ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन’?
☆ विविधा ☆ बकुळ ☆ सौ.दीपा पुजारी ☆
ते एक बकुळीचे झाड.
लहानपणीचं
छे! झाड कसलं? तो तर आमचा कल्पवृक्ष!!
किती आठवणी,किती रेशीमबंध विसावलेत याच्या सावलीत.
अल्लड बालपण,खेळकर किशोरपण आणि हो चैतन्यानं भारलेलं तरुण मनही यानंच जाणलं.
किती आनंद दिला या बकुळीनं!
किती गोष्टी शिकवल्या त्या गर्द हिरव्या पानपिसार्यानं.
रोज संध्याकाळी आई आम्हांला घेऊन बकुळीखाली जायची.माझ्या हातात सुईत ओवलेला दोरा असायचा. खाली पडलेली बकुळीची फुलं दोर्यात ओवली जायची.फुलाच्या सूक्ष्म छिद्रातून सुई ओवणं हे त्या वयात खूपच आव्हानात्मक होतं. एकाग्रता,कोऑर्डिनेशन, संयम आणि इतर अनेक.
या झाडानं कायकाय नाही शिकवलं?किंबहुना
बकुळीच्या रुपात आईनं शिकवलं. फारसं न बोलता, सुवासाची मुक्त उधळण करत बोलणार्या बकुळीनं मुग्ध संवाद शिकवला. नाजूक रेघांसारख्या पाकळ्यांनी संयोजनातून नियोजन करण्याचं कसब सांगितलं. वर्षभर हिरवी सावली देताना सोबत्यांना सावली देणारं शांतचित्त दिलं . वार्याच्या झोताबरोबर सलगी करून नागमोडी कड असलेल्या पानांनी सळसळणारी हास्यलहर चेहर्यावर आणण्याचं कौशल्य दिलं.
एवढंसं चिमुरडं,सावळंस,नाजूक रुप.कुठलाही आकर्षकपणा नसतांनाही सगळ्यांना वेड लावण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे . सुकलेली बकुळही आपला सुहास उधळतच राहते. या एव्हढ्याश्या फुलात एव्हढं सामर्थ्य कुठून येतं? जगण्याची सहज सुंदर अभिव्यक्ती आली कुठून?
केवळ स्वत:जगणं नाही तर;आनंदकंदाची उधळण करत जगणं,जगण्याचाही सोहळा व्हावा असं जगणं !!! निसर्गानं आपल्या अवतींभोवती खूप गोष्टी पेरून ठेवल्या आहेत.आपण यातून काय व किती घेतो यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. या सिमेंटचे जंगल निर्माण करण्याचा अट्टाहास असाच सुरु राहिला तर?मुलांना बागेत हुंदडण्याचा,मातीत खेळण्यातला आनंद कसा मिळणार ? मित्रांबरोबर खेळण्याची संधी मिळणार नाही का?ऑनलाइन शाळेत खडू फळ्याशी गट्टी कशी होणार ? खिडकितून दाखवायला चिमण्याच नाही राहिल्या तर काऊचिऊची गोष्ट कशी सांगावी या चिमुरड्यांना? मित्रांबरोबर पतंग उडवताना वार्यावर डोलणारं गवतफुलात भान विसरेल अशा रंगकळा असतात; त्या कशा दिसतील या बालचमूला? वार्याची पावरी वाजवणारं बांबूच बन कसं दाखवायचं या नव्या पिढीला?
डोंगर दर्या काय फक्त टी. व्ही वरच बघायच्या या मावळ्यांनी?
आज आलेला कोरोनाचा रोना थांबेलही. आकाश स्वच्छ होइल ही!तरीही आपण खडबडून जागं होणं अत्यंत गरजेच आहे. जुन्याच विचारांची
नव्यानं पेरणी करायला हवी. निसर्गात रमण्याचं,निसर्गात खेळण्याचं, निसर्गासवे वाढण्याचं शिक्षण घ्यायला हवं . नाहीतर . . . .
“घनदाट इमारतींच्या
अल्याड वा पल्याड
थकलेल्या चांदोबाला
मिळेल का कडुलिंबाच झाड?”
या ओळींचा प्रत्यय यायला वेळ लागणार नाही. चांदोमामाच्या गोष्टी शिवायच ही पिढी मोठी झाली तर? ही मुलं स्मार्ट असतील,बुध्दिमान असतील पण सिमेंटचे जंगल यांना भावना देईल का? आजूबाजूला निसर्गाच्या ऐवजी गॅझेटस् असतील तर माणुसकी संपूनच जाईल.म्हणूनच
अंगण आणि तुळशी वृंदावनाशी असलेलं नातं जपलं पाहिजे .सावळी बकुळ गंधीत होऊन बहरली पाहिजे .
© सौ. दीपा नारायण पुजारी
फोन.नं ९६६५६६९१४८
email :[email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप बारीक निरीक्षण करून लिहिले आहेत.????