सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ पांगळेपण… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

भारत विकास परिषदेच्या सांगली शाखेने परवाच घेतलेल्या शिबिरात 138 दिव्यांगाना अत्याधुनिक मोड्युलर हात व पाय बसविले. अर्थात यात बऱ्याच इतर संस्था पण सहभागी होत्या. पण सांगलीतल्या या संस्थेत माझा भाऊ कार्यरत असल्याने माझी कॉलर जरा ताठ झालीच. त्याने सांगितलेल्या दिव्यांगांच्या एकेक गोष्टी ऐकून थोडं हळवं मन उदास झालं. पण ही माणसं किती चांगलं काम करताहेत याचं कौतुकही वाटलं.

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने त्याच वेळी माझ्या हातात आशा बगे यांचा मारवा कथासंग्रह होता. त्यातली पांगळी ही कथा वाचली. पांगळेपण फक्त शरीराचं नसतं ते मनालाही येत असतं. ग्रेस यांनी ते फार छान सांगितलं आहे. सत्यभामा व रुक्मिणी दोघीही मनाने पांगळ्या होत्या. कृष्णाचं प्रेम पारिजातकात शोधत होत्या. एकीला वाटलं मूळ असून काय उपयोग, फुलेच मिळाली नाहीत तर ! दुसरीला वाटले मूळच मिळाले नाही तर ही बेभरवशाची फूले काय कामाची! राधेला मात्र असं प्रेमाचं प्रतीक शोधावं लागलं नाही, ती स्वत:च कृष्णमय होऊन प्रेमाचं प्रतीक बनली.

आशा बगे यांच्या कथेत एक प्रथितयश कवी, त्याला भेटलेल्या एका उदयोन्मुख तरुण कवियित्रिला पुढे येण्यासाठी आधार द्यायचा असं ठरवतो. देतोही!आणि एका क्षणी तो तिला आपलं बोट सोडायला सांगतो, कारण त्याला वाटतं कि तिला आता आपल्या आधाराची गरज नाही. पण जेंव्हा ती प्रत्यक्षात बोट सोडून जाते, तेंव्हा त्या कवीला इतकं एकटेपण येतं कि तो विचार करू लागतो, नेमकं आपण तिचं बोट सोडलं कि तिनं आपलं बोट सोडलं ? पांगळेपण आपल्याला कां आलं ? 

ही अवस्था प्रत्येकजण अनुभवत असतोच. ज्या मुलांचं बोट धरून आपण त्यांना चालायला शिकवतो, त्यांचं बोट सुटतं तेंव्हा आपण पांगळे झालेलो असतो. आणि मग लाखभर अपेक्षांचं ओझं त्या मुलावर टाकतो. खरंतर आपण बोट ज्या हातानं धरलेलं असतं, तो हात हळूहळू त्याच्या खांद्यावर न्यावा. कारण मैत्र कधीच कुणाला पांगळं करत नाही. प्रेम, सहानुभूती, कणव या भावना पांगळेपण वाढवणाऱ्या असतात. अहंकार, मोठेपणा जपण्याची हौस, अधिकार गाजवण्याची गरज, दुसऱ्याच्या कमतरतांवर बोट ठेवण्याची सवय, दुसऱ्याचे दोष अधोरेखित करण्याचे प्रयत्न स्वतःलाच एक दिवस पांगळं बनवतात.

शरीराचं पांगळेपण घालविणारं कोणीतरी नक्की भेटेल पण मनाचं पांगळेपण आपलं आपणच घालवावं लागेल किंबहुना ते येणारच नाही याची काळजी घ्यावी लागेल, तसे आधीच प्रयत्न करावे लागतील.

मनके हारे हार है, मनके जीते जीत। 

कहत कबीर हरी पाइये, मनही की परतीत॥

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments