? विविधा ?

🌼 पाऊलं खुणा 🌼 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

– आज घरं कसं रिकामं-रिकामं वाटतं. अगदी पाहुणे येऊन गेल्यावर वाटत तसंच!मनंही थोडं उदासच.

श्रावण कधी संपला कळलंच नाही.

अन् आतां किती पटकन् गौरी-गणपती आले अन् गेलेही. खरंच, रोजच्या दिवसाला कशी चक्र॔ लावलेली असतात नाही?तरी, त्याच्या पाऊलखुणा असतातच.

आमची एकुलती एक लेक सासरी गेली अन् घराबरोबर मनंही उदासलं.

तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आपणही श्रीमहालक्ष्मी म्हणजे ‘गौराई ‘आपल्या घरी आणायच्या. ‘श्रीगणेशा’बरोबर  ‘गौराई’म्हणजे, आनंदाची पर्वणीच!

आज किती वर्ष झाली, प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने, गौरी -गणपती घरी आणल्या. त्याच्या येण्यानं जणूं दूरदेशी गेलेला मुलगाच भेटायला येतो. लाडक्या लेकी ‘ गौराई ‘माहेरपणाला येतात., असंच वाटत. आमची लेक मदतीला येते., नातवंडही यायला लागली. मग सगळा उत्साहच!

वाजत गाजत गणराय मखरात बसतात. ‘गौर’ कशाच्या पावलांनी आली–समृध्दीच्या, . धनंधान्यांच्या..

विद्येच्या.. आरोग्याच्या.. पावलांनी आली, म्हणत घरभर, हळदी-कुंकवाच्या पावलांवरुन या गौराई फिरवून आणायच्या. छानशा आराशीत, मखरात बसवायच्या. नवीनसाड्या-दागिन्यांनी सजवायच्या. बाजूला अखंड तेवत राहील अशी समई ठेवायची. पुढे ओटीचे खणं, फळं, हळदी-कुंकवाचे करंडे,

कुंची घातलेलं त्यांच बाळ अन् धान्याच्या राशी, फराळाची तबकं, सुरेखशी रांगोळी, याने सगळं मंगलमय होत जात. मग, नुसती धांदल, गडबड…, श्रीगणेश अन् गौराईची पूजा, नैवेद्य, आरती, ..सवाष्ण, ब्राह्मण.. याचा आनंद आगळाच!शब्दात न सांगता येणारा..

रात्री सगळं आवरल्यावर निवांतपणे गौराईपुढे ‘ लक्ष्मी स्तोत्र, गणरायाच्या पुढे अथर्वशीर्ष म्हणतांना डोळे पाझरु लागतात. गणरायात कधी मला लाड करवून घेणा-या, व. प्रसन्न हंसणा-या मुलाचा भास होतो, तर कधी.. घरादारावर मायेची सावली धरणारं प्रेमळ, वडिलधारी कुणी वाटत. गौराईंपुढे बसून एकटक त्याच्या डोळ्यांकडे पाहतांना वाटत.. अरे, ही तर आपली आईच दोन रुपातली!तिचीच प्रेमळ, धीर देणारी..

कधी वाटत या तर माझ्या लेकीच.. ज्येष्ठा-कनिष्ठा.. आमच्या लेकीसारख्या मनाची जागा व्यापणा-या, आईशी संवादून, सुख-दु:खाचे क्षणं वाटून घेणा-या, कां प्रिय सख्या?माहेर-सासरच्या आठवणी जागवणा-या.. श्रीमहालक्ष्मीचीच ही दोन रुप.. गौराई.. ! म्हणजे ‘स्त्री’रुपचं.

मग तीआई-जगज्जननी असो कि, सखी, लाडाची लेक असो, तीन दिवस कोडकौतुक करवून घेणारी माहेरवाशीण. !

नकळत डोळे टिपले जातात. मनं आनंदाने बहरतेच. मनांतले ‘सल’अलगद रिते होतात तिच्यापुढे.

मग कोण काय म्हणतंय याची चिंता कशाला?त्या सगळं पाहताहेत.. त्याच्या डोळ्यांच्या कोप-यात पाण्याचं तळं साठत. ओठांच्या पाकळीत हसूं उमलून सांडत आहे. हे सारे क्षणं फक्तं नी फक्त माझे अन् त्यांचेच! तीन दिवसांनी त्या, श्रीगणेशा’बरोबर आपला निरोप घेणार हेही माहित असत. ‘ पुनरागमनायच ‘ म्हणून त्यांच्यावर अक्षतां टाकतांना नेहमीच गळा भरुन येतो. सगळं छान पार पडल्याच समाधानही असत.

एक एक आराशीच्या वस्तू, फराळाची तबकं, जाग्यावर जातात. त्याच्या साड्या, दागिने पेटीत जातात. हळदी कुंकवाची धामधूम थंडावते. एक सुनंपण येत. वाटत..

त्या वळून पाहताहेत, आमच्या लेकी सारख्याच. !अन् नकळतं मनांत शब्द उमलतात…

नका खंतावू मनांत, 

एकमेकां आम्ही इथं..

तुमच्या पाऊलंखुणा,

घरंभर जिथं-तिथं..

घरंभर जिथं-तीथं..

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments