सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ बाई म्हणून जगताना… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

मार्च महिना आला की वेध लागतात ते आठ मार्च “जागतिक महिला दिनाचे “. ” पहाटे अंथरुणावरून उठल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो. जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा….. शुभेच्छा… शुभेच्छा. “

महिलांच्या यशाचा, कर्तृत्वाचा गौरव दिवस. या दिवशी आमच्या बाई म्हणून जगण्याला एक वेगळाच रूबाब येतो. बाई म्हणून जगण्याचा एक अभिमान मनाला स्पर्शून जातो. आणि मनात येते एक विचारधारा ” बाई म्हणून जगताना “

मुलगी लग्न होऊन सासरी येते आणि कु. ची सौ. होते. तिच्या नावातील हा सौ. चा बदल म्हणजे तिच्या आयुष्यातील एक नविन टप्पा असतो. स्वतःवर पडलेल्या अनेक नवीन जबाबदारीतून ती मुलगीची बाई कधी होते ते स्वतःला सुध्दा उमगत नाही. लग्नानंतर जुन्या नात्यांची आठवण आणि नवीन नात्यांचे आगमन याचा मेळ घालत ती आपले बाईपण जपू लागते. परक्या घरून आलेली एक मुलगी बाई म्हणून जगणं स्विकारताना

अंगणातील तुळशीपासून ते स्वयंपाकघरापर्यंत सासरकडील घराला केंव्हाच नव्याच्या नवलाईने आपले मानू लागते. हे बाईपण एकदा स्वीकारले की, सुरू होतो तिचा नवीन जीवनप्रवास. कधी आपल्या कष्टातून, कधी जबाबदारीतून, कधी संघर्षमय वाटचाल करत तर कधी कर्तृत्वातून ती स्वतःला सिद्ध करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटते. घराची, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता कालांतराने तिच्या जगण्याला अनेक फाटे फुटतात. अनेक नवनवीन नात्यांची भर पडते. म्हणजे बाई म्हणून जगता जगता काळानुसार तिच्या डोक्यावरचा भार वाढतच जातो. संसाररूपी भवसागरात अनेक व्यापांनी बाई वेढली जाते. आर्थिक जबाबदारी पार पाडताना बाईला घरातून बाहेर पडून बाहेरच्या अनेक वाटा गवसतात. खेड्यातील बाई असेल तर घरातून बाहेर पडून तिची पावले शेताकडे वळू लागतात. शहरात राहणारी बाई कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास घरातून बाहेर पडून नोकरी करू लागते. आजच्या धावपळीत घर आणि रान किंवा घर आणि ऑफिस, नोकरी अशी दुय्यम जबाबदारी पार पाडत असताना बाईच्या वाट्याला येणारे कष्ट, यातना, मान-सन्मान, अपमान, अस्मितेचा प्रश्न, तिच्या अस्तित्वाची लढाई या सर्व गोष्टी तिच्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग झाला आहे. इतका सगळा संघर्ष झेलण्यास आज ती स्वतः सज्ज आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठळक ठसा तिने समाजमनावर उमटला आहेच. तिने गवसलेल्या या नव्या क्षितिजावर ती रममाण होते. संघर्षातून स्वनिर्मित केलेले अस्तित्व हा तिचा अधिकार आहे. आणि बाई म्हणून जगतानाचा स्वाभिमान सुध्दा आहे ” हा स्वाभिमान टिकवून ठेवण्यास ती सदैव तत्पर असते.

पुरुष माणसाचे काम हे एकमार्गी असते. कुटुंबासाठी पैसा निर्माण करणे. त्यासाठीची धडपड अशी एकच मुलभूत जबाबदारी त्यांनी स्विकारलेली असते. आपल्या एकमार्गी नेतृत्वातून पुरुष कुटुंबाप्रती आपली जबाबदारी पार पाडतात. पण बाईचे तसे नसते. तिचे हात अनेक कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेले असतात. अनेक रूढी परंपरांचे साखळदंड तिच्या पायी जखडलेले असतात. काही तिने स्वतः बांधून घेतलेले तर काही समाजाने अडकवलेले. यात ती कितीही थकलीभागलेली असली तरी कर्तव्य आणि जबाबदारीतून ती मागे हाटत नाही. अगदी अंथरुणावर पडे पर्यंत. रात्री अंथरुणावर पडली तरी पुन्हा ऊठून दरवाजा नीट बंद केला आहे का हे पाहूनच ती पुन्हा निवांत झोपते. आपल्या कुटुंबावर ती नितांत प्रेम करत असते. आपले बाईपण जपताना खऱ्या कसोटीत उतरते तेंव्हा ती स्वतःचे भान हरपून जगते. अगदीच आजारी असताना अंथरुणावर पडून असेल तरी सुध्दा ती आपल्या आजारपणापेक्षा ती कुटुंबाचा जास्त विचार करते. थकल्या-भागल्या, खचल्या मनाला बाई नव्याने उभारी देवून कंबर कसून भक्कम उभी रहाते. आपले घर सावरताना अथवा निटनेटके ठेवताना बाई अंतर्मनातून कितीही विस्कटलेली असेल तरीही ती मोठ्या जुजबी हातोळीने ती आपला घरसंसार सावरते. पुरुष जेंव्हा बाहेरून कामावरून किंवा ऑफिसमधून घरी येतात तेंव्हा ते घरी येऊन आरामशीर बसू शकतात. घरातले बाईमाणूस त्यांची चहापान वगैरे विचारपूस करते. पण बाईच्या बाबतीत असे नसते ती बाहेरून कितीही थकूनभागून आलेली असेल तरीपण ती घरात येताच घरपण जपू लागते. म्हणूनच बाई म्हणून जगणं हे रूढी, परंपरा, कर्तव्य आणि जबाबदारीची जणू पेटती मशालच आहे. “आतून विस्कटलेल्या मनाला सावरणं आणि कुटुंबासाठी प्रसन्नतेचा मुखवटा चढवून चेहरा फुलवणं हे बाई म्हणून जगतानाचं ब्रीद आहे. “

प्राचीन इतिहासातून स्त्रीविषयक अनेक दंतकथा, कल्पक कथा चालत आल्या आहेत. आजही त्यांचा प्रभाव समाजमनावर आहेच. त्यामुळे आजही स्त्री ही पुरूषामागे दुय्यम स्थानी उभी असताना दिसते. पण कालानुरूप स्त्री ही या नवयुगाची रागिणी आहेती वीरांगना आहे. आकाशाला गवसणी घालणारी ती प्रगतीची उडान आहे. आजच्या स्त्रीस्वातंत्र्याला विस्तृत स्वरूप आले आहे. प्रत्येक बाई आपली व्यक्तिगत अस्मिता जपू लागली आहे. त्यासाठी तिची सदैव धडपड सुरू असते. आजची स्त्री आपल्यातील लुप्त शक्तीचा उद्रेक करून अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवताना दिसत आहे. आपल्या संकुचित स्वातंत्राचे एक विस्तृत अवकाश बाईने स्वतःच निर्माण केले आहे. बोचट रूढी परंपरा, दुःखाची शृंखला ढासळून ती आधुनिकतेची स्वीकृती झाली आहे. पण बाईचे असे पलटते रूप काही ठिकाणी पुरुषी अहंकाराला ठेच लागणारे ठरत आहे. म्हणूनच आज काळाची गरज म्हणून आदिमतेतून चालत आलेल्या या दंतकथा, कल्पक कथांना वेगळे वळण, वेगळे स्वरूप देणे. जरूरी आहे. स्त्री-पुरुष समानतेचा वारसा हक्क सांगणारे साहित्य निर्माण होऊन समाजात आणने गरजेचे आहे.

शेवटी बाई म्हणून तुम्ही काय आणि मी काय आपण सगळ्याचजणी या समाजव्यवस्थेच्या ढाच्यात चेपून, स्वतःला वरवरचे पाॅलिश चढवून, रूढी आणि परंपरेच्या धाग्यात विणून घेतलेले एकाच माळेचे मणी आहोत. प्रत्येकीच्या वाटा जीवनशैली, गाव-शहरीवस्ती हे काहीही वेगळेपण असो पण बाई म्हणून जगतानाचा एकंदरीत संघर्ष आहे तो प्रत्येकीच्या वाट्याला थोडाफार सारखाच आहेच हे सत्य नाकारता येणारे नाही. असो.

जीवन तिथे संघर्ष हा आलाच. पण पुरुषांच्या तुलनेत बाईच्या वाट्याला थोडाफार जास्तीचा भोग असतो. पहाटे उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत आपल्या कुटुंबाप्रती निगडीत दैनंदिनीत बाई व्यस्त असते. यामधून अधिक विचार केला तर शहरातील बाई पेक्षा खेड्यातील बाईची, बाई म्हणून जगण्याची धडपड आणि संघर्ष जास्त असतो. कारण खेड्यातील बाईवर फक्त कुटुंबाची जबाबदारी नसते तर तिची नाळ शेतबांधाशी सुध्दा जोडलेली असते. त्यामुळे गाववाड्यांवर रहाणार्‍या बाईवर जास्त कष्टाचा भार पडतो. पण आपली हुशारी आणि कौशल्यातून आपली जबाबदारी ती उत्तम पार पाडते. मोठ्या चातुर्याने ती पैला-पै जोडून ठेवते. कुटुंबाची आर्थिक घडी सुरळीत बसविण्यात यशस्वी होते. कष्ट, जबाबदारी, आर्थिक नियोजन यात खेड्यातील बाई सदैव सक्षम आहे. त्यामुळे कुटुंब ढासळण्याचे, विस्कळीत होण्याचे अथवा आर्थिक घडी विस्कटण्याचे शहराच्या तुलनेत खेड्यातून प्रमाण कमी आहे.

बाई म्हणून जगणे म्हणजे ना कुणी ज्योतिषाला अथवा ना कुणी शास्त्रज्ञाला थांग न लागणारे ‘जणू एक विराट भावविश्व आहे.’ मी स्वतः बाई असले तरी बाई मनाचे गुढ उकलण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे हा लेख म्हणजे बाई म्हणून जगतानाचा …… एक अनुभव समजावा.

एकंदरीत विचार केला तर बाईचे जगणं म्हणजे सुख-दुख, आनंद, समाधान, कष्ट, यातना, संघर्ष, त्रागा, ओढ, जिव्हाळा……. इत्यादी अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रीत येऊन संपुर्ण मानवजातीमधील विशिष्ट आणि महत्वपूर्ण धारा आहे. या धारेच्या किनाऱ्यावर ती थोडी का होईना विसावत असतेच ….

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक- 9327282419

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
कविता पवार ( मुख्याध्यापिका न्यु बॉम्बे सिटी स्कूल

अतिशय सुंदर लेख आहे बाई अगदी लहानपणापासूनची तिची सर्व रूपे आणि कर्तव्याची बदलती रूपे याचा एक उत्कृष्ट प्रवास या लेखात वाचायला मिळाला अगदी जन्मापासून ते आत्तापर्यन्तचा प्रवास डोळ्यासमोर येईल asa आहे हार्दिक लेख. वनिता मॅडम नी खूप छान या लेखातून बाईपण आणि तिचे आयुष्य याची खूप छान आपल्या लेखणीतून सांगड घातलीस आहे….

अनुराधा पाटील

खूपच सुंदर लिहिलेस!वास्तव आहे पण स्वीकारावे लागते.आनंदाने स्वीकारले तरच सोपे होते जगणे, नाही तर आयुष्यभर नशीबी येते रडणे. आनंदाची कला कोणी शिकवेल का?

योगिता गावडे

अतिशय सुंदर मांडणी.. बाई काय आहे आणि तिचं आयुष्य काय आहे हे तंतोतंत वास्तव या लेखातून मांडले आहे.