श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
☆ प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
प्र सा द !
“प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही !’
आपण एखाद्या पूजेला कोणाकडे गेलो असता, तिथल्या यजमानांनी हसत हसत दिलेली ही प्रेमळ तंबी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. आणि जर ती पूजा “सत्य नारायणाची” असेल तर मग काय बोलायलाच नको ! कारण त्या पूजेचा जो प्रसाद असतो तो करण्याची एक विशिष्ठ पद्धत असते, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळे त्या प्रसादाला एक वेगळीच चव प्राप्त झालेली असते. गोडाचा शिरा करतांना जे पदार्थ लागतात तेच पदार्थ हा सत्य नारायणाचा प्रसाद करतांना लागतात, पण त्यांचं प्रमाण थोडं वेगळ असतं. त्यामुळंच की काय तो सारखा खातच रहावा असं मला वाटतं, पण प्रसाद हा प्रसाद असल्यामुळे तो निगुतीने पाडलेल्या छोट्या मुदीच्या रूपात, कागदाच्या द्रोणात आपल्या समोर येतो. अशावेळी मग मी धीर करून आणि सत्य नारायणाची क्षमा मागून, यजमानांकडे आणखी एक प्रसादाचा द्रोण मागून घेतो. पण जर पूजेचे यजमान आणि यजमाणिन बाई माझ्या जास्तच परिचयातल्या असतील तर मग माझी प्रसादाची चंगळ झालीच म्हणून समजा ! “वाहिनी काय तुमच्या हाताला चव आहे हो ! असा प्रसाद गेली कित्येक वर्ष या मुखात पडला नाही. निव्वळ अप्रतिम !” असं नुसतं बोलायची खोटी, की लगेच वाहिनीसाहेबांचा चेहरा, प्रसाद करतांना जसा रवा फुलतो तसा फुलतो आणि “भाऊजी एक मिनिट थांबा हं, मी आलेच !” असं म्हणून ती माऊली किचन मध्ये जाते आणि दोन मिनिटात माझ्या समोर प्रसादाचा डोंगर केलेली एक छान डिश माझ्या हातात देते. अशावेळी मग मी सुद्धा मानभाविपणे “अहो काय हे वहिनी, घरी जाऊन मला जेवायचे आहे, एवढा प्रसाद खाल्ला तर…..” “काय भाऊजी एवढ्याश्या प्रसादाने तुमची भूक थोडीच भागणार आहे? काही होतं नाही, आज थोडं उशिराने जेवा.” असं म्हणून दुसऱ्या पाहुण्यांच्या सरबराईला जाते. मग मी सुद्धा फारसे आढे वेढे न घेता त्या डोंगरूपी चविष्ट प्रसादाची चव, जिभेवर घोळवत घोळवत, माझ्या पोकलेनरुपी रसनेने त्याला आडवा करून मनोमन वहिनींना धन्यवाद देतो!
“भक्तांनो गडबड करू नका, रांगेत या! कितीही वेळ लागला तरी महाराज सगळ्यांना प्रसाद देऊन उपकृत करणार आहेत !”
लाऊड स्पीकरवरून महाराजांचा शिष्य सतत घोषणा करत होता. प्रचंड अशा उघड्या मैदानावर सामान्य भक्तगण रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, आलिशान अशा वातानुकुलीत तंबूमध्ये मखमली गाद्या गिरद्यावर बसलेल्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभा होता. कित्येक मैलाची पायपीट करून अनेक भक्तगण दुरून दुरून महाराजांची कीर्ती ऐकून आले होते. महाराजांची ख्यातीच तशी होती. कुठल्याही संकटातून महाराज त्यांच्या प्रसादाने भक्तांना मुक्त करत. अगदी ज्यांना मुलबाळ नाही त्यांना सुद्धा महाराजांच्या प्रसादाने मूलं झाल्याच्या बातम्या शहरभर पसरल्या होत्या. अनेक असाध्य रोग महाराजांच्या प्रसादाने बरे झाल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. अशा प्रभावी महाराजांचे दर्शन आणि त्यांचा प्रसाद घेण्यासाठी इतकी झुंबड मैदानावर उडणं साहजिकच होतं.
VIP लोकांची रांग वेगळी. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी मैदानाचा एक कोपरा राखून ठेवला होता. महाराजांचे अनेक शिष्य आणि शिष्या VIP लोकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत्या. मैदानाला जणू जत्रेच रूप आलं होतं. महाराजांच खटलंच तसं मोठं होतं !
कुणाचा बसलेला धंदा महाराजांच्या प्रसादाने पुन्हा उभा राहून नावारूपाला आला होता. एखाद्या बड्या सरकारी अधिकाऱ्याची बढती, बदली अडली असेल तर महाराजांच्या प्रसादाने ती मार्गी लागत असे. एवढंच कशाला मंत्री मंडळात खाते वाटप करतांना खात्या पित्या खात्यात वर्णी लागण्यासाठी सुद्धा अनके मंत्री महाराजांच्या प्रसादासाठी त्यांच्या पायावर लोटांगण घालीत ! महाराज म्हणजे जणू परमेश्वराचा अवतार आणि त्यांनी दिलेला प्रसाद म्हणजे जणू कुठल्याही संकटावरचा रामबाण उपाय असं समीकरणच झालं होतं !
मुलांनो, पुरे झाला तुमचा खेळ. मुकाट्यानं घरात या नाहीतर माझ्या हातचा धम्मक लाडूचा प्रसाद मिळेल बरं कां !
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर मुलांना किती खेळू आणि किती नको असं होऊन जात. अगदी दिवेलगणीची वेळ झाली तरी खेळ म्हणून संपत नाही त्यांचा. मग आईचा धम्मक लाडूचा प्रसाद चुकवण्यासाठी मुलं नाईलाजाने घराकडे वळत. कारण आईचा प्रसाद एक वेळ परवडला, पण तिने जर बाबांना सांगितलं तर मग आपलं काही खरं नाही हे तेंव्हाची मुलं चांगलंच जाणून असायची. त्यामुळे आईने बोलावल्यावर “पाचच मिनिटं” असं सांगून मुलं पुन्हा खेळायला लागायची.
आई बाबांच्या हातचा प्रसाद त्यावेळेस एक वेळ ठीक होता, पण शाळेतला गुरुजींच्या हातचा, हातावरचा छडीचा प्रसाद हाताला थोडे दिवस तरी जायबंदी करून जात असे, डोळ्यातून पाणी काढत असे. आणि गुरुजींच्या छडीच्या प्रसादाची जागा हाता ऐवजी पार्श्वभागावर आली तर उठता बसता त्या प्रसादाची आठवण होई. तेंव्हाचे गुरुजी पण हुशार. पार्श्वभागावर प्रसाद देतांना शाळेच्या गणवेशाची अर्धी विजार, त्या मुलालाच पुढून घट्ट ओढून धरायला सांगत आणि मगच छडीच्या प्रसादाचे वाटप करीत. एवढा प्रसाद खाऊन वर पुन्हा वर्गातल्या मुलींसमोर रडायची चोरी! कारण मुली काय म्हणतील याची मनांत भीती. आणि हे प्रकरण घरी कळलं तर, चेरी ऑन द केक प्रमाणे वडिलांच्या हातचा प्रसाद मिळायचा तो वेगळाच !
इति प्रसाद पुराणं समाप्तमं !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈