?  विविधा ?

☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

सजगतेने निसर्ग पाहू.

निसर्गाचे आस्वादक होऊ.

एका बाजूला उन्हाळ्याचा दाह वाढत आहे आणि दुसरीकडे याच कालावधीत निसर्गात सुंदर अशी फुले फुलली आहेत. आपण आपल्या माना वर करून सजगतेने इकडे तिकडे पहायला हवे बस्स.

सुरुवातीला दिसू लागला तो निलमोहोर . सुंदर गडद निळसर असे झुबके संपूर्ण झाडावर पसरलेले आपणाला पहायला मिळतात. निलमोहराची मोहिनीच आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पाहातच रहावे असे वाटते.

त्यानंतर दिसू लागला तो पळस . आहाहा…

हाताची बोटे एकत्र करून वरती केल्याप्रमाणे याचा आकार. तशी जाडसर पाने असलेली भरपूर फुले. पानच नसतं या कालावधीत पळसाला. इतरवेळी उघडा बोडका वाटणारा पळस उन्हाळ्याची चाहूल लागताच आग लागावी तसा बहरतो. जंगलात पळसाची अगदीच कुठेकुठे झाडे असतील तर संपूर्ण झाडाला आग लागल्यासारखा भास होतो. म्हणून याला Flame of the Forest संबोधले जाते. पळसात पण विविधता आढळते. पळसाला पाने तीनच. असे म्हंटले जाते. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्या केल्या जातात. काही ठिकाणी पळस गर्द लाल चुटुक, तर काही अबोली, फिकट लालसर, तर पिवळाही काही ठिकाणी. पळस फुलल्यावर पक्ष्यांना एक छान मेजवानीच असते. पळसावर विविध प्रकारचे पक्षी मधुपानासाठी आलेली आपणाला पहायला मिळतात. त्यातल्या त्यात सूर्यपक्षी, साळुंखी,मैना आणि बुलबुल जास्तीत जास्त काळ पळसाचा आस्वाद घेताना आढळतात. पळसही दिसायला देखणा दिसतो. झाडाखाली पळस फुलांचा सडा पडलेला पहायला मिळतो.

याच कालावधीत काटेसावर ही फुलते. पळसासारखेच इतर मोसमात रुक्ष असणारे हे झाड उन्हाळा जवळ येताच सुंदर फिकट लाल वा गुलाबी वा केशरी फुलांनी बहरते. याला कमी पण सुंदर फुले लागतात. हाताची बोटे वर करून पसरल्याप्रमाणे याचा आकार असतो. यातही विविधता आढळते. ही फुलेही सुंदर, डोळ्यांना आनंद देणारी वाटतात. काटेसावर फुलांच्या मकरंदाचा आस्वादही अनेक पक्षी घेतात.

यानंतर वर्षातून दोनवेळा बहरणारा सोनमोहोर ही आपले लक्ष वेधून घेतोच. याचे झाड मात्र मोठे असते आणि भरपूर पिवळाई या कालावधीत या झाडाला आलेली असते. या कालावधीत झाडाखाली पिवळा सडाच पडलेला असतो. हेही झाड रखरखत्या उन्हात डोळ्याना छान आनंद देणारे असते.

जरा उशिरा फुलणारा गुलमोहर . यातही विविध प्रकार पहायला मिळतात. काही गुलमोहोर लालभडक, तर काही फिकट लालसर, तर काही फिकट गुलाबी. तर काही अबोलीच्या जवळ जाणारी रंगसंगती असते. काही गुलमोहर वर्षभर उघडे बोडके असतात, काही वर्षभर हिरवळ धारण करतात. पण जसा उन्हाळा जवळ येईल तसे झाडाला शेंगा लागायला सुरुवात होते. नंतर हळूहळू शेंगा फुटून लाल फुलांचा बहर झाडभर पसरतो. काही पूर्ण झाडे लाल भडक दिसायला लागतात, तर काहींवर थोडी हिरवी पालवी आणि गुलमोहराची लालिमा पसरलेली दिसते. खरच विविध प्रकारचा गुलमोहोर अबालवृद्धांचे मन मोहून टाकतो.

याच कालावधीत उशीरा फुलणारे आणखी एक सुंदर झाड म्हणजे बहावा ( गोल्डन शाँवर ). याही झाडाला कुसुमसंभार येण्यापूर्वी लांबुळक्या शेंगा लागतात आणि काही कालावधी नंतर शुभ्र पिवळी फुले लागायला सुरुवात होते. पाहतापाहता काही दिवसातच शुभ्र पिवळ्या फुलांनी संपूर्ण झाड लगडते. याचे गोल्डन शाँवर हे नाव समर्पक आहे. कारण, झाडभर शुभ्र पिवळे झुबके लोंबत असतात. या झाडावरही भरपूर पक्षी मधुपानासाठी येतात. विशेषकरून भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे भुंगे मधुपानाचा आस्वाद घेताना दिसतात. काय अप्रतिम नजारा असतो. आहाहा…

पाहतच रहावे असे वाटते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडावे आणि कोठूनतरी रातराणी चा सुगंध दरवळावा. सुगंध नाकात शिरताच एक क्षणभर समाधीच लागते. काय तो मोहक मंद सुगंध.     वाSSह.

 

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments