सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात. काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृदगंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो.त्यांची रिमझिम  माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं! पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात. अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करतात.

पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून  जातो.

मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देते. अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते  जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! मन मोर नाचू लागतो तेव्हा सुंदर आठवणींचा पाऊस आपल्या मनात भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. कधी मंद बरसत, कधी रिपरिप  तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments