सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ पावसाची रुपं… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
पावसाची रुपं
“येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा “
पैसा घे पण ये बाबा!पैसा खोटा निघाला तरी चालेल पण तू येच.” असं खरच म्हणावं अशी दडी तू मारतोस तर कधी “थांब थांब,थोडी उसंत घे रे.” असाही बरसतोस.
शब्द म्हणजे काय; त्यांचा अर्थ काय हे कळण्याआधीच तू माझ्या मनात बरसू लागलास. आई -आजी बरोबर मी ही टाळ्या वाजवत तुझ्या संगे ताल धरला.माझ्या बोबड्या बोलाने आईचा घट आनंदाने भरुन वाहू लागला. गालावरून हात फिरवत आजीचे हसूही तिच्या कापर्या गालांवर पसरले.
थोडी मोठी झाले. पावसाची गाणी,गाण्यातले शब्द, शब्दांची गंमत समजू लागली.
‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’
मनातला भोलेनाथाला तथास्तु म्हणत हातात हात घालून तू माझ्या बरोबर खेळू लागलास. तुझ्याच साठलेल्या पाण्यात उड्या मारणं, डबक्यात साठलेल्या पाण्यातून मुद्दामच वेगानं सायकल चालवणं हे तूच तर मला शिकवलंस. कागदी नावा पाण्यात सोडून त्या बरोबर काठाकाठानं भिजत वाहतांना तूही माझ्या संगे मस्ती केलीस,हो ना?
टप टप थेंब वाजवत तू आलास की मी पाटी पुस्तक विसरून गारा वेचे,नाचे,खिदळे!! नक्कीच ते भोळे बालरुप तुलाही भावलं असावं. . . . . तरीही रंगीबेरंगी रेनकोटात मला लपेटून बोट धरून तू मला शाळेतही नेलेस! खोट नको बोलू!नवीन पुस्तकांचा वास तुलादेखीलआवडत असे.
‘पाऊस वाजे धडाडधूम
धावा धावा ठोका धूम
धावता धावता गाठले घर
पड रे पावसा दिवसभर ‘
बालबोलीतले हे कौतुक तुला देखील ऐकावेसे वाटे,काय ओळखलं ना बरोबर ?
बडबड गीतांचे अवखळ वय हळू हळू सरले. तुझे संगीत मनात गुंजी घालू लागले.
‘आला पाऊस मातीच्या वासात ग . . .
पहिल्या पावसाचा मातीचा वास मनाला वेड लावू लागला .पावसात भिजण्यापेक्षा पाऊस अनुभवण्याचा सुज्ञ पणा आला. तू कधी सर सर येतोस, कधी रिमझिम बरसतोस. कधी पाऊलही न वाजवता येतोस तर कधी तांडवनृत्य करतोस . कधी कडकडाटी गर्जन करतोस तर कधी वार्याबरोबर सगळ्यांची दाणादाण उडवत येतोस.तुझी रुपे बघण्याचं, स्वत:तच रमण्याचं वय आलं. तू ही बालीश पणा सोडून खट्याळ झालास. आता तू माझी फजिती करु लागलास. कॉलेजला जाताना छत्री सांभाळत,कपडे सावरत,खांद्यावरची कंडक्टर बॅग लटकवत मी चालले की तू फिदीफिदी हसू लागलास. तू मुद्दामच वात्रट वार्याला माझी छत्री उलटी करायला सांगायचास. नेमकं सबमिट करायच जरनल तुझ्या मुळे चिखलात पडत असे. पण मी त्या गावचा नाहीच अस दाखवत तू तिथून पळ काढायचास.मी तुझ्या वर तेंव्हा रागावतच असे थोडीशी !
पण तेव्हढ्यात तू गात आलास . . .
‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’
माझ्यासाठी इंद्रधनुची कमान उभी करुन आलास. असे वाटले की या कमानीवरुन सहजपणे चढून आकाशातल्या तुझ्या अंगणात पोचेन. खोट नाही . . अगदी खरचं!
निळ्यासावळ्या टेकडीवरून माझ्या चित्तचोरासमवेत हातात हात घालून फिरताना त्या पाचूच्या बनात सप्तरंगी कमान घेऊन भेटलास. पुढील सुखद सहजीवनाची तार कानात झंकारत रिमझिम बरसलास.
. . . . . . . वर्षे सरली. . . बेलबॉटमचे, नेलपेंटचे दिवस गेले,हातात इवलीइवलीशी झबली टोपडी आली, बाळलेणी आली. तू भेटायला यायचास पण बाळाचे वाळत घातलेले कपडे काढण्याची माझी धावपळ! तुझी रुपे निरखण्यापेक्षा बाळलीला जास्त मोहवत होत्या ना! स्वेटर मोजे विणण्याचे दिवस आले व गेलेही. पुन्हा एकदा मुलांच्या बरोबर मी लहान झाले . गारा वेचत व नाव पाण्यात सोडत आई पण विसरून किशोरी झाले .जोरात तुषार शिंपडून हसलास ना खुशीत?
शीळ घालत,सायकल वर स्वार होऊन तू माझ्या मुलांच्या सवे घरात येऊ लागलास. मी हातात टॉवेल तयार ठेवू लागले . पण जुन्या आठवणीने ओठांच्या कोपर्यात किंचित आलेले हसू तू अचूक हेरलेस ना?
मोठे डोळे करून मुलांना दटावत असे मी! पण लेक्चर चुकवून मैत्रिणींच्या बरोबर तुझ्या तालात केलेली झिबांड झिम्मड झिम्म्याने मनात फेर धरलाच रे!
आता मात्र तू येतोस सुंठ,आलं,काढ्याचा वास घेऊन ! तुझ्या आगमनाची वर्दी देत मातीचा दरवळ येतो. . . मी मात्र घरात काढ्याचे साहित्य आहे ना याची खात्री करते. तुला अंगाखांद्यावर घेऊन चिंब भिजावसं वाटतं पण तुझ्या सरींबरोबर मनातल्या मनातच फुगडी घालते.
कानटोपी चढवून, शाल गुंडाळून बाल्कनीतून ,खिडकीतून तुला न्याहळत राहते. थरथणारे हात बाहेर काढून ओंजळीत तुला साठवते.
गारांना घेऊन थाडथाड पावले वाजवत येणार्या किंवा सरसर धुंदीत येणार्या तुझ्या रुपापेक्षा संथगतीने येणारं तुझं म्हातारं रुपच आपलसं वाटू लागलय हल्ली. . . . .
© सौ. दीपा नारायण पुजारी
१२/७/२०२०
इचलकरंजी
9665669148
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈