सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆
नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्ण व रुक्मिणींनी द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिकडे जाण्यापूर्वी पंढरीला लोकांचे निरोप घेण्यासाठी निघाले. प्रथम पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या कुटीजवळआले. पण आजच्या दिवशी पडलेल्या पावसामुळे कुटीसमोर चिखल असल्यामुळे त्यांनी अंगणातून पुंडलिकाला हाक मारली.
साक्षात परमेश्वर विष्णू दाराशी पाहताच पुंडलिक म्हणाला,” देवा मी माझ्या आई-वडिलांचे प्रातर्विधी उरकत आहे. कृपया आपण कुटी मध्ये येऊ नये. मी थोड्या वेळाने बाहेर येतो.” आणि श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून त्याने जवळ असलेली एक वीट उचलली व मनोभावे नमस्कार करून अंगणात टाकली आणि विनवणी केली,” मी बाहेर येईपर्यंत कृपया या विटेवर उभे रहा”.
श्रीकृष्ण त्याच्या विनंती प्रमाणे दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या टाकलेल्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांना श्री विष्णूचे दर्शन घडविले आणि श्रीकृष्ण आपल्या भक्ताची वाट पाहत विटेवर उभे राहिले. एक घटका होत आली तरीही पुंडलिक बाहेर आला नाही. विष्णूंना पाहून जनसमुदाय गोळा झाला.भगवंताला यायला उशीर का झाला हे पाहायला रखुमाई ही तेथे आल्या.
पांडुरंगाच्या हाकेला ही पुंडलिक का बाहेर आला नाही हे पाहण्यासाठी एक सदगृहस्थ कुटीत गेले. तर पुंडलिकाचे आई वडील मरण पावले होते आणि त्यांच्या चरणी पुंडलिकाने आपल्या प्राणाचा त्याग केला होता.
त्याची अपार भक्ती पाहून पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले कोणत्याही पूजेत तुझे नाव प्रथम घेतले जाईल “पुंडलिका” आणि जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीत पाषाण रूपात ह्याच पंढरपुरात 28 युगे उभा राहून माझ्या भक्तांना दर्शन देत राहीन. त्यानंतर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई त्याच ठिकाणी पाषाण रूपात उभ्या राहिल्या.
तेव्हापासून विठ्ठल रुक्माई च्या स्वयंभू मूर्तीच्या चरणावर माथा टेकवून आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची लागली ती अजूनही अखंडित व अविरतपणे चालू आहे.
पंढरपुरात श्रीकृष्ण रुक्मिणी पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजे “आषाढी एकादशी”
संत ज्ञानेश्वरांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी दीडशेच्या संख्येने सुरू केलेली वारी आजही खांद्यावर भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत रणरणत्या उन्हात पावसा पाण्याची पर्वा न करता दरवर्षी ला खूप वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात.
घेईन मी जन्म याचसाठी देवा
तुझी चरणसेवा साधावया.
तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या या अभंगाप्रमाणे 200 ते 225 किलोमीटर अंतराची पायी वाटचाल करीत वारकरी एकादशीला पंढरपूरला पोचतात.
“जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल”
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈