श्री गौतम रामराव कांबळे

? विविधा ?

☆नवा काळ आणि समस्या ☆ श्री गौतम रामराव कांबळे

साधारण चाळीसेक वर्षापूर्वीची गोष्ट असावी. आजही स्मरणात घर करून बसली आहे. मी चौथीला असेन त्यावेळी. वडीलांच्या कडक शिस्तीत वाढत होतो.

त्यांचे काही नियमही होते. त्यापैकी एक म्हणजे, घर व गल्लीचा परिसर सोडून खेळायला लांब जायचे नाही. आमच्या खेडेगावात  बहुतेक सगळ्या पालकांचा या बाबतीत नियम सारखाच.

आमचे घर गावाच्या दक्षिण टोकाला. एकदा असाच मी शाळेतील मित्रांच्या नादाने गावाच्या उत्तरेकडील गल्लीत खेळायला गेलो होतो. चांगलाच रमलो होतो.  त्या गल्लीतील एका ज्येष्ठ माणसाने मला पाहिले. मी या गल्लीत नवीन आहे हे त्यांनी ओळखले. मला त्यांनी हटकले. जवळ बोलावून म्हणाले,

“कुणाचा रं तू?”

मी वडीलांचे नाव सांगितले.

“मग इकडं कसा आलायस?”

मी गप्प.

“तुज्या ‘बा’ला म्हाईत हाय का?”

बापाचं नाव काढल्यावर पोटात गोळा आला.

मी काही न बोलता नकारार्थी मान हलवली.

“चाटदिशी घरला जायाचं. न्हायतर मार खाशील. तुजा बा इचारू दे. मग त्येला पण सांगतो.” ते अधिकारवाणीने बोलले.

मागं न बघता नीट घर गाठलं. पण मनात भीती होती. वडीलांना समजलं तर काय खरं नव्हतं. कशानं हाणतील याचा नेम नव्हता.

वडील संध्याकाळी शेतातून आले. मूड चांगला वाटला त्यांचा. विचार केला, त्या माणसानं सांगण्या अगोदर आपणच सांगितलं तर बरं होईल. थोडक्यात तरी भागंल.

मी म्हणलं, “तात्या, आज मी वाण्याच्या गल्लीत गेल्तो.”

“कशाला”

“पंडासंगं”

पंडीत देसाई हा माझा मित्र. त्याला सगळे पंडाच म्हणायचे. त्यांच्या आणि आमच्या घरचे चांगले होते. त्यामुळे फार अडचण येणार नव्हती.

“बर मग?” तात्यांचा प्रश्न.

तिथंले काका इकडं का आलायस म्हणून रागावले मला. “मार खाशील म्हणाले”

 “का?”

“घरात माहीत हाय का म्हणून इचारलं”

“तू काय सांगितलंस?”

“न्हाय म्हणालो”

“त्येच्या पायात पायताण न्हवतं का? तोंडानं बोलण्यापेक्षा हाणायला पाहिजे होतं.” वडीलांचा शेरा.

मी गप्प बसलो. असंच वातावरण असायचं गावाकडं. गल्लीतल्याच काय गावातल्या प्रत्येक माणसाचं सगळ्या मुलांकडं लक्ष असायचं. धाक असायचा.  कुणाच्या मुलाला कुणीही  रागवलं तर आई बापाला राग यायचा नाही.

आई, बापाची न्हायतर मामाची भीती घालायची. बाप काकाची भीती घालायचा. म्हाताऱ्या माणसांना तर कुणालाही रागवण्याचा अधिकारच असायचा. त्यामुळे मुलं, तरुण टरकून असायचे.

हल्ली एक समस्या होऊन बसली आहे. मुलं आई वडीलांची खूप लाडकी झाली आहेत. बाप, आत्या किंवा काका रागवला तर आईला राग येतो. आणि आई किंवा मुलाचा मामा रागावला तर बापाला राग येतो. मग गावातीलच काय शेजाऱ्या पाजाऱ्यानाही कुणाच्या मुलाला बोलायचे धाडस होत नाही.   परिणामी मुलांना कुणाचा धाक असा राहिलेलाच नाही.

चौकोनी कुटुंब पद्धतीचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. मुलं आपल्या मनाला वाटेल तशी वागत आहेत. व्यसनाधीनता वाढत आहे. याचा विचार कोण आणि कधी करणार हा प्रश्न उरतोय.

© श्री गौतम रामराव कांबळे

शामरावनगर,सांगली.

9421222834

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments