श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ भूमिका…एक जगणे ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

भूमिका हा शब्द आणि विविध कलाकारांनी साकार केलेल्या,जिवंत केलेल्या असंख्य नाटके आणि चित्रपटांमधील  सकस भूमिका यांचं अतूट असं नातं आहे. या वाक्यात आलेले ‘साकार’, ‘विविध’ आणि ‘जिवंत’ या शब्दांचे अर्थरंग पूर्णतः समजून घेतल्याशिवाय ‘भूमिका’ या शब्दाचा सखोल वेध घेताच येणार नाही.

‘भूमिका’ या संदर्भात विचार करायचा तर भूमिका ‘साकार’ करण्यात त्या व्यक्तिरेखेला योग्य ‘आकार’ देणेच अपेक्षित आहे.’विविध’ हा शब्द इथे एखाद्या कलाकाराने भूमिकांद्वारे साकार केलेल्या व्यक्तिरेखांना उद्देशून आलेला असला तरी या ‘विविध’ शब्दात अंगभूत असणारे एखाद्या भूमिकेच्या संदर्भातले ‘वैविध्य’ही  कलाकाराने त्या व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करून समजून घेणे आवश्यक असते. विशिष्ट भूमिका साकारत असताना त्या व्यक्तिरेखेची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजे तिचे स्वरूप, स्वभावरंग, त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याचे वय, आर्थिक स्थिती, त्याची विचार करण्याची पद्धत आणि असं बरंच कांही असा त्या व्यक्तिरेखेचा सर्वांगाने केलेला अभ्यास ही त्या भूमिकेची अत्यावश्यक अशी पूर्वतयारी!नाटककाराने नाट्यसंहितेत केलेली व्यक्तिरेखेची बांधणी ही विशिष्ट ठिपक्यांच्या रांगोळीतील रेखाकृतीसारखी असते. दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या सहाय्याने त्या व्यक्तिरेखेच्या रेखाकृती रांगोळीत रंग भरण्याचे काम नटाला करायचे असते. हे रंगभरण म्हणजेच अभिनयाद्वारे भूमिका ‘जिवंत’ करणे! नाट्यसंहितेत त्या भूमिकेचा आलेख विविध घटना, प्रसंग,संवादातून सूचित केलेला असतोच. ते सूचन आणि स्वतःचा अभ्यास याद्वारे दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाची अथपासून इतीपर्यंतची एक सलगरेषा नटाने आपल्या मनात ठळकपणे आखून ठेवायची असते. त्या सलगरेषेनुरुप रंगभूमीवर होणारी त्या भूमिकेची वाटचालच ती ‘भूमिका’ जिवंत करीत असते!

हे सगळं रंगभूमी किंवा चित्रपटातील भूमिकांबद्दलचे विवेचन आहे असेच वाटले ना?पण ते ‘फक्त’ तेवढेच नाहीय. कारण नाटक काय किंवा चित्रपट काय वास्तवाचा आभासच. त्यामुळेच त्या ‘आभासा’इतकंच हे विवेचन ज्या वास्तवाचा तो आभास त्या वास्तवालाही पूर्णतः लागू पडणारे आहेच!

रंगभूमीवरील वास्तवाचा आभास हा खरंतर जगण्याचाच आभास! तो आभास जितका परिपूर्ण तितक्या त्यातील भूमिका म्हणजेच संपूर्ण सादरीकरण जिवंत! भूमिका अशा जिवंत म्हणजेच वास्तव भासण्यासाठी जशी कलाकारांना आपापली भूमिका तिच्यातले बारकावे, खाचाखोचा, कंगोरे समजून घेऊन वठवावी लागते तसेच प्रत्यक्षात वेगवेगळ्या भूमिकांतून वावरताना आपल्यालासुध्दा त्या त्या वेळच्या भूमिकांच्या बाबतीत हे करावे लागतेच.

रंगभूमीवर क्वचित कांही अपवाद वगळता एका कलाकाराला एकच भूमिका पार पाडायची असते. पण ते करतानाही त्याच्या भूमिकेचे इतर भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध,देणेघेणे,कर्तव्ये, जबाबदाऱ्या हे सगळं समजून घेऊनच त्याला आपली भूमिका साकार करायची असते. आपल्या आयुष्यात मात्र आपल्याला एकाच वेळी अनेक भूमिका वठवाव्या लागतात आणि त्या त्या वेळी इतरांच्या आपल्या भूमिकांशी असणारे संबंध, धागेदोरे,भावबंध, देणेघेणे, कर्तव्ये,जबाबदाऱ्या हे सगळं आपल्यालाही विचारात घ्यावे लागतेच.आपल्या या सगळ्याच भूमिका चांगल्या वठल्या तरच आपले जगणे कृतार्थ म्हणजेच खऱ्या अर्थाने जिवंत आणि त्या योग्य पद्धतीने नाही पार पाडता आल्या तर मात्र जगणं कंटाळवाणं, निरस आणि असमाधानी!

वास्तव जगण्यात आपल्या भूमिकांचे संवाद लिहायला कुणी लेखक नसतो. हालचाली बसवायलाही कुणी दिग्दर्शक नसतोच. नाटकातील घटना प्रसंग नाटककाराने नियत केलेले असतात आणि आपल्या आयुष्यातले घटना-प्रसंग नियतीने! तिथे नाटककाराने आपले संवाद चोख लिहिलेले असतात. आपल्या आयुष्यात मात्र काय बोलायचे हे आणि कसे बोलायचे हेही आपणच आपल्या बुद्धी आणि कुवतीनुसार ठरवायचे असते. तिथे दिग्दर्शक मार्गदर्शन करत असतो आणि इथे आपलेच अनुभव,आपण जोडलेली माणसे आणि त्या त्या वेळची परिस्थिती हे सगळे दिग्दर्शकासारखेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. तिथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या रुपातल्या प्रतिक्रिया नटाच्या भूमिकेला दात देत असतात आणि इथे आपल्याला मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधानच आपल्याला पुढील वाटचालीसाठी आवश्यक ती उमेद,उत्साह देत रहाते.

वास्तव आणि आभासातलं हे साम्य वरवरचं नाहीय. खरंतर भूमिका वास्तव जगण्यातल्या असोत वा आभासी जगातल्या त्या ‘भूमिका’ या शब्दाच्या मूळ अर्थांची प्रतिबिंबेच असतात.हे कसे हे ‘भूमिका’ या शब्दाचे मूळ अर्थच सांगतील.  

‘भूमिका’  म्हणजे जसा अभिनय, तसंच भूमिका म्हणजे पीठिका,पवित्रा,आणि अवस्थाही.  भूमिका म्हणजे पृथ्वी.भूमिका म्हणजे जमीन,भूमीही.आपल्या वास्तव आयुष्यातल्या भूमिका या जमिनीवर,भूमीवर  घट्ट पाय रोवूनच वठवत गेलो तरच त्या जिवंत वाटतात नाहीतर मग निर्जीव. आभासी जगातल्या भूमिका वठवताना ‘रंग’ही गरजेचे आणि भूमीसुध्दा!म्हणूनच त्या जिथे साकार करायच्या त्या भूमीला ‘रंगभूमी’ म्हणत असावेत!

भूमिका कोणतीही,कुठेही वठवायची असो ती मनापासून वठवायला हवी हे मात्र खरे!कारण ‘भूमिका’ म्हणजे असे एक जगणेच जर, तर ते अगदी मनापासूनच जगायला हवे ना?

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments