विविधा
☆ भाषेचे वैविध्य ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
नुकतीच एक बातमी वाचनात आली. ‘ बेळगाव येथे मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक यांच्यात वादावादी झाली’. हा प्रकार बेळगावात नवीन नाही. ‘ बेळगाव म्हणजे कानडी व मराठी वादाची पेटती भट्टी आहे ‘ असं पु. ल. नेहमी म्हणायचे. पण त्या बातमीमुळे भाषेविषयी काही लिहावे असे वाटले.
दर वीस मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. ही भाषा म्हणजे मूळ भाषा नसून ती बोलीभाषा असते. फरक बोलीभाषेत असतो.मूळ भाषा एकच असते. काही शब्द वेगळे असतात, काही ठिकाणी उच्चार, हेल यात फरक असतो. बेळगाव मधे मराठी भाषिक खूप आहेत.पण त्यांची मराठी आणि महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी यात खूपच अंतर आहे. बेळगावात बोलल्या जाणाऱ्या मराठीवर कन्नड भाषेचा खूप प्रभाव आहे.
मराठी भाषेमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बोलली जाते ती भाषा, त्यातले हेल, उच्चार वेगवेगळे जाणवतात. पुण्यामधे साधारणपणे शुद्ध मराठी पहिल्यापासूनच बोलली जाते. सातारा, कोल्हापूर भागात वेगळेच टोन ऐकू येतात.सोलापूरची बोलीभाषा तर खूपच वेगळी आहे. त्यावर कन्नड आणि तेलुगू दोन्ही भाषांची छाप आहे.
शहरात आणि खेडेगावात तीच मराठी भाषा किती वेगळी वाटते. खेडेगावात तर असे काही शब्द वापरले जातात ते शहरातील लोकांना माहीतही नसतात. धुळे, नाशिक इथली बोली औरंगाबाद, किंवा एकूणच मराठवाड्यातील बोलीभाषा यात खूपच फरक आहे. खानदेशच्या भाषेवर तिथल्या स्थानिक अहिराणी भाषेचा जास्त प्रभाव आहे. ही अहिराणी भाषा गुजराती व मराठी यांचे मिश्रण आहे असे म्हणतात.विदर्भातल्या मराठी भाषेचा वेगळाच बाज आहे. मुंबईत हल्ली जी मराठी बोलतात तिच्यात निम्मे हिंदी , इंग्रजी शब्द घुसडलेले ऐकू येतात. शुद्ध पुणेरी मराठी असा लौकिक आजवर मिरवणाऱ्या पुण्यातल्या मराठी भाषेतही अलिकडे हिंदी इंग्रजी प्रचुर शब्द येतात.
काळानुसार तर भाषेत फारच बदल होतात. प्रत्येक संतांच्या काळात जी जी बोली भाषा होती तीच त्यांच्या साहित्यातून प्रतीत झाली आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात खूप जण स्थलांतरित होतात. त्यांची भाषा कालांतराने बरीच बदलते.तिथल्या भाषेचे संस्कार या भाषेवर होतात. त्यांच्या भाषेच्या टोनमधे आपली मूळ भाषा बोलली जाते. तिकडून पुन्हा ते जेव्हा मूळ स्थानी येतात तेव्हा हा वेगळेपणा जास्त जाणवतो.एखादे मराठी कुटुंब काही कारणाने बरीच वर्षे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इकडे राहिले तर ते परत महाराष्ट्रात येतात ते तिकडच्या भाषेचे मिश्रण घेऊनच!! ही स्वाभाविक होणारी प्रक्रिया आहे.
आम्ही काशी, गया, प्रयाग , अयोध्या यात्रेला गेलो होतो. काही मराठी पुरोहित वर्षानुवर्षे तिथे राहतात. ते मराठी बोलतात. पण ते अस्खलित मराठी वाटत नाही.तर त्यांच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव आहे. त्यात चूक काहीच नाही. एके ठिकाणचे गुरूजी आमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येत होते. ते पिढ्यानपिढ्या तिकडे राहतात. त्यातही ते मराठी भाषा विसरलेले नाहीत ही खूप मोठी जमेची बाजू आहे. हे त्यांचेच श्रेय आहे.
परवा एका टीव्ही चॅनल विषयी काही वाचनात आले.ते आहे तामिळनाडूचे! नाव आहे ” दक्षिणी मराठी” . त्या चॅनल वर ते माहिती देतात की, १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी अळगिरी नायक या राजाकडून तंजावर जिंकून घेतले. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी राजांनी अनेक मराठी सरदार, त्यांची घराणी तंजावर येथे नेली. हे लोक तिथेच स्थायिक झाले. ते मराठीच बोलत असत. पण काही काळानंतर त्या मराठीवर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृत भाषेचा शिवाय दक्षिण भारतातील मल्याळम, तेलगू, कन्नड, तमिळ या सर्व भाषांचा प्रभाव पडत गेला. ती तंजावर मराठी या नावाने प्रसिद्ध झाली. तीच त्यांची बोली भाषा बनली.
हे लोक अजूनही गुढीपाडवा, संक्रांतीला तिळगूळ घ्या गोड बोला, अंबाबाईचा गोंधळ हे सण मराठी पद्धतीने साजरे करतात म्हणे! ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणाने आता बरेच लोक महाराष्ट्र, गुजरात, उत्तरेकडची राज्ये ,दिल्ली दक्षिणेत इतरत्र, एवढेंच काय पण परदेशातही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे तामिळनाडू येथे या लोकांची संख्या कमी झाली आहे. पण ते तंजावर मराठीच बोलतात. ही मराठीची वैशिष्ट्यपूर्ण बोली आहे.. या दक्षिणी मराठी चॅनेल च्या माध्यमातून त्यांचा आपल्या मूळ मातीशी संबंध टिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक मराठी लोक आमचे चॅनल पाहतात. तुम्ही आम्ही एकच आहोत हे सांगायलाही ते विसरत नाहीत.
भारतात, किंबहुना जगातही अशा काही मराठीपासून उत्पन्न झालेल्या भाषा असतीलच. त्यांच्या विषयी समजले तर अजूनच आपल्या ज्ञानात भर पडेल.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈