श्री अरविंद लिमये
विविधा
☆ बंद दरवाज्या पलिकडले गूढ… ☆ श्री अरविंद लिमये ☆
हा एक बंद दरवाजा.तो सहजपणे कधीच, कुणालाच उघडता येणारा नाहीय.या बंद दरवाजाआड लपलेले आहे एक गूढतत्त्व. ईशतत्त्व.त्याचं परिपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानप्राप्तीची आंस असणं महत्त्वाचं.ती असेल त्याला काहीही करून त्या ज्ञानप्राप्तीस अत्यावश्यक अशी स्वतःची योग्यता सिध्द करावी लागेल.ती होताच कुणीही न ढकलता, कोणत्याही मंत्रांविना तो बंद दरवाजा त्याच्यापुरता उघडला जाईल.हे दार उघडणं त्याच्यासाठी त्या ब्रम्हज्ञानाचं गूढ उकलणं असेल आणि तो क्षण अर्थातच त्याच्या आत्म्याचं परमात्म्यात विलीन होण्याचा.
त्या बंददरवाजाच्या पलिकडचे गूढतत्त्व हा आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.चार वेद आणि उपनिषदे हे सर्व त्या गूढतत्त्वाचं आकलन करुन घेण्याचा एक मार्ग.हे ज्ञानप्राप्तीचे मार्ग गुरुकुल पध्दतीत गुरुकडून शिष्याला सांगितले जायचे.’उपनिषद’या शब्दाच्या निर्मितीतच हे सूचन आहे.उप म्हणजे जवळ आणि निषद म्हणजे बसणे. शिष्याने गुरुजवळ बसून करुन घ्यायचे आकलन ते उपनिषद.चारही वेदांचे सविस्तर विवेचन करणारी उपनिषदे यासाठीच महत्त्वाची आहेत.
यातील गूढ अशा ईशतत्त्वाचं सार ज्यात सामावलेलं आहे ते ‘ ईशोपनिषद ‘ या बंददरवाजाआडील गूढतत्त्वाची उकल करण्याचा मार्ग दाखवणारं आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनीय संहितेचा चाळीसावा अध्याय म्हणजे ईशोपनिषद. केवळ १८ मंत्र असणारं हे उपनिषद् तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे. कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय हे याचे वैशिष्ट. पुढे भगवद्गीतेत आलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मूलतत्त्वाचा पुरस्कार याच उपनिषदात सर्वप्रथम आलेला. उद्देश अर्थातच ईशप्राप्ती हाच. ईशप्राप्ती म्हणजेच स्वतःच्या आत्म्यात वास असणाऱ्या परमात्म्याला ओळखणं.हेच ब्रम्हज्ञान. हेच बंद दरवाजाआड लपलेलं गूढतत्त्व..!
सर्वसामान्यांना या कैवल्याच्या मार्गावर आणून सोडण्याचं काम करण्यासाठीच संतविभूती जन्माला आल्या आणि त्या मार्गाची स्वत:च्या आचरणाने आणि शिकवणूकीने ओळख करुन देऊन अंतर्धानही पावल्या.त्या गूढतत्त्वाच्या आकलनासाठी स्वतःची योग्यता सिद्ध करीत त्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचण्याचे तीन भिन्न मार्ग आहेत. तिन्ही मार्गांच्या दिशा वेगळ्या पण उद्दिष्ट एकच. ज्याला जो मार्ग रुचेल तो त्याने अनुसरावा.
कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे ते तीन मार्ग. तीनही अगदी भिन्न पण ज्ञानाच्या गावालाच जाणारे. तिनही मार्गांचे स्वरूप परस्पर भिन्न असल्याने पहाणाऱ्याच्या मनात कोणता मार्ग अनुसरावा याबाबत संभ्रम निर्माण होतो. तो दूर होण्यासाठी या प्रत्येक मार्गाचं स्वरुप समजावून घेऊन आपल्याला जे रुचेल, पटेल, शक्य होईल असे वाटेल तो मार्ग स्वीकारण्याचं स्वातंत्र्य ज्याचे त्याचे.
अतिशय कडक सोवळेओवळे, व्रतवैकल्ये, उपासतापास अशा कृत्त्यांनी ईश्वराचे आराधन करणाऱ्यांचा मार्ग तो कर्ममार्ग. या कर्म संबंधातले टोकाचे नीतिनियम अतिशय काटेकोर असल्याने हा मार्ग तसा अतिशय खडतर. या मार्गामधील तथ्य लक्षात न घेता त्याचं अंधानुकरण म्हणजे उद्दिष्ट विसरून फक्त कृतीलाच महत्त्व देणे. हे रुढ झालं की कर्ममार्गाचं रूपांतर कर्मकांडात होतं.तिथं फक्त कृतीलाच महत्त्व आणि मनातला भाव मात्र तितका उत्कट नसल्याने हे अंधानुकरण अर्थहीन असतं.पण म्हणून कर्ममार्गाला न्यूनत्त्व येऊ नये. या मार्गावरून मार्गक्रमण करून गूढतत्त्वापर्यंत पोचणारे श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, आणि त्याहीनंतरचे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ही प्रातिनिधिक उदाहरणे.
दुसरा भक्तिमार्ग. या मार्गावरून जाणाऱ्यांचे मन अतिशय शुद्ध असणे अपेक्षित. मन किंचितही जरी मलिन झाले तरी गूढतत्त्व पाऱ्यासारखे हातून निसटून जातेच.दया, प्रेम, सौजन्य अंगी असणे,श्रवण-पूजना बाबतची मनातली आस्था आणि ओढ अत्यावश्यक. परमतत्त्व मनोमन जाणून केलेले नामस्मरण. या सर्व अंगाने केलेली भक्तीच श्रीहरी प्राप्तीचा आनंद मिळवून देते.
तिसरा योगमार्ग. यासाठी बाहेरचे कांहीच लागत नाही. सर्वसामान्यांना जाणवत नाही पण जेवढे ब्रम्हांडी असते तेवढेच पिंडीही असतेच. ते घेऊनच योग साधायचा असतो. कुंभक, रेचक, इडापिंगळेचे भेद, धौती, मुद्रा, तारक, कुंडलिनी सुषुम्ना यांचे ज्ञान ही योग मार्गावरील प्रवासाची शिदोरी.
या तीनही मार्गांचे अंतिम फळ म्हणजेच बंददरवाजा पलीकडील गूढतत्त्वाची ज्ञानप्राप्ती. या तीनही मार्गावरील पांथस्थ एकाच मुक्कामावर पोहोचतात आणि तेव्हाच त्यांना संतपदही प्राप्त होते.
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी सत्प्रवृत्तीने आचरण करून कोणत्याही रूपात कां होईना गूढ अशा त्या इशतत्त्वाचे आस्तित्त्व श्रद्धायुक्त अंतःकरणाने मानणे हेच बंददरवाजापर्यंत पोचणाऱ्या मार्गाकडे जाणारे पहिले पाऊल असेल.
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈