सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ नात्यांमधील वैविध्यपूर्ण सुंदरता… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपली भारतीय संस्कृती ही अतिशय वैविध्यपूर्ण असल्याने ती मनामध्ये रुजून बसते. ह्या विविधतेमध्ये सणसमारंभ, राहणीमान, नात्यांमधील गोडवा हा तर जास्त मोहवून टाकतो.

भारतीय व्यक्ती ही मुळात कुटुंबप्रिय, माणसांची आवड असणारी, मनापासून माणसं जपणारी आणि रक्ताच्या नात्याइतकच मनाच्या नात्यालाही तोलून धरणारी असते. जवळपास प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर निरनिराळ्या नात्यांमध्ये समरस होत असते. जन्मापासून मिळतात ती रक्ताची नाती, विवाह नंतर जुळतात ती जरी रक्ताची नाती नसली तरी घट्ट धरून ठेवावी अशी नाती आणि ह्या नातेसंबंधाना जोडून ठेवणारा भक्कम पिलरचे काम करणारी मध्यस्थ व्यक्ती आणि जीवनाच्या प्रवाहात अगदीं लहानपणापासून ते वयाचे कुठलेही बंधन नसलेले मैत्रीचे आणि मनापासून मनाने जोडलेली अनमोल नाती.

पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्यामध्ये प्रामुख्याने फरक भारतीय संस्कृतीत हमखास असणाऱ्या नाते संबंध आणि त्यासाठीच्या जपणुकीसाठी असोशीने केल्या जाणाऱ्या प्रयत्ना मध्ये असतो. पाश्चिमात्य संस्कृतीत सगळी नाती ही जवळपास एकाच साच्यात असतात. आपल्या सारखी विविधता तेथे नसते, आपली मंडळी ही आपल्याशी कुणी काकाकाकू, मामामामी, मावशी, आत्या आणि त्याचप्रमाणे ह्या नात्यातून निर्माण झालेली वेगवेगळ्या प्रकारची भावंडं आयुष्यात लज्जत आणतात नाही तर पाश्चिमात्य संस्कृती मध्ये मात्र “सब घोडे बारा टके” ह्या म्हणी नुसार सगळी नाती सरसकट आण्टी, अंकल मध्ये घुसळलेली.

आपल्या पिढीला सगळी नाती माहीत झाली, अनुभवायला मिळाली मात्र आजकाल काळानुरूप घेतल्या जाणाऱ्या “हम दो हमारा एक” ह्या म्हणीनुसार काही नाती ह्या हल्लीच्या मुलांना अनुभवायला मिळतच नाही, असो पण आपण अनुभवलेल्या नात्यांमध्ये खूप जास्त वेगवेगळा आनंद देणारी निरनिराळी नाती होती, आत्या ,मामा, मावशी,  काका, काकू, ह्या अनुषंगाने मैत्र जुळलेली भावंडं ह्यामुळे आपण समृध्द होतो, पश्चिमात्य संस्कृती सारखे आंटी अंकल ह्या एकाच बासनात गुंडाळलेली नाती नव्हती. शिवाय छान लेक जावई, मुलगा सून ही अत्यानंद देणारी नाती आपण कधीच ” इन लॉ” च्या चौकटीत बंदिस्त करत नाही.

खरंच प्रत्येक नात्याची जागा वेगळी, स्थान वेगळं, लज्जत, गोडी आणि खुमारीच वेगळी. परवा अनुभवलेला एक प्रसंग सांगून पोस्ट लांबण न लावता जरा आवरती घेते. परवा एका परिचित कौटुंबिक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. तेव्हा तेथील एक स्त्री एका तरुण नवविवाहित तरुणीची ही “माझी लेक” असं म्हणून ओळख करुन देत होती. माझ्या माहिती प्रमाणे त्या स्त्री ला एकुलता एक मुलगा होता, नंतर कळले ती सुनेला मुलीसारखी मानून तिची लेक म्हणून ओळख करुन देत होती. ह्याकडे मी जरा वेगळ्या नजरेने बघितल्यावर मला प्रकर्षाने जाणवले, प्रत्येक नात्याचे स्थान, ते नात, त्यातील लज्जत ही वेगवेगळी असते, शिवाय सासू सुनेचे नाते हे सुध्दा एक खूप सुंदर असं नातं असतं, आजकाल तर आपल्या परिचित लोकांकडे सासुरवास हा शब्द औषधाला सुद्धा सापडत नाही, मग हे सुंदर नविन निर्माण झालेले अलवार नाते फुलवण्यासाठी त्याला लेकीची भूमिका देऊन ती सगळ्यांना सांगत सुटणं, खरंच आवश्यक असतं काय ?

सासुसूनेचे नाते हे सुध्धा मायलेकीच्या नात्या प्रमाणेच एक सुंदर नात असतं फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो हे मी आता माझ्या आणि आमच्या आईंच्या सलग बत्तीस वर्ष एकत्र घालविण्यानंतर ठामपणें सांगू शकते आणि तेच नात माझ्या नविन आलेल्या सूनेबरोबरही तयार होईलच ह्याची खात्री पण नक्कीच देऊ शकते.

त्यामुळे हा नात्यांचा विषय मांडताना मला हे प्रकर्षाने जाणवलं की प्रत्येक नात्याला आपल्या त्याच्या मुळ जागी ठेऊन त्याच्यातील सौंदर्य टीपाव आणि त्याचा आस्वाद ही घ्यावा. कुठल्याही नात्याला त्याचा ओरिजनल स्वाद घालवून मोल्ड करणे कितपत बरोबर, शिवाय हे मोल्डेड नाते पत शेवटपर्यंत बदललेल्या रुपात टीकेलच ह्याची पण काय निश्चिती ?,अर्थात हे माझे वैयक्तिक मत बर का.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments