श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ बलिप्रतिपदा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
बलिप्रतिपदा! दीपावलीच्या उत्सवातील हा तिसरा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. बलिराजाच्या स्मरणार्थ साजरा होणारा दिवस. कोण हा बलिराजा? पौराणिक कथेनुसार हा अत्यंत सत्वशील,दानशूर असा हा राजा. पण गर्वाने धुंद झालेला.तो दानशूर असल्याने दिलेला शब्द पाळत असे.त्याच्या या गुणाचा फायदा घेऊन भगवान विष्णूंनी त्याचे गर्वहरण केले.त्यांनी बटू वामनाचा अवतार धारण केला व भिक्षा मागण्यासाठी बलिराजाकडे गेले.त्यांनी त्याच्याकडे फक्त तीन पाऊले जमीन मागितली.बलिराजाने ती देण्याचे वचन देताच विष्णूने भव्य रूप धारण केले.एक पाऊल स्वर्गात,दुसरे पृथ्वीवर ठेवले व तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले.तेव्हा आपला शब्द पाळण्यासाठी बलिराजाने आपले मस्तक पुढे केले.या संधीचा फायदा घेऊन विष्णूंनी आपले पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले व आपले अवतार कार्य पूर्ण केले.मात्र त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांची कदर करून त्याला पाताळाचे राज्य देऊ केले व आपण स्वतः या राज्याचे द्वारपाल बनले.त्याच्या सद्गुणांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी म्हणून हा दिवस त्याच्या नावाने साजरा केला जाईल असे वरदानही दिले.तो हा दिवस.त्याच्या प्रजा हित कारक वृत्तीमुळे आजही ‘इडा पीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते.कितीही सद्गुण अंगी असले तरी एखादा दुर्गुण सुद्धा त्या गुणांवर मात करतो व विनाशाला कारणीभूत होतो याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
हा दिवस वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने व पद्धतीने साजरा केला जातो. खरे तर हा शेतक-याचा सण. शेतकरी झेंडूच्या माळांनी जनावरांचा गोठा सुशोभित करतात. काही ठिकाणी शेणाचा गुराखी, गवळणी, कृष्ण, पाच पांडव केले जातात.आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांचा बळीराजा केला जातो.तांदूळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. धनगर समाज आपल्या मेंढरांचे कौतुक करतो तर आदिवासीही आपल्या पशूधनाकडे विशेष लक्ष देतात. संपन्नतेच्या या दिवसांत ज्यांच्यामुळे संपन्नता आली त्या पशूधनालाही आनंदात सहभागी करून घेतले जाते. हीच आपली कृषी संस्कृती आहे.आपले सगळे सण उत्सव हे निसर्गाशी निगडीत असे आहेत आणि ते तसेच ठेवण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजेत.
उत्तर भारतात हा दिवस नवीन विक्रम संवत म्हणून साजरा होतो. तसेच काही ठिकाणी गोवर्धन पूजाही केली जाते. पक्वान्न व मिठाई मोठ्या प्रमाणात अर्पण केले जातात. त्यामुळे याला अन्नकूट असेही म्हणतात. काही ठिकाणी बलिराजा व त्याची पत्नी विंधावली यांचे चित्र काढून पूजा केली जाते.
याच दिवशी पार्वतीने महादेवाना द्यूतात हरवले.म्हणून ही द्यूतप्रतिपदा.
कृषी संस्कृतीतील नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात होण्याचा हा दिवस.व्यापारी मंडळीही आदले दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यावर प्रतिपदेला हिशेबाच्या नव्या वह्यांचे पूजन करतात व नवे आर्थिक व्यवहार सुरू करतात.नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने गुढी पाडव्याप्रमाणेच या दिवसाचे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत शुभ मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त. या मुहूर्तावर सोने तसेच नव्या वस्तुंची खरेदी, गुंतवणूक केली जाते. या शुभदिनी पत्नी आपल्या पतिला ओवाळते व ओवाळणीच्या रूपात पती पत्नीला भेटवस्तू घेऊन देतो. नव विवाहीत मुलीच्या माहेरी विवाहानंतरच्या पहिल्या दिवाळीला जावयाला व त्याचे आप्तेष्टांना बोलेवले जाते. त्यांचा विशेष आदर सत्कार केला जातो. भेटवस्तू दिल्या जातात. पहिली दिवाळी दिवाळसण म्हणून दणक्यात साजरी होते. बदलत्या काळानुसार भेटवस्तूचे स्वरूप बदलत गेले तरी त्यामागील भावना मात्र टिकून आहेत हेच आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.
हा दिवाळी पाडवा आणि नूतन वर्ष सर्वांनाच आनंदाचे ,सुखसमृद्धीचे जावो. निसर्गावर मात करण्यापेक्षा निसर्ग मित्र बनून आपल्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याचा संकल्प करू! शुभ दीपावली !
? ? ?
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈