतन करणे यासारख्या गोष्टी जाणीवपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बाहेर तर दिवे पेटवायचेच. पण आपल्या अंत:करणातला दिवा पेटला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, जाणिवा, संवेदना जागृत होतील आणि आपल्याबरोबर इतरांच्या प्रगतीसाठी आपण पुढे सरसावू. आपल्या जागृत मनाला इतरांच्या व्यथा वेदनांची जाणीव होईल.त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ याचा खरा अर्थ समजून सांगणारा ‘दृष्टीदाना’ चा संकल्प या वेळी करायला पाहिजे. आपल्या आयुष्याचा उत्तम तऱ्हेने उपभोग घेतल्यावर, आपल्या पश्चात दोन दृष्टिहीनांच्या नेत्रज्योती पाजळवणारा  हा संकल्प आहे. अशाच पद्धतीने अवयवदानाची संकल्पना सुद्धा आजकाल रुजायला लागलेली आहे.आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचे हे सुंदर मार्ग आहेत.

नवीन वर्ष म्हणजे तरी काय ? वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे निश्चय करायचे,नवीन ध्येय स्विकारायची आणि त्यांच्या पूर्ततेसाठी नव्या उत्साहाने जीवनाला नवा वेग द्यायचा. त्यामुळे आपले मन पुन्हा ताजेतवाने होते.

दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चांगले होण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या त्याच वेळी चांगल्या गोष्टींची सर्वांकडून मनापासुन अपेक्षा करायला काय हरकत आहे ? शेवटी चांगले पेरले तर चांगलेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे.सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

दीपावली ही उजळून जाते

वाट नव्या वर्षाची

अशीच आपुल्या जीवनी यावी

लाट नव्या हर्षाची !!

शुभ दीपावली.  ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
2 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments