डाॕ संगीता गोडबोले

परिचय 

डाॕ संगीता गोडबोले, बालरोगतज्ञ कल्याण येथे तीस वर्षे प्रॕक्टिस.

  • कोरोना काळात रुक्मिणीबाई रुग्णालयात मार्च २०२० ते आॕगस्ट २०२० पर्यंत कल्याण डाॕक्टर आर्मीतर्फे काम केले.
  • गेल्याच वर्षी ‘मनस्पर्शी’ हे ललितबंधांचे इ बुक इ साहित्यने प्रकाशित केले. सकाळ, कुबेर, आहुती, कल्याण नागरिक दिवाळीअंकात लेखन. कविता लेखन. त्यांच्या एका कवितेचे गाणे आशुतोष कुलकर्णी या संगीतकारांनी केलेय.
  • संगीतकारांवरील ‘सृजन परंपरे’चा एक वर्षाचा प्रवास यावर असलेल्या डॉक्युमेंटरीचे संहितालेखन त्यांनी केले आहे.
  • लोकमत मध्ये लेखन, ‘ख्याल’ या पारनेरकर ट्र्स्टच्या संगीत व कलाविषयक त्रैमासिकासाठी लेखन.
  • नव्या वर्षात दर रविवारी महाराष्ट्र टाईम्स ठाणे पुरवणीत ‘मी शब्दसखी’ या नावाने लेखमाला येतेय.
  • पहिला लेख तीन जानेवारीला आलाय. ही मालिका वर्षभर चालेल.
  • शास्त्रीय संगीताची आणि नाट्याभिनयाचीही आवड आहे. सोलापूर येथे राज्यनाट्य स्पर्धेत १९८७ – ८८ साली उत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले होते.
  • आॕल इंडिया रेडिओ अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्वलिखित ललितबंधांचे सातवेळा वाचन.

 ☆ विविधा ☆ परब्रह्म ☆ डाॕ संगीता गोडबोले ☆ 

परब्रम्ह म्हणजे काय गं आई???

५/६ वर्षाची असताना आईला विचारलं होतं ..

क्षणभर ती चमकली होती या अनपेक्षित प्रश्नानं ..पण नेहेमीप्रमाणे जरी माझ्या आकलनापलीकडे असले तरी मला समजणाऱ्या भाषेत तिने समजावले होते..

म्हणाली डोळे मीट आणि मला देव दिसतोय असा विचार कर. काही दिसले??

नाही गं आई …काहीच नाही…..

मग आता दत्तगुरु दिसताहेत असा विचार कर….

ब्रम्हा विष्णू महेशाची सगुण साकार देवघरातली दत्तगुरुंची मूर्ती आली मनःचक्षूपुढे ..अगदी त्यांच्या  चार श्वान आणि गाईसकट…

मग म्हणाली आता श्रीकृष्ण आहे समज.. काही दिसतय??

अधरावर बासरी घेतलेला, शिरी मोरपीस धारण केलेला सुंदर शामल कृष्ण दिसला ..रांगणारा बाळकृष्ण दिसला नि अर्जुनाला गीता सांगणारा त्याच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण दिसला..

रोज अठरा अध्याय मुखोद्गत म्हणणाऱ्या आजोबांनी भगवद्गीतेवरच्या श्रीकृष्णाची ओळख फार लवकर करुन दिल्याने ते रुप फार जवळचं नि ओळखीचं होतं.

मग म्हणाली ,आता पुन्हा प्रयत्न कर परब्रम्ह पहाण्याचा…अन् काय आश्चर्य …

कधी दत्तगुरु कधी कृष्ण येत राहिले डोळ्यापुढे…

आतून खोलवर काही गवसल्याचा आनंद…

म्हटल आई परब्रम्ह म्हणजे देव का गं?

म्हणाली, परब्रम्ह म्हणजे श्रद्धास्थान… ते कोणत्या रुपात आपण पहातो तसे दिसते. मूर्तीकडून अमूर्ताकडचा प्रवास …

मोठी झालीस की कळेल हळूहळू सारं… पण त्याच्या शोधात रहा…

८/९ वर्षांच्या अर्धवट वयात स्वामी स्वरूपानंदांच्या प्राणशिष्याने, वासुदेवानंद सरस्वतींनी  लावलेली समाधी पाहिली होती. कुंडलिनी जागृत करतात म्हणे.. दोन भुवयांच्या मधोमध पडलेला खड्डा दिसला होता मला. अत्यंत तेजःपुंज अशी त्याची छबी आजही स्पष्ट आठवतेय. दोन तास पूर्ण समाधिस्त अवस्था… मग बाहेर येताना कोणी मालकंस गा रे म्हटल्यावर मालकंस शोधण्यासाठी झालेली यजमानांची धावपळ… एक वेगळीच अनुभूती …

काय जाणवले ते सांगता येत नाही .पण फार छान वाटले होते. शांत वाटले होते. आजही त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही पण त्या  क्षणी  गवसलं होतं ते परब्रम्ह होतं का?

९वीत असताना स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वतींच्या तोंडून गीतेच्या १५ व्या अध्यायाचे निरुपण ऐकले होते तेव्हाही असंच शांत आणि काही गवसल्याचं समाधान होतं… ते परब्रम्ह  होतं का?

माझ्या उदरातून जन्म घेतलेल्या पिल्लांनी पहिल्यांदा आई म्हणून संबोधलं तेव्हा उचंबळून आलेल्या मनाला परब्रम्ह भेटलं होतं का???

वडीलांनी मृत्यूचे भय नं बाळगता अत्यंत समाधानाने अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांना परब्रम्ह भेटलं होतं का?

मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलेला एखादा पेशंट आपल्या पायांनी घरी चालत जातो तेव्हा मिळालेला आनंद म्हणजे परब्रम्ह भेटीचा आनंद का?

आज काहीसं वाटतय ..

अत्युच्च आनंदाची परिसीमा गाठणारी, परमेश्वराच्या जवळ नेणारी, अद्भूत शांती देणारी मनाची अवस्था म्हणजेच परब्रम्ह असावं …

त्याच्या शोधात जंगलात जाऊन अथवा हिमालयाच्या टोकावर समाधी लावून बसल्यावरच ते सापडेल असे नाही….

दैनंदिन जीवनातही परब्रम्ह भेटण्याचे अनंत प्रसंग येतात ..

फक्त ते शोधण्याचं कसब अंगी बाणवलं की परब्रम्हाशी भेट फार दूर रहाणार नाही….

शब्दसखी

© डॉ  संगीता गोडबोले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments