☆ विविधा ☆ फुशिमी इनारी ☆ सुश्री रूपाली दामले ☆
जपानला येऊन एकच आठवडा उलटला होता. कॉलेज सुरू न झालेली आम्ही रिकामटेकडी मंडळी ‘जपान फिरूया’ म्हणून सकाळी दोन तासांचा प्रवास करून क्योतो स्टेशन वर पोहोचलो. क्योतोला फार मोठा इतिहास आहे. टोकयो आधी तब्बल हजार वर्षे क्योतो जपानची राजधानी होती. त्यामुळे साहजिकच राजांचे राजवाडे, मंदिरे, जुनी घरे, बगीचे, स्तूप, इमारती यांनी क्योतो नटलेलं आहे. क्योतोच्या प्रत्येक गल्लीत, तिथल्या प्रत्येक जुन्या घरावर जपानी संस्कृतीची छाप पडलेली दिसते.
पोहोचल्या पोहोचल्या आमचा मोर्चा वळला तो ‘फुशिमी इनारी’ पाहायला. इनारी ही ‘भाताची’ देवता. ‘फुशिमी इनारी’ हे इनारी देवतेचं मुख्य मंदीर. जपानमध्ये भाताचं उत्पादन अमाप असल्यामुळे या देवावर लोकांची विशेष श्रद्धा आहे. जपानमध्ये ‘शिंतो’ नावाचा तिथेच उदयाला आलेला एक धर्म आहे. या धर्मात निसर्गातल्या प्रतिकांचं पूजन केलं जातं. ‘इनारी’ देवता हे त्यातलंच एक प्रतीक आणि कोल्हा हा त्याचा दूत. भाताच्या शेतातून मार्ग काढत हा दूत इनारीचे संदेश पोहोचवतो. मंदिराच्या द्वाराशी प्रचंड कमान आहे. मुख्य मंदीर डोंगरमाथ्यावर आहे. मंदीराकडे जाणारा पायरी रस्ता जंगलातून तर कधी डोंगरकड्यावरून क्योतो शहराचं विलोभनीय दृश्य दाखवत पुढे पुढे जातो. संपूर्ण डोंगराची प्रदक्षिणा या पायवाटेवरून चालल्यावर घडते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या संपूर्ण वाटेवर उभ्या असलेल्या केशरी कमानी. त्यांची संख्या जवळजवळ दहा हजार आहे. रस्त्यावरून चालताना सूर्यप्रकाशात केशरी कमानींचा रंग फार अप्रतिम भासतो.
या मंदिराच्या सुंदरतेमुळे येथे नेहेमीच गर्दी असते. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या जास्त. त्या गर्दीत किमोनो घातलेली जपानी स्त्री आणि केशरी कमानींसोबत तिचे फोटो काढणारा जपानी माणूस हमखास आढळतात. ‘फुशिमी इनारी’ हे जपानी माणसाच्या हृदयाशी आहे. येथील वातावरण आणि सुंदरता आपल्यालाही मोहात पाडतात.
© सुश्री रूपाली दामले
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुरेख मांडणी? खूप खूप शुभेच्छा रूपाली ताई.
माहितीस्पद लेख . जगातील कुठल्याही कोपऱ्यावर जा तिथल्या संस्कृतीमध्ये निसर्ग आणि प्राण्याला नेहमीच महत्व दिलं आहे .