सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ पंडित जितेंद्र अभिषेकी -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर….., चंद्र व्हा हो पांडुरंग अशा छान छान गाण्यांना संगीतबुद्ध करणारे व स्वतः गाणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 सालीझाला.
गोव्याच्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथ पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले व प्रत्येक गुरूकडून जेवढे पाहिजे तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायन शैली त्यांनी निर्माण केली. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांना खूप आवडले.. उदाहरण द्यायचे झाले तर मैलाचा दगड ठरलेल्या “कट्यार काळजात घुसली “या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या” लेकुरे उदंड झाली”या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या “किरी स्तावांच्या तियात्र “नाट्य प्रकारातल्या संगीताचा त्यांनी वापरला या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी स्वतःसंगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या ” बिल्हण “या संगीतिकेत पु.ल. च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती तर” वैशाखवणवा” या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीत बद्ध केलेले “गोमू माहेरला जाते होनाखवा” हेगीत ही त्यांनी म्हटले. अनेक नाटकांना संगीत दिले.
एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली. ते गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कारभारतीचे सदस्य होते. त्यांनी चिपळूण येथील ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
त्यांची गाजलेली गानसंपदा….. अनंता तुला कोण पाहु…कबीर गुलाल उधळीत रंग..अभिरामा सुगंधाचा… अमृताची फळे… आम्हा न कळे ज्ञान… काटा रुते कुणाला.. कैवल्याच्या चांदण्याला….. गोमू माहेरला जाते हो.. तपत्या झळा उन्हाच्या.. दिवे लागले रे दिवे.. ध्यान करू जाता मन… प्परब्रम्ह भेटी लागी… पांडुरंग दाता.. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…. शब्दावाचुन कळले सारे.. सर्वात्मका सर्वेश्वरा… हरी भजना वीण काळ… हे बंध रेशमाचे.. हे सुरांनो चंद्र व्हा.. हे दीपा तू जळत राहा… विकल मन माझे झुरत.. स्वप्नात पाहिले जेते राहूदे… चंद्रा लेणी तुझी रोहिणी.. जा उडुनी जा पाखरा… इत्यादी.
आपल्या संगीतातील कार्याने अजरामर झालेल्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी7 नोव्हेंबर 1998 रोजी जगाचा निरोप घेतला.अशा या थोर गायकाला विनम्र प्रणाम!
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈