श्री अरविंद लिमये

? विविधा ?

ने मजसी ने… ☆ श्री अरविंद लिमये ☆

पुढे धाव घेण्याची, झोकून देण्याची, समर्पणाची, एकरूप होण्याची असोशी आपल्या  अल्पाक्षरी रूपात व्यक्त करणारा लक्षवेधी शब्द म्हणजे ओढ!

ओढ म्हणजे अंतर्मनात अस्वस्थ खळबळ माजवणारी अनिवार भावना!

आकाशात झेप घेणाऱ्या पक्षाच्या मनातली घरट्याकडे परतण्याची असो, आईच्या मनातली बाळाला कवटाळण्याची वा बाळाच्या अबोध मनातली आईच्या कुशीत शिरण्याची असो,एखाद्याच्या मनातील मैत्रीची असो,कलासक्त मनातील नवनिर्मितीची असो वा भक्तियुक्त अंत:करणातील ईश्वरप्राप्तीची असो या सर्व विविधरुपरंगी ओढींचे उत्कटता हे अविभाज्य अंग असते.उत्कट भावनेशिवाय  ओढ निर्माण होऊच शकत नाही आणि मनात कळकळ,तळमळ नसेल तर उत्कटताही निर्माण होत नाही.ही अशी तळमळ निर्माण व्हायला त्या क्षणापुरता कां होईना ‘स्व’चा विसर अपेक्षित असतो आणि अपरिहार्यही.

प्रेम, माया, कल, प्रवृत्ती, पसंती, आवड,ओढा,आकर्षण असे ओढ या शब्दाचे विविध अर्थरंग या शब्दातला भाव व्यक्त करण्यास पुरेसे नाहीत.कारण  सकारात्मक भावनांनी युक्त अशा या अर्थशब्दांना परस्पर छेद देतात ते गरीबी,अभाव दर्शवणारा ओढग्रस्त, जोर लावणे,ताणणे या अर्थाचा ओढणे,दडपण व्यक्त करु पहाणारा ओढाताण मनाची चंचलता,स्वैरता,द्वाडपणाचं प्रतिबिंब सामावून घेणारा ओढाळ असे अनेक शब्द! ही सगळी ओढ या शब्दाचीच विविधरंगी रुपे!

पण तरीही ही होती सर्वसामान्य माणसांच्या भावविश्वातली,मर्यादीत पैस असणारी ओढ! सर्वसाधारण माणसाच्या मनातली उत्कटता ध्वनित करणारी! या प्रकारची ओढ व्यक्तिगत परिघात वावरणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदु:खातून निर्माण होत असते. या परिघाला अंगभूत मर्यादा असणे स्वाभाविकच.पण स्वतःच्या सुखाचा,स्वास्थ्याचाच नव्हे तर सर्वस्वाचा होम करुन देशहितासाठी हालअपेष्टा सोसणाऱ्या देशभक्तांच्या मनातली मातृभूमीची ओढ ही सर्वांनाच सतत प्रेरणादायी ठरणारी अशीच असते.

काळ्यापाण्याच्या प्रदीर्घ काळातील जन्मठेपेची शिक्षा भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या वीरयोध्यांच्या मनातील मातृभूमीची ओढ त्यांच्याच शब्दांत व्यक्त होते तेव्हा त्या शब्दाशब्दांत भरुन राहिलेले असते ते हेच देशप्रेम!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातली ही ओढ जेव्हा काव्यरूप धारण करते तेव्हा त्या ओढीतली असोशी आणि तळमळ….

‘ ने मजसी ने s परत मातृभूमीला….

सागरा प्राण तळमळला..’

अशा उस्फुर्त,उत्कट शब्दातून नेमकी व्यक्त होते..!

स्वार्थाचा लवलेशही नसलेली उत्कट देशप्रेमातून निर्माण झालेली ही तळमळ कुणीही नकळत नतमस्तक व्हावे अशीच म्हणावी लागेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments