श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

बाळा मला समजून घेशील ना ? ☆ श्री विश्वास देशपांडे

(नुकतेच अमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. ते कितपत यशस्वी झाले याबद्दल वेगवेगळी मते/वाद ऐकायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर माझा पूर्वी लिहिलेला हा लेख)

रात्रीची शांत वेळ. शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठी येऊन बसतो. गोदामैया शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचे छान प्रतिबिंब पडलेले असते. आजबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गॊदामैयाचे हे रूप मला भावते. दिवसभर तिच्या काठाशीही वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात,श्रीमंत, गरीब, लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात. पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही. पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावसं वाटत नसलं तरी यावेळी ती आपलं मन मोकळं करते. 

असाच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती. पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, ‘ आलास. ये. बैस जरा. तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्या आधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळ्या असलो तरी माझा आणि तिचा आत्मा एकच आहे. तू माझ्याकडे जसा हक्काने येतोस, तसाच तिच्याकडेही जा. तिची थोडी विचारपूस कर. मग पुन्हा तुझ्याशी बोलायला मी आहेच. ‘ मी म्हटलं, ‘ माई, तू काळजी नको करुस. मी जातो लगेच तिच्याकडे आणि तिला काय हवं नको ते पाहतो. ‘ 

मी गेलो. खरंच भरजरी वस्त्र लेऊन एक कुलीन, घरंदाज स्त्री उभी होती. कपाळावर कुंकवाचा टिळा होता. मुद्रेवर न लपणारं विलक्षण तेज होतं. मी तिला प्रणिपात केला. म्हटलं, ‘ मला गोदामैयाने पाठवलं तुमच्याकडे. कोण आपण .? मी आपल्याला काही मदत करू शकतो का ? 

क्षणभर ती माऊली स्तब्ध होती. मग म्हणाली, ‘ असं परक्यासारखं नको बोलूस रे. मी तुझी आईच आहे. एका आईनं तुला जन्म दिला. मी तुला शब्द दिले, भाषा दिली. शेतामध्ये धान्य पेरतो. नंतर ते अनेक पटींनी परत मिळतं. तशी लहानपणापासून तुझ्या अंतरात मी शब्दांची पेरणी केली. ती भाषेच्या रूपाने तुझ्या लेखणीतून, वाणीतून प्रकट झाली. आता तरी लक्षात आलं ना की मी कोण आहे ते ! 

‘ होय माते, तू तर माझी माय. माय मराठी. मला लक्षातच आलं नाही आधी. मला क्षमा कर. ‘ 

‘ असू दे लेकरा. चालायचंच. तुझा काही दोष नाही त्यात. ‘

पण माते मला सांग, तू आता इथे कशी काय ? 

अरे तुझ्या लक्षात नाही आलं का ? दोन तीन दिवस इथे साहित्य संमेलन होतं ना…! म्हणून आले होते खूप आशेने !

‘ पण माते मला सांग तुझी ही अशी अवस्था कशानं झालं ? तुझ्या अंगावरचा हा भरजरी शालू कशानं फाटला ? माये, तू तर श्रीमंत, धनवान. तुला कशाचीच कमी नव्हती. माझ्या ज्ञानोबा माउलींना तर तुझा केवढा अभिमान ! संस्कृतमधील गीता त्यांनी तुझ्यारूपाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ज्ञानोबा माऊली म्हणाली, ‘ माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ‘ खरंच माऊलींच्या शब्दाशब्दातून अमृताचे थेंब ठिबकत होते. म्हणूनच माऊलींनी तो वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरी नंतर ‘ अमृतानुभव ‘ लिहिला. माऊलींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका ‘ ज्ञानेश्वरी ‘ ऐकताना श्रोत्यांनी जे श्रवणसुख अनुभवलं त्याला तोड नाही. उपमा नाही. सर्वांगाचे जणू कान झाले. पुढे तुकोबांनी अभंग लिहिले. त्याची गाथा झाली. तुकोबांच्या मनाला भिडणाऱ्या तरल अभंगांनी इंद्रायणीसारखंच मराठी मनाला भिजवून चिंब केलं. समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला. मनाचे श्लोक सांगून मनाला बोध केला. शिवरायांना ‘ जाणता राजा, श्रीमंत योगी, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत….’ अशी विविध सार्थ विशेषणे लावून तुझ्या श्रीमंतीचा प्रत्यय आणून दिला. 

संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी संतांनी तुझं वैभव वाढवलं. आमची निरक्षर असलेली बहिणाबाई इतकं सुंदर काव्य बोलली की भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान तर काय सांगावं…! त्यांच्या शब्दात सांगायचं तर  तू म्हणजे स्वातंत्र्यदेवतेसारखीच आहेस. 

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली 

स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली 

तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूचि… 

या ओळी तुला सुद्धा लागू होतात. 

ग दि माडगूळकर, मंगेश पाडगावकर, भा रा तांबे, बा भ बोरकर यासारखे कवी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या अनेक लेखकांनी तुझ्या अंगावर विविध रूपांचा साज चढवला. कविवर्य कुसुमाग्रज, वि स खांडेकर, विंदा करंदीकर यांनी तर मराठी साहित्यात जी भाषेची समृद्धी, श्रीमंती आणली, त्यामुळे साहित्य अकादमीला तुझी दखल घ्यावीच लागली. कुसुमाग्रज तर मराठी मातीबद्दल बोलताना म्हणाले…

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

 काय बोलू, किती बोलू आणि कसं सांगू असं होतंय मला. आणि माते, तरीही तुझी आज अशी अवस्था ? ‘ 

‘बाळा, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे. पण या सगळ्या पूर्वसुरींच्या गाथा आपण किती दिवस गाणार ? आता आपण काय करतो ते अधिक महत्वाचं नाही का ? आणखी काही दिवस जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी अवस्था तू कल्पनाही करू शकणार नाहीस अशी होईल. अर्थात सुदैवाने मला माझ्या सुपुत्रांकडून आशा आहे. चांगले दिवस बघायला मिळतील याची खात्री आहे. पण त्यासाठी तुम्हाला हातपाय हलवावे लागतील रे….’ 

‘तू बघतोस ना की शाळांमधून दिवसेंदिवस मराठी भाषा हद्दपार होताना दिसते आहे. आवश्यक भाषा म्हणून काही शाळा नाईलाजाने शिकवतात ती ! मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. हिंदी, इंग्रजी या भाषांबद्दल माझ्या मनात आकस नाही रे. पण लहानपणी मुलांना वाढीसाठी आईचंच दूध चांगलं असतं नाही का ? लहानपणी मुलाला आईचं दूध मिळालं तर त्याचा शारीरिक, बौद्धिक विकास निकोप होतो….’ 

‘साहित्य संमेलनात माझ्या वाढीसाठी खूप काही प्रयत्न होतील अशी मनात आशा ठेवून मी आले होते. तशी माझी अगदीच निराशा झाली नाही. पण कसं होतं ना, घरात मुलाचं लग्न झालं, सून आली की आईची तशी उपेक्षाच होते. तिला आई आई म्हणून म्हटलं जातं . पण घरात होणाऱ्या निर्णयात तिचा फारसा विचार घेतला जात नाही. तसंच काहीसं झालं आहे… ‘

‘माझी एक खंत आहे, सांगू का ? ‘

‘हो, सांग ना…! मलाही जाणून घ्यायचं आहे. ‘ 

ही दरवर्षी जी साहित्य संमेलनं घेतली जातात ना, ती चांगलीच गोष्ट आहे. पण माझा जो वाचक आहे, साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक आहे त्याचा विचार कोणी करतं का ? मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय नेते जसं ठरवतील तसंच संमेलनाचं स्वरूप असतं. सामान्य माणसांचा विचार कुठे असतो त्यात ? मला राजकीय नेत्यांचं वावडं नाही. त्यांनी साहित्य संमेलनात जरूर यावं. पण केवळ एक रसिक म्हणून. व्यासपीठावर सारस्वतांचीच मांदियाळी असावी. संमेलनाची दशा, दिशा त्यांनीच ठरवावी. तुम्ही सगळ्या रसिक वाचकांनी ठरवलंत तर राजकीय नेत्यांची आर्थिक मदत घेण्याची गरज पडणार नाही. मला ते आवडतही नाही. कारण मग मूळ मुद्दे बाजूला राहतात. किरकोळ कारणांवरून हेवेदावे, धुसफूस होते. आरोप होतात. संमेलनाला गालबोट लागते. तुला म्हणून सांगते. जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम सुरु होते ना, तेव्हा मी व्यासपीठावर नव्हतेच ! तुमच्यामध्ये पण बसलेले नव्हते. मी उभी होते एका कोपऱ्यात. आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे कोणाचं लक्ष जातं ? उत्सव माझा, माझ्या नावानं सगळं पण उपेक्षित मीच ! तू जे मघाशी विचारलंस ना की हा भरजरी शालू कशानं फाटला, त्याचं कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल. नाही म्हणायला मला एका गोष्टीचा आनंद झाला. मराठी वाचकांचा टक्का वाढल्यासारखा मला दिसतो. कारण ग्रंथविक्री विक्रमी झाली…’ 

‘अनेक नवोदित कवी, लेखक नवनवीन साहित्य लिहून मोलाची भर घालताहेत. तरीही मला वाटतं की अजून उत्तमोत्तम, कसदार साहित्य निर्माण व्हावं. त्या साहित्याच्या वाचनाने नवीन पिढ्या समृद्ध व्हाव्यात. हे साहित्य संस्कार देणारं असावं, जगणं शिकवणारं असावं. सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडित गोष्टींची चर्चा साहित्यात व्हावी. त्याला त्यापासून मार्गदर्शन मिळावं. सामान्य रसिक वाचक केंद्रस्थानी ठेवून लेखक, कवींनी लिहितं व्हावं. मराठी मातीत जन्मलेले अनेक सुपुत्र अनेक उच्च पदांवर काम करत आहेत. कोणी शास्त्रज्ञ, कोणी प्राध्यापक इ. पण यातली बरीचशी मंडळी इंग्रजीत लेखन करण्यात धन्यता मानतात. त्यांनी आपले विचार सर्वसामान्यांसाठी मराठीत मांडावे… ‘ 

‘शासनाकडून मला फार अपेक्षा नाहीत. माझ्या अपेक्षा तुमच्यासारख्या माझ्या सुपुत्रांकडून आहेत. वाचक, लेखक, कवी यांनी मला समृद्ध करावे ही माझी अपेक्षा. साहित्य संमेलने व्हावीत ती तुम्हा सगळ्या रसिक वाचक, लेखकांच्या बळावर असे मला वाटते. त्यात उत्स्फूर्तता हवी, बळजबरीचा रामराम नको… ! बाळा, माझ्या मनातलं सांगितलं तुला. खूप काही बोलण्यासारखं आहे. पण सगळं सांगण्यातही अर्थ नसतो. समोरच्या व्यक्तीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे तरच सांगण्याला, बोलण्याला काही अर्थ उरतो. बाळा, घेशील ना मला समजून…? ‘ 

तिचे डोळे पाणावले होते. उरात हुंदका दाटून आला होता. मी तिच्या चरणांना वाकून स्पर्श केला. माझ्याजवळही आता शब्द नव्हते. मी फक्त एवढंच म्हटलं, ‘ आई, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण…’ तिचा मोरपिशी हात पाठीवरून फिरला. काय नव्हतं त्या स्पर्शात ! ज्ञानोबा, तुकोबा, सावरकर, कुसुमाग्रज आदी सर्व मराठी सारस्वतांचे आशीर्वाद त्यात सामावले होते. मी भारावून वर पाहिलं, तर माऊली अदृश्य झाली होती. गोदामाई शांततेत वाहत होती. माईला मनोमन नमस्कार केला. तिची मूक संमती घेऊन मार्गस्थ झालो. दिव्यांनी रस्ते उजळले होते आणि तारकांनी आकाश… ! 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments