☆ विविधा : बिलोरी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
उगवतीला पीतवसनाची आभा अलगद पसरत जाते अन् सृष्टी जागी होऊ लागते… दशदिशांत सामावलेला, अवघं चराचर व्यापून उरलेला अनंत रूपांतला कान्हुला आपल्या अंत:चक्षूंना जाणवू लागतो… पक्षांची किलबिल, झरे-नद्यांच्या प्रवाहांना बहाल करतो तो आपल्या बासरीतले सूर… नुकतेच भुईतून उगवलेले मौजेत डुलणारे कोंब, इवलुशी रोपटुली म्हणजे त्याच्यातल्या बाळलीलांना आलेलं उधाण… झाडांच्या पालवीतल्या कोवळेपणात, अनेक हिरव्या रंगछटांच्या पानांच्या सळसळीत, फुलांच्या मनमोहक सुगंधात, त्यांच्याभोवती रुंजी घालणाऱ्या फुलपाखरांच्या बागडण्यात ओसंडत राहातं त्याच्यातलं सळसळतं चैतन्य… गुरा-वासरांच्या डोळ्यांतल्या मायाळूपणातही तोच वसलेला…
विशाल पर्वत-डोंगररांगांतून फैलावते त्याच्यातली भव्यता… अथांग, शांत सागराच्या सखोलतेत विसावतो त्याच्यातला तत्ववेत्ता, खळाळत्या लाटांतून बहरणारा ‘तो’ म्हणजे रासलीलेतला आवेगी शृंगार अन् ओहोटीतल्या लाटांतून शांतावत जाणारा ‘तो’ म्हणजे त्याला अंतरी जपून ठेवणाऱ्या राधेच्या मनातलं त्याचं चिरंतन… ऋतूबदलात सामावलेली त्याच्या भावनांची आंदोलनं… झरणाऱ्या मेघसरींनी वसुंधरेला उल्हसित करणारा तो… प्रखर उन्हाच्या झळांतून ओसंडणारा त्याचा क्रोध आणि तो निमाल्यानंतर सुखावणारं शारदचांदणं घेऊन येणाराही तोच…
अस्ताचलाच्या भावविभोर क्षणांत मावळतीला आभाळभर सांडलेले रंग त्यानं मस्तकी धारण केलेल्या मोरपिसाचं नभदर्पणातलं प्रतिबिंब तर नव्हे!? असं वाटू लागतं आणि भूल पडत जाते ते निरखण्यात हरवून जाण्याची… हळूहळू ती रंगभूल साकार करत जाते यमुनेचा किनारा, रंगक्षणांत माखलेला घननीळ आणि त्याला डोळ्यांत साठवणारं अवघं गोकुळ… शृंगाराचं ते अद्भुत लेणं मनात अवतरत असताना भान हरपून जातं… अचानक त्याक्षणी तिथलेच होऊन जाताना यमुनेच्या तीरी चाललेल्या लगबगीत मन सामील होऊन जातं…
साक्षात मनभावन मनमोहन आपल्याला सामोरा आणि त्याच्या रंगांचं गारूड अनुभवण्यासाठीचं आपल्या जिवाचं आतुरलेपण, तो बिलोरी पीतवसन नवोन्मेष रोमारोमांत साठवून ठेवण्याची ओढ, त्या खट्याळ नजरेतले नाजूक सोनसळी संकेत टिपताना नुरलेपणातलं बेभानफूल माळण्याची अधीरता, त्याच्या ओठांवर रेंगाळणारी सानिका होण्याचा मोह आणि एका क्षणी अवघं तनमन कृष्ण झाल्याची जाणीव!…
अंतर्बाह्य व्यापणारा झंकार चैतन्यरंगाची उधळण करणारा आणि मनाच्या तारा छेडत राहून सौख्यधून अनुभवायला देणारा… तीच चाहूल त्यानं वेढून घेतल्याची, तीच खूण त्यानं त्याच्या रंगात माखून टाकल्याची आणि देहभान हरपवून त्याच्यात सामावून घेतल्याची!… तिथून पुढं बाकी रंगांचे रंग फिके पडत जात सावळरंगाचं देखणेपण अवतीभवती पसरत जातं… काळजाला चांदणभास देणारी शीतलता जाणवू लागते आणि अख्खं आभाळ नीरव शांततेत न्हात सावळरंग पांघरतं…!
त्या नीरवतेच्या कुशीत पहुडले असताना चेहरामोहरा नसलेलं कुणी काळजाचा ठाव घेत गालावर मोरपीस फिरल्याचे भास होऊ लागतात… आजूबाजूला एक धून विहरत असल्याची जाणीव होते… स्वत्व विरून जात मन त्या क्षणाच्या स्वाधीन होतं आणि आपल्यातल्याच त्याची नव्यानं ओळख पटते..
© सुश्री आसावरी केळकर-वाईकर,
चेन्नई
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈