सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
विविधा
☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन
नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे., लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन! लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते.सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून ,पाट रांगोळी करून सर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच!मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही!मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क,तर मुली रांगोळी काढण्यात!मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम! आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ हे चालू राही.! फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते!
असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली… लक्ष्मीपूजन काही वेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एका च दिवशी असते. अशावेळी सकाळचे फराळ झाले की दुपारच्या लक्ष्मी पूजनाची तयारी करावी लागायची. एकदा लक्ष्मीपूजन झाले की दिवाळीचे महत्त्वाचे काम आवरलेले असे. आताही बराच वेळा लक्ष्मीपूजन झाले की लोक फिरायला बाहेर पडतात….
व्यापारी लोकांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे असते. या दिवशी दुकान ची पूजा केली जाते. नवीन वह्या आणून वही पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला भाताच्या लाह्या, बत्तासे, पेढे याचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. बाजारपेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजी होते आणि दुकानांवर भरपूर रोषणाई केलेली असते. असा हा लक्ष्मीपूजनाचा सोहळा खूप महत्त्वपूर्ण असतो…
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈