श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ नकारात्मकतेची कृष्णछाया..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भडिमार..!नकारात्मकता हाच स्थायिभाव असलेला एक शब्द.एखाद्या कृतीचा हानिकारक परिणाम अधोरेखित करणारा हा शब्द. कोणत्याही गोष्टीचा अविरत ओघ,सातत्याने घडणारी क्रिया, ऐकणाऱ्याला उसंत न देता भान हरपून ऐकवलं जाणारं बरंच कांही यापैकी कशातही नकारात्मकता असेल तर त्याचे अचूक वर्णन करायला ‘भडिमार’ या शब्दाला पर्याय नाहीच.पण याच प्रत्येक बाबतीत जर सकारात्मकता असेल,तर त्याचे चपखल वर्णन करायला मात्र जेव्हा ‘भडिमार’हा शब्द कुचकामी ठरतो आणि तेव्हा इतर अनेक सुंदर शब्द नेमके दिमतीला हजर होतात.

पाऊस पडण्याची एक साधी घटना.ऊन-पावसाच्या खेळातल्या हलक्या सरी असतील तर तो पाऊस ‘रिमझीम’ पाऊस असतो. जीवघेण्या कडक उन्हाने तावून सुलाखून निघालेल्या धरणीला सुखावणारा आणि त्रस्त जीवाला शांतवणारा पाऊस अथक जोरदार पडणारा असला तरी तो पावसाचा भडिमार नसतो तर  ‘वर्षाव’ असतो.पण तोच पाऊस जर जगणं उध्वस्त करणारा, जीव नकोसा करणारा,जोरदार वाऱ्याच्या साथीनं तांडव करीत प्रचंड झाडांनाही उपटून फेकून देत घरांची छपरं उडवीत भिंती उध्वस्त करणारा असेल तर मात्र तो पाऊस टपोऱ्या थेंबांचा भडिमार करणारा विध्वंसकच असतो.

मुलांना प्रेमानं समजून सांगत त्यांना योग्य वळण लावणं आणि धाक दाखवून त्याना  सक्तीने शिस्त लावू पहाणं यात उद्देश एकच असतो पण त्यांचे परिणाम मात्र परस्परविरोधी..!प्रेमाने समजावणं मुलांना आश्वस्त करत योग्य मार्ग दाखवणारं असतं तर धाक दाखवणारा शब्दांचा भडिमार मुलांच्या मनात भिती तरी निर्माण करतो नाहीतर तिरस्कार तरी.

परस्परांना समजून घेत सामंजस्याने एक पाऊल मागे घेण्याची तयारी साध्या साध्या गोष्टीत लपलेला आनंदाचा खजिना खुला करते,तर मी म्हणेन तीच पूर्वदिशा हा हेकेखोरपणा कर्कश्श बोचऱ्या शब्दांचा भडिमार करीत नात्यांची वीण उसवत असतो.

भडिमाराची अनेक रुपे असतात. भडिमार प्रश्नांचा असतो,अपशब्दी शिव्यांचा असतो,कडवट डोस वाटावेत अशा उपदेशांचा असतो,अनाहूत सल्ल्यांचा असतो,आग्रही जाहिरातींचा असतो, कोणत्याही निवडणूकांच्या बाजारातल्या खोट्या आश्वासनांचाही असतो.जिथं जिथं ज्या ज्या रुपात तो असतो,त्यात नकारात्मकताच ठासून भरलेली दिसेल.सकारात्मकता असेल तिथे भडिमार असूच शकत नाही. उत्स्फुर्त प्रतिसादाचं प्रतिक म्हणून वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांचा प्रचंड ‘कडकडाट’ असतो.भडिमार नव्हे.एखाद्या चमकदार यशाबद्दल चारही दिशेने होत असतो तो कौतुकाचा वर्षाव असतो, कौतुकाचा भडिमार नव्हे.उत्स्फुर्त प्रतिसाद,कौतुकाचा वर्षाव,यात असा प्रसन्नतेचा उत्साहवर्धक प्रकाश असतो आणि भडिमाराच्या अंगांगात मात्र अंधाऱ्या नकात्मकतेच्या कृष्णाछायाच..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments