प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
विविधा
☆ नवरात्र – सृजन सोहळा ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
श्रावण आणि भाद्रपद म्हणजे वर्षां ऋतुतून संक्रमण करीत आलेली सृजन सृष्ठी. पावसामुळं धरणी ओली चिंब भिजलेली. ग्रीष्म ऋतुतील उष्णतेमुळे भेगाळलेली माती किंवा धरती! पाण्याला आसूसलेली माती. मृगाच्या प्रतीक्षेत तृषित असलेले सृष्टी चराचर चिंब भिजून तर जातेच. जाताजाता कस्तुरीचा गंध पण देऊन जाते. तरीपण तिला पावसाची ओढ ही असतेच.
सुरुवातीला असणारा पावसाचा तसेच मातीचा खट्याळपणा दिसून येतोच. नवं परिणीतासारखी आस लागून बसलेली दिसते. पावसाचा पण तोरा काही कमी नसतो. वेळी अवेळी, ज्यास्त करून रात्री पहाटे, मनाला येईल तेव्हा सृष्टीचे लाड पुरवत असतो. गेली अनेक युगे ते सांख्य सिद्धांत मांडत आपल अद्वैत प्रेम जगाला दाखवून देत असतात. प्रकृती काय किंवा स्वभाव काय त्याला औषध नाही. पुरुष काय किंवा पाऊस काय मनमानी स्वभाव जातच नाही. वारा काय किंवा विज काय त्यांचा चेतना गुण सोडत नाहीत. पृथ्वी काय किंवा धरा काय ती बहू प्रसवा आहे. मेघाची पालखी ही आकाशात अविरत सजलेली असतेच. श्रावण भाद्रपद कसे सण वार व्रतवैकल्यात निघून जातात. कृषीवल आपले काम करत असतोच. जेवढं काही पाऊस आणि माती यांच्या कडून घेता येईल, तेवढं तो काढून घेत असतोच. त्यांच्या सृजन शिलतेचा फायदा हा सर्व चराचर घटकाना मिळत असतोच.
असं असताना पंचभौतिक घटकच बंड करत आहेत! अवकाळी पाऊस अवकाळी वादळ हे बदलत्या निसर्गाचे चित्र! ह्यात दोष कुणाचा ? निसर्गाचा की मानवाचा? अलबत मानवच ह्याला कारणीभूत आहे! शोध नन्तर प्रगती, प्रगतशील मानव ह्या पंच भौतिक सृष्टीवर घाला घालतो आहे असं नाही काय वाटत? कमी वेळेत भरपूर अन्नधान्य पिकवण्यासाठी बऱ्याच रसायनाचा मारा करतो.
अशीच असंख्य उदाहरणे देता येतील. निसर्गाचा समतोल ढळत आहे. वर म्हणायचे कली युग आहे ! ह्याचाच परिणाम समाज घटकात दिसते. असो.
घटस्थापना
अश्विन प्रतिपदा ते दसरा असे दहा दिवस नवरात्री उत्सव साजरा केला जातो. ह्याच्या मागे बऱ्याच दंतकथा असल्या तरी, मुख्य सण हा स्त्री शक्तीचा जागर म्हणजेच सृष्टीच्या किमयेला आभार मानण्याचा उत्सव. परतीचा पावसाळा आणि त्यात कडक उन्ह आणि शरद ऋतुचे आगमन. सृष्टी विविध अंगाने भारलेली सौंदर्याने फुललेली. नटलेली. कडक उन्ह म्हणजेच ऑक्टोबर हिट. ती नदी ओढा तलाव जलसाठ्यातीला
जीवाणु व विषाणू ह्यांचा नाश करते, पाणी स्वच्छ करण्यासाठी मदत होते. रात्रीच्या शरद चांदण्यात ती ओझोनयुक्त होते. ह्याच वेळी आगस्ती ताऱ्याचा उदय होऊन पाणी निरजुंतुक होतं असते. वर्षांऋतू आणि शरदऋतुचा संधिकाल. सर्व नद्या ओढे विहीर तलाव पाण्याने गच्च भरलेले. म्हणेज दूर दृष्टीने परत वर्षां ऋतू येईपर्यंत तहान तृष्णा ह्याची भूक मिटलेली. कृषिवलांना आनंदी करणारी बाब. पुरेसा पाण्याचा साठा. ह्या किमयेच्या ऋणातून मुक्त करणारा हा उत्सव. सृष्टी आणि स्त्री ह्यांच्या गुणधर्मात निसर्गाच्या साधर्म्यातुन हा सण साजरा केला जातो
घट हेच शरीर. त्यातील पाणी हाच आत्मा. ह्या घटाची नवरात्रीसाठी स्थापना. घट हा मातीतून साकारलेला. घटाखालची माती ही सृष्टीचे द्योतक. त्रिगुणात्मक. काळ्या मातीत बीज पेरणे हे बहू प्रसवा असल्याचे द्योतक.
नवं रंध्राच्या नवं रात्री! वरुन फुलांच्या माळा. शक्तीची उपासना. स्त्री शक्ती असो वा सृष्टीची निसर्गाची शक्ती. धरती आहे म्हणून आकाश आहे, आकाश आहे म्हणून पाऊस आहे. सोबतीला वारा अन अग्नी पण. अश्या पंचभौतिक निसर्ग किमयेला, स्त्री शक्तीच्या कौतुकाचा सोहळा म्हणजेच नवरात्र आणि दसरा. ह्या मागची कारणमिमांसा गहन आहे.
परंपरागत चालत आलेला सण, उत्सव ह्याचं हल्ली विद्रुप स्वरूप बघायला मिळणे, ह्यासारखे दुर्दैव नाही. हिडीस अन विकृत प्रदर्शन त्याच बाजरीकरण! स्त्रीला तिचा सन्मान पूर्वीसारखा परत मिळेल काय.
वासना अंध नाराधम ह्या असल्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. गरबा नृत्य हल्ली फॅशन शो झाला आहे. किंवा दुर्गामातेची मंडळ विकृत स्वरूप दाखवत आहेत. रोजच्या जीवन प्रवासात स्त्री सुरक्षित आहे काय ? तुम्ही सुरक्षा देत नसाल तर, मग हे असली नाटके कश्याला ??
नवरात्री आणि रंग ह्यांचा काहीतरी सम्बन्ध असतो, असा जावईशोध पण हल्ली अलीकडेच लावला गेला. रंग! कापडं! आणि व्यापार! ह्या बाबत नं बोललेलं बरं! हा जिव्हाळ्याचा विषय ! तुम्ही नटा, सजा तो तुमचाच अधिकार आहे. तुमचे लाड, कौतुक पुरवून घ्यायला दुमत नाही. पण नवं रंगाचं गणित काही कळले नाही, आणि पचनी पडत नाही.
समाजात सर्व स्तरात स्त्री शक्तीने आज आघाडी घेतली आहे. त्यांचं असण समाजाला पूरक आणि प्रेरक आहे त्यात वाद नाही. बऱ्याच स्त्रियांचे काम उल्लेखनीय आहेत. अश्या स्त्रियांचा गौरव नक्कीच व्हायला पाहिजे, तो आम्हाला प्रेरक आहेच. काही गरजू गरीब स्त्रियांना लागेल ती मदत करणे हे पण समाजाच कर्तव्य आहे. अश्या उत्सवप्रसंगी त्यांना पुढे आणणं ही काळाची गरज आहे. तरच ह्या सणाचे औचित्य साधले जाईल. आणि स्त्री शक्तीचा मान राखला जाईल.
अथर्वशीर्षात सुद्धा ह्याचा उल्लेख आहे!!
ll प्रकृतये पुरुषात परं ll
एवं ध्यायती यो नित्यम स योगी योगीनां वरा ||
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈