सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
कुणाचं नशीब कसं आणि कधी बदलेल ते सांगता येत नाही.
असाच एक घडलेला प्रसंग. रस्त्यात एका झुडुपात एका कुत्रीला चार पिल्ले झाली होती. भुकेने बिचारी खूप रडत होती. ओरडत होती. रस्त्याने जाणारे येणारे फक्त बघून पुढे जात होते. दुसरे दिवशी ही पिलांची आई आली नव्हती. तिचं काय झालं कोण जाणे? पिल्ल सारखी आईसाठी आक्रोश करत होती. हर्षद ने चित्र पाहिले आणि त्याला रहावले नाही. त्याने चारही पिल्ले घरी आणली. घरात कुरबूर झाली. त्यांना दूध दिल्यानंतर ती शांत झाली आणि झोपी गेली. त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवले. त्यांचं काय करायचं ते बघूया, असं ठरलं. पैकी दोन पिल्ले सांभाळायला चांगल्या घरी दिली. उरलेल्या दोन पिलांनी घरातल्या सगळ्यांना जीव लावला. मोठी झाली की राखण करतील असू देत आपल्याकडे असं ठरलं. त्या दोघांचं भाऊ-बहीणीच नामकरण झालं. गुंड्या आणि बंडी. दोघांच्या कुस्ती लपंडाव आणि अनेक खेळाने सर्वांची खूप छान करमणूक होत होती. आता त्यांनी सगळ्यांनाच लळा लावला होता.
घरातल्या सगळ्यांना अचानक परगावी जायलाच हव असं निमित्त निघाल. आता या दोन्ही पिलांचं काय करायचं? प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शेवटी असं ठरलं की, “राहत” या प्राणी प्रेमी संस्थेत त्यांना देऊया. जड अंतकरणाने त्यांना त्या संस्थेत दाखल केलं. लवकरच बंड्या आणि गुंडी तेथील प्राणीपक्ष्यांबरोबर छान रुळली. मजेत राहू लागली.
या संस्थेतच मालकांनी दुर्लक्ष केल्याने, अतिश्रमाने, जखमी झालेली काही गाढवे जप्त करून, त्यांच्यावर उपचार करून बरी झाली होती. त्यांना डॉंन्की यार्डमध्ये उटीला पाठवायचे ठरले होते. (मसीनगुडी) उटी याठिकाणी डॉक्टर इलोना ओटर या नार्वेच्या व्हेटर्नरी डॉक्टर व त्यांचे पती नायजेल ओटर यांनी 20 एकर जागेत इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर ही संस्था सी स्थापन केली आहे. असे प्राणी मुक्तपणे मोकळे आणि निवृत्त जीवन जगत असतात. तेथे “राहत” मधील गाढवांना व त्यांच्याबरोबर बंड्या आणि गुंडी यांनाही पाठवायचे ठरले. समाजसेवी संस्था किंवा व्यक्ती तेथील प्राण्यांना दत्तक घेतात. म्हणजे त्यांचा खर्च पाठवतात. बंड्या आणि गुंडी उटीला पोहोचले. त्यांचे फोटो पाहून अमेरिकन जोडप्याने त्यांना पसंत केले. कागदपत्रांची पूर्तता झाली .दत्तकविधान झाले. त्यांच्या पालकांनी खर्च पाठवायला सुरुवात केली. नवीन मालकांनी त्यांची दत्तक नावे पा़ँल आणि नन्सी अशी ठेवली. बंड्या आणि गुंडीचे पाँल आणि नैन्सी झाले.पूर्ण आयुष्य बदलून गेले. मराठी होते ते अमेरिकन झाले.
रस्त्याच्या कडेला झुडुपात आईविना दिवसरात्र भुकेने कासावीस होऊन ओरडत राहिलेली बंड्या आणि गुंडी पाँल आणि नँन्सी होऊन आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. काय नशीब असतं ना एकेकाच!
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈