श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

पहिलं वहिलं…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 ‘पहिलं वहिलं,  देवाला वाहिलं’ असं लहानपणी ऐकायचो आम्ही. म्हणजे असं की बागेत लावलेल्या एखाद्या झाडाला पहिलं फळ आलं आणि ते पक्ष्यांचा तावडीतून सुटून आपल्यापर्यंत पोहोचलं तर ते आपण खायचं नाही . तर ते देवाला वाहायचं. का ?  तर तसं केल्यानं भरपूर फळं येतात म्हणे. !

आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद आपल्याला नकोय. मुद्दा एवढाच की पहिलं म्हणून त्याचं खूप खूप कौतुक. खरच ! काहीही असो, पहिलं म्हटलं की त्यात उत्सुकता, कौतुक, भीती, हुरहूर हे सगळं आलंच. ते पहिलेपण मनात घर करुन रहात असत. कधीतरी, कोणत्यातरी निमित्ताने आठवणींना उजाळा मिळातो आणि मग ते पहिलं वहिलं जे काही असेल ते आठवू लागतं.

आपली पहिली शाळा, पहिला वर्ग, पहिला बाक, पहिला मित्र, सगळं कसं सहजपणे आठवत जातं. शाळेचा पहिला दिवस, त्या दिवशीची आपली अवस्था आपल्याला आठवेलच अस नाही. पण घरातल्या वडिलधा-या मंडळींकडून कधी ना कधी तो समरप्रसंग आपण ऐकलेला असतो आणि आपल आपल्यालाच हसू येतं. आता मुलांना शाळेत सोडताना त्यांची होणारी अवस्था फार काही वेगळी असत नाही. कोणी हसत हसत शाळेला जात तर कोणी रडत रडत. कुणाला थोड्या वेळानंतर रडू येतं तर कुणी इतर सवंगड्यांकडून स्फूर्ती घेऊन रडू लागत. म्हणजे इतकी वर्षे लोटली तरी शाळेच्या पहिल्या दिवसाची अवस्था फार काही बदललेली नाहीच. मग डोळ्यासमोर येतो तो पहिला मित्र किंवा मैत्रीण. काहीतरी आमिषाने तरी आपण एकत्र आलेले असतो किंवा काहीतरी जरूरी म्हणून. पण मग हळूहळू होणा-या  या ओळखीतून मैत्रीचं बीज केव्हा रूजतं समजतही नाही. पुढे मोठेपणी हा मित्र आयुष्यभर आपल्या बरोबर असेलच असे नाही. पण त्याची आठवण, मिळून केलेला अभ्यास, केलेला दंगा हे मात्र आपल्या जवळच असतं. मग मोठेपणी कधीतरी आपण त्या शाळे जवळून जातो. कधी कुणाला सोडायला तर कधी आणायला. तेव्हा त्या जुन्या खुणा आपल्याला खुणावीत असतात. शालेय जीवनातल ते पहिलेपण पुनःपुन्हा डोळ्यांसमोर येत असतं. शाळेत असो नाहीतर नंतर काॅलेजात असो, आपण मिळवलेलं पहिलं बक्षीस, सर्वांनी केलेलं कौतुक, काॅलेजच्या मॅगझिन मधून छापून येणारी पहिली कविता किंवा कथा, स्पर्धेतील पहिलं भाषण, नाटकातला पहिला अभिनय, संगीत सभेतलं पहिलं गाणं; हे सगळं सगळं खर तर इतकं सुखावणारं असतं की त्यातून बाहेरच पडू नये असं वाटतं. या प्रत्येक पहिलेपणाच्या वेळेला केलेली धडपड, मनावर आलेलं दडपण, मनात असलेला संकोच, या सगळ्यानंतर मिळणारं यश आणि त्यामुळं पुढचा प्रवास ! पण कधी कधी पहिलं अपयश, पहिल्यांदा झालेली फजिती, लोकांसमोर पहिल्यादा बोलताना लटपटणारे पाय आणि उलटसुलट फेकलेली वाक्य, मॅच चालू असताना मस्त पोज घेऊन सुद्धा उडणारा त्रिफळा ! हे सारं आठवलं की आता मात्र हसू येतं. पण पहिल्यांदा ते झालं नसतं तर इथवर आलो तरी असतं का हा ही विचार मनात येतो आणि त्या पहिले पणाचही कौतुक वाटायला लागतं.

आपलं पहिलं पाऊल कसं पडलं, कुठं पडलं हे आपल्याला नाही आठवणार. पण घरातल्या बाळाची पहिली पाऊलं पडू लागली की आपल्याला होणारा आनंद आपण टाळ्या वाजवून साजरा करतोच ना ?बाळाचे पहिले बोबडे बोल त्याच्या मुखातून बाहेर पडल्या बरोबर त्याचा अर्थ आपल्याला नाही समजला तरी ते ऐकून, एखादे  सुरेल गीत ऐकण्यापासून मिळणारा आनंद आपल्याला होतोच की नाही. ?सायकल शिकताना पहिल्यांदा फोडून घेतलेले  गुडघे आणि नंतर शिताफीन चालवलेल्या सायकलची मजा आठवली की अजूनही हवेत तरंगल्यासारखं होतं. पहिल्यांदा जिंकलेली क्रिकेटची मॅच म्हणजे आपल्या दृष्टीनं वर्ल्डकप जिंकल्यासारखचं असतं. पहिल्यांदा केलेला चहा, तो कडवट झाला असला तरी किंवा अगदी बासुंदी झाली असली तरी, सगळ्या घरात कौतुकाचा विषय झालेला असतो. बहिणीने केलेल्या पहिल्या चपातीतून जगाच्या नकाशाच्या दर्शन झालं तरी चेष्टा करत करत का असेना, कौतुकाची थाप पडत असतेच !

पहिल्या पदवीच कौतुक तर काय सांगायलाच नको. बेकारातआणखी एकाची भर हे काही महिन्यांतच कळतं. पण पदवी मिळवताना मात्र आपण खूपच ‘उच्च विद्याभूषित ‘ झाल्याचं  समाधान असत. पुढे तो पहिला दिवस नोकरीचा असो किंवा व्यवसायाचा. नवे लोक, नवे विश्व,  नवी आव्हानं. आपण मात्र काल पर्यंत होतो तसेच असतो या पहिल्या दिवशी ! सगळेजण आपल्याकडे बघताहेत अस वाटत असत. प्रत्येक गोष्ट नव्याने शिकून  घेताना पुन्हा पहिलेपणा येतोच. शिकण्याशिवाय तर पर्याय नसतो. शिकायची उत्सुकता ही असते. अशा संमिश्र अवस्थेत ते पहिलं वहिलं चाचपडत पुढे जाणं चालूच असतं. मग पहिला पगार, पहिल्यांदा मिळणारी बढती, पहिली बदली, त्यानिमीत्ताने येणारे पहिले पहिले नवे नवे अनुभव, या प्रत्येक पहिलेपणात कमालीच उत्सुकता असते. मग ओढ असते ती एका नव्या प्रवासाची. प्रथमच नजरभेट होते कुणाशी तरी आणि चुकतो ठोका काळजाचा. ही झालेली पहिली ‘चूक’ आयुष्यभर जपण्यासाठी मात्र धडपड सुरू होते.

किती आणि काय काय आठवत जावं यालाही काही मर्यादा नाहीत. स्वतःच्या हातांनी लावलेलं पहिलं झाड. त्याला येणार पहिलं फूल. स्वतःच्या माडाला येणारा पहिला नारळ असो किंवा आंब्याच्या झाडावर दिसू लागणारी पहिली कैरी असो. फळ खाण्यातल्या आनंदापेक्षा ते आलय याचाच आनंद मनस्वी असतो. पहिला रेडिओ घरात येणार म्हणून तो ठेवण्यासाठी घरातल्या जुन्या लाकडी टेबलाची केलेली स्वच्छता, मग रेडिओची जागा पहिल्या टि. व्ही. ने घेताना तो खोलीत कुठे ठेवावा यावर झालेली चर्चासत्रं, पहिला लँडलाइन फोन येताना ‘ त्याची आवश्यकताच काय ‘ इथपासूनच्या शंका.  एक ना दोन. पहिली दुचाकी खरेदी करताना तिच्यासाठी घातलेल्या पायघड्या(की चाकघड्या म्हणू ?), खूप प्लॅनिंग करून घेतलेली चारचाकी, पहिल्या परदेश वारीसाठी केलेली मानसिक तयारी, त्यासाठी पचवलेले उपदेशांचे डोस आणि सूचनांचा मारा. सगळं सगळं आठवलं की त्या पहिलेपणात किती अप्रूप होतं याच कौतुकच वाटायला लागतं.

कुणाच्याही आयुष्यात घडणा-या या घटना. यात जगावेगळं  ते काय असतं? माझ्या आयुष्यात घडलं तसच थोड्याफार फरकानं तुमच्याही आयुष्यात घडतं. पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात ते पहिल्यांदाच घडत असत म्हणून त्याच कौतुक जगावेगळं असतं. उन्हाळा असह्य झाल्यावर, खूप खूप वाट पाहिल्यावर येणा-या पहिल्या पावसाचा जो आनंद असतो, अगदी तसाच आनंद या पहिलेपणात असतो. ते सगळं आठवत बसलं की नकळत डोळ्यातला पाऊस सुरू होतो.  गोड आठवणींच्या सरी घेऊन बरसत राहतो मनावर .  हळूहळू शांत होतं मन. पहिल्या पावसानंतरच्या तृप्त झालेल्या धरित्रीसारखं !

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments