सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
बघता बघता गणपतीचे दहा दिवस संपत येतात. दरवर्षी गणपती बाप्पा चे स्वागत आपण जोरात करतो आणि दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला त्याला निरोप ही देतो! “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात गणपतीचे विसर्जन होते. तो पाहुणा गणपती आपल्याला इतका लळा लावतो की त्याचे विसर्जन करताना खूप वाईट वाटते!
कोरोनामुळे गणपती उत्सवावर आलेल्या मर्यादा संपल्या आणि पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरात, डॉल्बी म्युझिक मध्ये गणपतीचे आगमन झाले! तसाही माणूस उत्सव प्रिय असतो. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धी दाता गणेश आणि शक्ती स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हीचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्हीचा उद्देश समाजात स्फूर्ती राहावी, जिवंतपणा राहावा, समरसता यावी असाच आहे!
पण अलीकडच्या काळात या उत्सवांना काही वाईट गोष्टींची किनार लागलेली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणूका, सजावटी मधील अतिरिक्त स्पर्धा तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवा दरम्याने होऊ लागल्या.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परमेश्वर तिथे हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटतं!हे आपल्या ला कोरोनाच्या निमित्ताने बघायला मिळाले. अजूनहीघरगुती गणपती बसवतात तिथे गणपतीचे पावित्र्य टिकवले जाते.. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी ही गणेशाचे पावित्र्य रहावे यादृष्टीने अनेक गोष्टी केल्या जातात. तरीही
काही वेळा स्वच्छतेसंबंधी गोष्टी लोकांकडून पाळल्या जात नाहीत. महानगरपालिका विसर्जनासाठी विविध ठिकाणी निर्माल्य कुंडआणि विसर्जनासाठी पाण्याचे टॅंक ठेवते, त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर असतो आणि महाराष्ट्रातच काय तर देश परदेशातही त्याचे महत्त्व फार आहे!
दरवर्षी अनंत चतुर्दशी येते, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी! पण काही वेळा हा दिवस अगदी लक्षात राहण्याजोगा गेला आहे,. जसे की लातूर, किल्लारीचा मोठा भूकंप अनंत चतुर्दशीच्या पहाटे झाला, हजारो लोक बेघर झाले, घरे कोसळली, लोक मृत्युमुखी पडले, पण त्या ठिकाणी सर्व समाजाने भरभरून मदत पाठवली. कधी कधी या काळात अतिरिक्त पावसामुळे पूर येणे, गावंच्या गावे पाण्याखाली जाणे यासारख्या घटनाही घडल्या. विघ्नहर्ता गणेशाने अशा काळात लोकांमध्ये एकमेकाबद्दल सहभावना निर्माण केली की ज्यामुळे लोकांना समाजभान आले. कित्येक ठिकाणी अशी संकटे येऊन गेल्यावर उत्सव खर्च कमी करून मदतीसाठी पैसा पाठवला गेला. श्री गजानन अशा गोष्टींना प्रेरित करत असतो असे वाटते..
वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दल चे राग, द्वेष, मतभेद याचे विसर्जन माणूस करतो. यासाठी दुर्वा या प्रतीकात्मक आहेत. दूर्वा किंवा हरळी जशी जमिनीला चिकटून वाढत वाढत जाते, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून हरळी प्रमाणे आपल्या समाज जीवनाचा विस्तार केला पाहिजे. दुर्वांप्रमाणेच चांगल्या भावना वाढीला लावल्या पाहिजेत! शाडू मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो पण ती माती विरघळून जशी पाण्यात तळाशी पुन्हा एकत्र येते, पुढच्या वर्षी नवीन निर्माणासाठी उपयोगी असते. तशीच आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची आणि चांगले निर्माण करण्याची राहण्यासाठी हा गणराया आपल्याला शिकवत असतो!
जाता जाता गणराया आपल्याला किती गोष्टी शिकवत असतो. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. लहान मुलाबाळां पासून सर्वांनाच गणपती बाप्पा जवळचा वाटतो. अलीकडे शाळांमध्ये सुद्धा गणपती स्थापन करतात. त्यानिमित्ताने अथर्वशीर्ष, गणपतीच्या आरत्या आणि काही स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येते. नकळतच मुलांवर चांगले संस्कार घडतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हा काही ना काही कारणाने धार्मिकते बरोबरच समाजाशी ही जोडलेला आहे. गणपतीचा संबंध बुद्धीशी जोडलेला असल्यामुळे सहाजिकच मुलांना बुद्धीदात्या गणपती बद्दल खूप प्रेम असते!
गणपती विसर्जनासाठी उचलल्यानंतर ती जागा रिकामी राहू नये म्हणून त्या जागी एखादे देवाचे पुस्तक ठेवायचे प्रथा आमच्या घरी होती. प्रत्येक गोष्टीबाबत आपल्या पूर्वजांनी इतका बारीक विचार केला आहे याचे विशेष वाटते!
असा हा गणपती बाप्पा विसर्जन करताना सर्वांनाच वाईट वाटते. यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोरभट” म्हणून वाचलेली एक कथा आठवते. त्यातील कथेतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन विषण्ण होत असे. पाट रिकामा घरी येऊ नये म्हणून त्या रिकाम्या पाटावर वाळू किंवा विसर्जनाच्या ठिकाणची माती घरी आणून तो पाट गणपती च्या जागी ठेवण्याची प्रथा आहे…
गणपतीचे विसर्जन म्हणजे त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीला आपण पुन्हा त्याच्या मूळ अवस्थेला म्हणजेच पाण्यामध्ये, मातीत रूपांतर करून सोडून देतो. गणपतीचे हे विसर्जन आपल्याला थोडे विरक्त व्हायला शिकवते. या गणपती प्रमाणेच आपल्याला सुद्धा एक दिवस या माती आणि पाण्यात विसर्जित होऊन जायचे आहे, हे जग सोडून जायचे आहे याची जाणीव मनापासून होत राहते! अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन होताना खरोखरच अंतरीचा उमाळा भरभरून वाहतो आणि आपण म्हणतो, “गणपती बाप्पा मोरया” पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला!”
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
मो. 8087974168
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈