सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ फॅमिली डॉक्टर… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

‘काल रातीला सपान पडलं, सपनात आला त्यो…. न् बाई म्या गडबडले.’ व्हय आक्षी असंच झालं. दिसभर फिरून फिरून त्येलाच बघायचं मंग सपनात बी त्योच येनार की…. मनात असतंय त्येच सपनात दिसतंय असं म्हणत्यात..तर काय म्हनंत होतो म्या?

आमचा ‘फॅमिली डाक्टर’ आलता सपनात… दिसभर थोड्या थोड्या यळानं येतोय तो टीव्हीवर… त्यो आला की बाया बापड्या पोरं सोरं समदी सरसावून बसत्यात टीव्ही म्होरं.. जनु ‘राजेश खन्ना’च आला…. काय तरी नवीन सांगनार म्हनून आमीबी कान टवकारून बसतोय. तोबी लय भारी… काय बाय सांगत बसतोय. कल वायदा केलेली गोष्ट आज होनार नाही उद्याची गोष्ट उद्याच्याला बघू….असं सांगतोय. आम्हीबी एका कानानं ऐकतोय दुसऱ्या कानानं देतोय सोडून…. सोत्ता काय करणार आहे, त्येचा पाढा वाचतोय.आमानी ‘हे करा ते करा’ असं सांगून निघून जातोय.

त्येचा एक मोट्टा भाऊ आहे तिकडं दिल्लीत…. त्यो एकटाच खुर्चीत बसून समजून सांगतोय समद्यास्नी.पर आमचा डाक्टर माणसाळलेला…. माणसांच्या गराड्यात असतूया. फॅमिली डाक्टर हाय ना आमचा?… लोकं बी त्याला लई पिडत्यात. त्याला लई प्रश्न ईचारत्यात. पर लई शांत गडी… न चिडता त्याच त्याच प्रश्नांची परतून परतून तीच तीच उत्तरं देतुया. सारखं ‘नियम पाळा’असं म्हनतोय. औषधोपचार काय बी करत न्हाई. निस्ता कीर्तनावर जोर हाय त्येचा… लई बेस सांगतोय कीर्तन….अजिबात भ्यायाचं नाही. धीर सोडायचा नाही.भगवंताला शरण जायाचं.आम्ही तुमची येवस्था चोख लावनार हाय असं म्हणून आश्वासन देतोय.लई चांगला हाय सभावानं…

त्येचा दिल्लीचा भाऊ गळ्यात टेटसकूप घालतोय. ह्यो घालत नाही. पेशंटला हात दिखून लावत नाही. पर पेशंटची नाडी बराबर ओळखली हाय त्यांनं. लई प्रशिद्ध आहे तो! एकलाच हाय पेशल. त्याला बघितलं की दुखनं पार पळून जातंय.भारी इंग्लिश बोलतोय. एकदम त्येला आमी म्हनलं “कसली कसली विग्लिश नांव घेतायसा,आमच्या काय ध्यानात राहत नाही.तर त्यांनं आम्हाला अगदी सादं करुन सांगितलं… ‘रेमदेसिविर’ इंजेक्शनला रामदेव म्हणायचं *क्वारंटाईन’ला कोरांटी म्हणायचं. आपल्याला अर्थ समजला म्हणजे झालं. परीक्षा थोडीच द्यायची आहे.” असं म्हनला.

टीव्हीमंदी फोटू येऊ दे, म्हनून लई जनं तेच्या म्होर म्होरं करत्यात.तोंडाला ‘टोपी’ घालून काय  सांगतोय ते आमच्या समदं काय ध्यानात येत नाही. त्यो कायम कुनाइशयी तरी तक्रार करत असतोय. पन कुनाचा संशोय घेतोय ते आमालाबी कळत नाही.

‘दिसला ग बाई दिसला’ असं म्हनत त्याची वाट बघनारे त्येला बघून हरखतात. टीव्हीसमोर तोंडं आ वासून बसत्यात . आमच्याकडं बघूनशान आमच्या बापयास्नी डोक्यावरली टोपी तोंडावर घ्या म्हनून आणि आमाला नाकाला पदर लावाया सांगतोय….

आम्ही परवा त्याला म्हटलं,”आम्हाला लई भ्या वाटतंय…” तर हसला अन् म्हनला “काय भ्यायचं त्यात? गेला की रोग पळून…”त्यो तसं म्हनल्यावर आमच्या मनातलाबी रोग पळून गेला की वं …त्याला बघूनच निम्मं दुखनं कमी हुतय म्हना की!आमच्यातली एक धटिंगण परवा त्येला म्हनाली, “काय वं डाक्टर, तुम्ही आजारी पडत नाहीसा कवा? त्यो हसला जोरात.. एवढ्या जोरात हसला की वादळ आलं.आमी घाबरलो.

“अहो मी पण माणूसच आहे तुमच्या सारखा.आजारी पडणारच की! पण मी नियम पाळतो. केव्हातरी नियम तोडला आणि आला रोग भेटीला… तेव्हाच त्यानं माझ्या कानात सांगितलेलं गुपित मी तुम्हाला सांगतोय.”

‘मुस्कट बांधा’ हेच ते गुपित हुतं… खरंच ‘देव मानूस’ हाय आमचा डाक्टर… आरारारा…. देवमानसाची उपमा दिऊन चुकलो की रं देवा….. शिरीयल मधला’देवमानूस’ मर्डर केलाय म्हनं आज …जाऊ दे…. आपण आपल्या डाक्टरला निस्त ‘देव’ म्हनूया.पर ह्योच देव ‘ज्योतीष सांगनार, भविष्य सांगणार’ असं म्हनत येतोय रातच्याला आणि पुढली समदी संकटं आमच्या म्होरं सांडून पायात साप सोडतोय. म्हनून तर आमास्नी गडबडाया हुतंय, ह्यो सपनात आला म्हंजी… दुसऱ्या दिवशी त्येला ईचारलं की सपनात येऊन ते काय सांगून गेलासा? समदं खरं हाय काय? तर हसला गालांत जीब घालून… “स्वप्न तुम्ही पाहिलं ना? मग तुम्ही सांगा मी तुम्हाला काय म्हणालो ते?”आमानी काय समजलं याची परीक्षा बघत हुता जनू…. सपान आटवून आटवून आमच्याबी डोस्कीचा भुगा झाला.

“हां, दुसरी लाट का काय म्हनलासा, त्यात आमी वाऊन जाणार… बुरशीवानी काय तरी व्हऊन जीव जानार… तिसर्‍या लाटंत आमच्या पोरास्नी जपाय पाहिजे…. समदं खोटं ना? मी बी काय ईचाराया लागले तुमानी. सपान सपानच असतय नव्ह? पर तुमी जाता जाता एवढंबी म्हटलासा ‘मुस्कट बांधा’ मग यातलं तुम्हाला कायबी हुनार न्हई….. म्हनालासा नव्ह?” पुना एकवार गडगडाटी हसला त्यो……’चक्रीवादळ’आल्यागत वाटलं.

चार रोज कुठं त्यो आलाच न्हाई.बेपत्ताच हुता.आमी मुस्कट बांधत न्हाई म्हनून चिडला वाटतं… म्हनून आमी पटापट मुस्कट बांधलं आणि बसलो घरात.तर आला बघा दार ठोठावत.. तो काय बोलायच्या आतच आमी त्येला ईचारलं, “काय डाक्टर कुठं होतासा चार दीस? तिकडं चक्रीवादळ आलंत तिकडे गेलंतासा वाटतं…..

कवाबी न चिडणारा त्यो अचानक चिडला.”त्या वादळाचा आणि माझा काही संबंध नाही. त्या विषयाचा मी डॉक्टर नाही.त्याची माहिती तुम्हाला दुसरे डॉक्टर सांगतील. वाटल्यास मी त्यांचा पत्ता तुम्हाला देईन. एका वादळानंच अगोदर माझं डोकं गरगरायला लागलं ते दुसरं वादळ कशाला बघायला जाऊ मी?….”

वादळाचा फटका अमानी बी बसलाय… डोस्कं गरगराया लागलय आमचं बी… असं म्हणून आमीबी टीव्ही बंद करून टाकला. ईषय कट म्हणजे ईषय कट….हुश्श… रामा!  शिवा!! गोविंदा!!!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments