सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ बोलक्या भिंती….भाग 6 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
अंदमानच्या कारागृहाच्या भिंती मात्र स्वतःला धन्य समजत असतील. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना तिथे बंदिवासात ठेवलं होतं.त्यांच्या कर्तृत्वाची आणि कवनांच्या शब्दांची उंची इतकी भव्यदिव्य होती की ती कारागृहाच्या भिंती भेदून, छत फाडून गगनस्पर्शी झाली. कारागृहाच्या भिंतीही तेजःपुंज आणि पवित्र झाल्या.
या सृष्टीमध्ये निर्जीव वस्तूला सजीवता देऊन अमरत्व प्राप्त होण्याचा मान कुणाला मिळाला असेल तर तो छोट्याशा भिंतीलाच. ज्ञानतपस्वी श्री चांगदेवयोगी वयाच्या 113व्या वर्षी जेव्हा वायुमार्गाने वाघावरून
ज्ञानेश्वरांना भेटायला आले, तेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह छोट्याशा भिंतीवर सकाळी बसले होते. त्रिकालज्ञानी ज्ञानमाऊलीने बसलेल्या भिंतीलाच त्यांना सामोरे जाण्याची विनंती केली आणि ती निर्जीव भिंत आपले निश्चलत्व टाकून चारी भावंडांना आकाशमार्गे चांगदेवांना भेटायला घेऊन गेली. ते बघता क्षणीच चांगदेवांना अहंकार गळून पडला आणि त्यांनी चारी भावंडांच्या पायी लोळण घेतलं. ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत अमर झाली.
ही कथा आजच्या युगात अविश्वसनीय वाटेल , पण तेव्हा तसे घडले होते, हे खरे मानले तर ज्ञानेश्वरांचे देवत्व आणि भिंतीला मिळालेले सजीवत्व व अमरत्व हे ही खरे वाटू लागते.
अशा या भिंती, बोलक्या आणि मुक्या सुद्धा! स्वतःचे अस्तित्व दाखवणा-या, ख-या, सुंदर, सकारात्मक आणि आनंदी. सर्वच भिंती अशाच असाव्यात यासाठी आपण प्रयत्न करूया. हो! फक्त घराच्याच नाही तर मनातल्या सुद्धा……
समाप्त…..🙏🏻
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈