☆ विविधा ☆ फुलपाखरु ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
पंख चिमुकले। निळेजांभळे
हालवुनी झुलते । फुलपांखरुं
मी धरु जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपाखरुं
फुलपाखरु
आपल्याला सगळ्यांनाच आकर्षित करणारा निसर्गातील एक घटक. नाजूक, रंगदार तितकंच नक्षीदारही ! लयदार हालचालीनं, मोहक रंगानं लहानथोर सगळ्यांना खिळवून ठेवणारा हा एक किटक. एका क्षूद्र, कुरुप सुरवंटापासून तयार होतो. निसर्ग, पर्यावरण तसंच जीवसंतुलन राखण्याकरिता अविभाज्य घटक.
खरच, केव्हढा चमत्कार ! काळ्या, काटेरी सुरवंटापासून इतका सुंदर अविष्कार !!
पंख जितके नाजूक, सुंदर, रंगीबेरंगी तितकीच मोहक हालचालही. त्याचं आयुष्यही क्षणभंगुर आणि त्याचं आकाशही इवलंसं. कोणत्याही रंगसंगतीत ते तितकंच आकर्षक. ऊण्यापुर्या चौदा दिवसांच्या त्याच्या छोटुल्या जीवनपटात उलथापालथ तरी किती? चौदा दिवस चार टप्प्यांमधे विभागलेलं. अंडी —->अळी(सुरवंट)—-> कोष—-> फुलपाखरु इवलुशा आयुष्यात कोषातील बंदीवासही ते भोगतं आणि अळीचा खादाडपणाही; हव्यासही.अती खादाडपणाची ती शिक्षा असावी का? नाही, नसावी. कदाचित नंतरच्या आयुष्यासाठी ते शिदोरी गोळा करत असावं. नक्कीच ! कारण निरागसपणान उडणारं फुलपाखरु, त्याचा ऊत्साह; त्याचं बागडणं; निसर्गाबरोबर एकरुप होणं; मकरंदपानाचा स्वार्थ साधताना देखील परागीभवनाचा आनंद फुलांना देणं हे सर्व बघीतलं की नक्कीच वाटतं की कोषात काही काळ बंदिस्त होणं ही त्याची शिक्षा नसेल . तर ती त्याची ‘ब्युटी ट्रिटमेंट’ असेल. त्यामुळंच तर काटेरी, खाजर्या, काळ्या सुरवंटाचं रुपांतर सुंदर, मनमोहक, आकर्षक फुलपाखरात होत असावं . स्वत:त आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर कोषात काही काळ बंदिस्त हो; अंतर्मुख हो असा संदेश तर ते देत नसेल ? म्हणूनच वरकरणी चंचल दिसणारं हे फुलपाखरु मला एखाद्या तपस्व्यासारखं वाटतं !!.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
फोन.नं ९६६५६६९१४८
email :deepapujari57@gmail.com
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈