सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बोलक्या भिंती….भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे 

भिंतीला कान असतात.  हो, खरंय! आणि त्या दोन कानांमधला चेहराही असतो. त्यावर नाक, डोळे,  गाल, कपाळ,  ओठ  सर्व असतं. त्यामागे अव्यक्त मनही असतं.

लहानपणी आम्ही वर्षातून एकदा बाबांच्या आजोळी जायचो. मोठ्ठा वाडा होता. पडवीतून पाच सहा पाय-या चढून गेलो की सोपा होता, तिथे  एक मोठा कडीपाटाचा झोपाळा होता. भिंतीवर खुंट्या,  आणि कोनाडे होते. कलाकृतींच्या फ्रेम्स होत्या. बटणांचे बदक आणि कापसाचा ससा.  कुणाची कलाकुसर कोण जाणे! खूप जुनी वाटत होती.

त्याकाळी भिंतीवरच्या खुंट्या हे टोप्या, पगड्या, फेटे,आजोबांच्या काठ्या,  कोट, बंड्या, छत्-या, यांचे निवासस्थान असे. शेतक-याच्या घरात खुंट्यावर टोपल्या, इरली,  कोयते, विळे, चाबूक,  शेतातली गोफण टांगलेली असे. जमीनदारांच्या घरात खुंट्यांवर,  भिंतींवर बंदुका,  घोड्यावरचे जीन, वाघाचे तोंड, हरणाचे कातडे,सांबराची शिंगे अशा वस्तू मालकांच्या शौर्याची व मर्दुमकीची ओळख देत. माजघरातल्या खुंट्यांवर लुगड्यांचे वळे, परकर, पोलक्यांच्या घड्या टांगलेल्या असायच्या. काचेच्या बांगड्या ही असत. परसदारीच्या सोप्याला खुंट्यांवर कोयता, रहाट, विळे  असत. एका खुंटीवर कै-या, चिंचा, पेरू पाडायची लगोरी रहाटाच्या मागे लपवून ठेवलेली असे. पालेभाजीच्या बुट्ट्या ही खुंटीवर असत. स्वयंपाकघरात खुंटाळीवर झारा, उलथने, डाव, चिमटा अडकवून ठेवत.

शहरातल्या घरातून खुंट्या छत्री, रेनकोट,  पिशव्या, मुलांची दप्तरे सांभाळत.

भिंतीतले कोनाडे ही नित्य लागणा-या वस्तू ठेवण्याची जागा. सोप्यातल्या कोनाड्यात चकचकीत पितळेचं तांब्याभांडं गार पाणी भरून ठेवलेलं असे. दुस-या कोनाड्यात पानदाणी,  माजघरातल्या कोनाड्यात फणेरपेटी,  सागरगोटे,  बिट्ट्या,  भातुकलीचा खेळ ठेवले जात.

अशा प्रकारे प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असल्याने घरातल्या प्रत्येकाला शिस्तीची सवय असे. कारण, घरातील जेष्ठ आजोबा आणि आज्जी यांची कडक, करारी, तितकीच प्रेमळ नजर सर्वांवर असे.

पूर्वीच्या भिंतींना मातीचा गिलावा असे. त्यामुळे नैसर्गिक रित्या घरात गारवा असे.

अशा शिस्तीच्या,  स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या पण तितक्याच एकमेकांच्या सहवासात प्रेमळपणे रहाणा-या अनेक सदस्यांचा परिवार प्रत्येकालाच साहचर्य,  सुखवस्तुपणा, याबरोबरच शारिरीक, मानसिक व भावनिक सुरक्षितता देत असे. जे पुढील काळात दुर्मिळ झाले.

क्रमशः…

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments