श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

भाद्रपद सरत येतो, तशी पाऊसही ओसरू लागतो. मग घरोघरी सुरू होते लगबग नवरात्रोत्सवाची. कृषी संस्कृतीतून आलेला हा उत्सव. नवं धान्य शेतात तयार झालेलं असतं. वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, वेल-भाज्या यांनी शिवार डोलत असतं. सगळीकडे आनंदी – आनंद असतो. हा आनंद नवरात्रोत्सवातून प्रगट होतो. नवरात्रातील प्रथा, परंपरा बघितल्या, तर लक्षात येतं, ही देवीच्या मातृरूपाची उपासना आहे. तिच्या सृजनशक्तीचा गौरव आहे.

वर्षातून तीन वेळा आपण देवीचा उत्सव साजरा करतो. चैत्रगौर ही वैभवाची, समृद्धीची देवता आहे. तिचे सालंकृत रूप आपण मखरात बसवतो. तिच्यापुढे आरास केली जाते. गृहिणी क्ल्पकतेने नाना रूपात तिची सजावट करते. गृहिणी तिच्या त्या रूपात स्वत:ला बघते. तृप्त होते. समाधान पावते. यात सहभागी करून घेण्यासाठी नातेवाईक, शेजारणी-पाजारणी, मैत्रिणी-गडणी यांना हळदीकुंकवाला बोलावलं जातं.

भाद्रपदात येणार्याल गौरीकडे कन्यारूपात बघितलं जातं. माहेरवाशीणीसारखं तिचं कौतुक केलं जातं. तिला नटवलं, सजवलं जातं. भाजी-भाकरी, पुराणा-वरणाचं जेवण होतं. रात्री झिम्मा-फुगड्या, फेर-गाणी यांची धमाल उडते. तीन दिवसांचं माहेरपण उपभोगून गौर परत जाते.

नवरात्रात ती मातृरूपत घरोघरी अवतरते. आईच्या स्वागतासाठी घरोघरी धांदल उडते. घराचा काना-कोपरा झाडून-पुसून लख्ख केला जातो. हांतरूण-पांघरूण, जास्तीचे कपडे-लत्ते, गोधड्या-चिरगुटे धुवून स्वच्छ केली जातात. आईने म्हणायला हवे ना, लेक गुणवती आहे. घरोघरी थाळीत पत्रावळ घेऊन त्यावर माती पसरतात. त्यात गहू, ज्वारी, बाजारी, मूग, मटकी, चवळी अशी नऊ प्रकारची बी-बियाणे रुजत घालतात. या मातीच्या मधोमध असतो, मातीचा सच्छिद्र घट. त्यावर विड्याची पाने आणि त्यावर नारळ. त्यावर फुलांची माळ सोडली जाते. शेजारी अखंड तेवणारी समई किंवा निरंजन ठेवले जाते.  मातीचा घट हे पावसाची देवता, वरूणदेव याचे प्रतीक आहे तर तेवणारा दीप हे सूर्याचे. धान्य रुजण्यासाठी माती, पाणी, आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. घरात असं प्रतिकात्मक शेत तयार केलं जातं. त्यातलं बियाणं हळू हळू रुजू-वाढू लागतं. अंकूर येतात आणि आई धनलक्ष्मी त्यातून प्रगट होते. नवमीपर्यंत हे अंकूर चांगले बोट-दोन बोट उंच होतात. नंतर शेजारच्या पाच मुलांना बोलावून त्याची कापणी केली जाते. ते अंकूर कानात, टोपीत खोवायचे, देवाला अर्पण करायचे, शेजारी पाजारी द्यायचे ( जशी काही आपण नव्या धान्याचा वानोळा शेजारी-पाजारी देत आहोत. ), अशी पद्धत आहे.

नवरात्राला ‘देव बसले’ असंही म्हणण्याची पद्धत आहे. या उत्सवाला आणखीही एक प्रथा जोडली आहे. त्याची मुळे पुराणकथेत आहेत. महिषासूर या उन्मत्त दैत्याने देव-मानवांना हैराण करून सोडले होते. जगणे मुश्कील केले होते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस त्याच्याशी युद्ध करून, त्याचा दसर्यातच्या दिवशी वध केला. या काळात देव तपश्चर्येला बसले आणि त्यांनी त्याचे पुण्य देवीच्या पाठीशी उभे केले. देव तपश्चर्येला बसले, तेव्हा त्यांना हलवून त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणायचा नाही, म्हणून या काळात एरवी देवांची पूजा केली जाते, तशी पूजा केली जात नाही. आदल्या दिवशी पूजा करून एका डब्यात देव घातले जातात. याला म्हणायचं ‘देव बसले’  म्हणजे देव तपश्चर्येला बसले. दसर्या च्या दिवशी या बसलेल्या देवांना उठवतात व नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करून त्यांची देव्हार्यासत प्रतिष्ठापना केली जाते.

आई जन्म देते. पालन-पोषण करते. रक्षणही करते. तिचं जन्मदेचं रूप घरात शेत तयार करून साकार केलं जातं. देवीच्या नैवेद्याच्या रूपाने घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. यातून भरण – पोषण अधीकच रूचीसंपन्न होतं.  पण पोषण केवळ शरीराचं होऊन भागणार नाही. ते मनाचंही व्हायला हवं. नवरात्रीच्या निमित्ताने, भजन, कीर्तन, प्रवचन, भाषणे होतात. गीत-नृत्य, नकला, नाटुकल्या इ. संस्कृतिक कार्यक्रम होतात. या सार्यारतून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

आई रक्षणकर्तीही असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात, असं नाही. आपले स्वभावदोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे, अहंकार, द्वेष, मत्सर, असे किती तरी स्वभावदोष आपलं व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष वाढू  नयेत, म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा ती प्रयत्न करते. नवरात्रातील, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने इ. मधून याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार केले जातात.

आशा तर्हे ने जन्मदात्री, पालनकर्ती, रक्षणकर्ती या तीनही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरूपाची उपासना असते. नवरात्रात अनेक घरातून पिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी या प्रथेवर एक अतिशय सुंदर ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वरील स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. ते लिहितात,

‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासूर मर्दनालागुनी ।

त्रिविध तापाची कारवाया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ।

आईचा जोगवा जोगवा मागेन । आईचा जोगवा जोगवा मागेन ।

द्वैत सारुनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।

भेदरहित वारिसी जाईन ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र । धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र। दंभ सासरा सांडेन कुपात्र ।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्या्चा सोडीयेला संग ।

केला मोकळा मारग सुरंग।  आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासिका दंभ, सासरा, विकल्प नवरा असे  सर्व  स्वभाव दोष त्यजून, पोटी ज्ञानपुत्र मागते. भेदरहित होऊन वारीला जाते. त्या उपासिकेइतके नाही, तरी काही प्रमाणात आपल्याला आपल्या स्वभाव दोषांवर नियंत्रण मिळवता आलं तर? तर आपण खर्यान अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल, होय ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments