श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ निर्माल्य! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती,अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.
मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ?
मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. कोमेजताना निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य!
मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले
थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈