प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
विविधा
☆ भारत एक सार्वभौम राष्ट्र आणि नवे शैक्षणिक धोरण ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
२६ जानेवारी हा ७४ वा प्रजासता दिन साजरा करत असताना आत्मनिर्भर भारत व नवनिर्मित भारताच्या विकासासाठी शैक्षणिक धोरणातील क्रांतिकारक बदल नव्या सार्वभौम भारतासाठी नव्या वाटा घेऊन येत आहे हे निश्चितच नव्या भारतासाठी सदृढ वातावरण आहे असे वाटते .
आजचे युग हे स्पर्धांचे युग आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे तितकेच खरे आहे. आजचे आधुनिक युग डिजिटल युग म्हणूनही ओळखले जातेय . या युगात प्रत्येक सुविधा डिजिटल होत जाताहेत . जुन्या काळी साक्षर आणि निरक्षर संकल्पनेतून सामाजिक राष्ट्रीय स्तर ठरवला जायचा .आता डिजिटल साक्षर व डिजिटल निरक्षर संकल्पना मोठ्या प्रमाणात विचारात घेतली जातेय . त्यातून शिक्षणाबरोबर शिक्षण प्रक्रिया अधिक गतिमान होणेसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जातेय .शालेय शिक्षणात नर्सरी -बालवाडी – प्राथमिक – माध्यमिक – उच्च माध्यमिक – महाविद्यालयाच्या जडण घडणीत सध्या डिजिटल शैक्षणिक धोरणाचा वेगवान बदल विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व सामाजिक बदलावर होताना दिसून येतोय . पुढची पिढी सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणाकडे पाहिले जातेय . युवा पिढी व त्यांच्या आकांक्षा व सामाजिक हित व सरकारी व खाजगी शिक्षण पद्धती व त्यांची अंमलबजावणी शैक्षणिक क्षेत्राला नव्या योग्य दिशेला घेऊन जाताना आढळतेय .समाजातील शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक विषमता यामुळे दूर होण्याच्या आशा निर्माण होत आहे .
बदलत्या काळानुसार शाळांमध्ये ही बदल होणे अपेक्षित आहे .
आज लोक सहभागातून चांगल्या सुविधा मिळविण्यासाठी शिक्षक व शैक्षणिक व्यवस्था झटत आहेत . त्यातून मॉडेल स्कूल विकसित होत आहेत .
इ-लर्निंग सारख्या सुविधा खेडोपाडी उपलब्ध होत आहेत .शिक्षण तज्ञ योगी अरविंद म्हणतात की – “प्रत्येक गोष्ट शिकवता येणे शक्य नाही. मात्र प्रत्येक गोष्ट शिकता येणे शक्य आहे .” – त्यामुळे कोणतीही मुले शिक्षणापासून वंचित होऊ नयेत याविषयी शिकता येणे गरजेचे वाटते .त्यासाठी टॅब ,स्मार्टफोन इ . माध्यमे शिक्षणाची समीकरणे बदलण्यासाठी पूरक ठरली आहेत . स्मार्ट अभ्यासिका घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे . विविध नवोपक्रमाव्दारे शिक्षक अपडेट होणे आवश्यक आहे .
नवे शैक्षणिक धोरण :
१९८६ च्या शैक्षणिक धोरणातील अनेक मुद्दे मागील ३४ वर्षात राबविले गेले. त्याचे पूर्वावलोकन महत्वपूर्ण वाटते . त्यातून सुधारण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात २०३५ पर्यंत प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाच्या बरोबरीने उच्च शिक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उदिष्ट दिसून येते.महिला, बालवाडी व व्यवसायिक शिक्षणाकडे नवीन शैक्षणिक धोरणात जादा लक्ष देण्यात आल्याची बाब चांगली आहे .गरिब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक विषमता मिटवणे,सरकारी व खाजगी शाळेत शिक्षणाची समानता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल यातून उचलले गेले आहे .
देशातील युवा पिढीच्या आकांक्षा त्यांची स्वप्ने आणि हित लक्षात घेऊन लक्ष केंद्रित केले आहे . जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे वेगाने होणारे बदल होत आहेत आणि भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येत असल्यामुळे भविष्यकालीन योजना राबविणे आवश्यक आहे . राष्ट्रीय शैक्षीणक धोरण – 2020 अंतर्गत शिक्षणावर ६ टक्के खर्च व्हावा हे अपेक्षित आहे . भारताच्या भविष्यावर होणारे क्रांतिकारक बदल व शिक्षणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बदल निश्चितच देशाच्या विकासात क्रांती घडवेल असे वाटते .
बालवाडी आणि अंगणवाडी किंवा १ ली ते दुसरी पर्यंतच्या इंग्रजी शाळांचे जाळे विस्तारत असताना शालेय शिक्षण प्रशासनामार्फत नवीन बदल स्विकारून नव्या शैक्षणिक रचना तयार करण्यात येत आहेत. बहुशाखीय शिक्षण हे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणाचे वैशिष्ट बनत आहे .यामुळे संशोधन, शिक्षण व सर्वसाधारण अभ्यासक्रम राबविले जातील .
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर या नव्या राष्ट्रीय धोरणात भर देण्याचा विचार करण्यात आला आहे . मातृभाषा, इंग्रजी व प्रादेशिक भाषा असे त्रिभाषीय सूत्र बनविले आहे .
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्याला कशाचेच बंधन नाही .आयुष्यभर मनुष्यप्राणी विद्यार्थीच असतो . तो प्रत्येक अनुभवातून नवनवीन बाबी शिकत असतो . प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगावर विचार करून मार्ग काढत पुढे जात असतो.वर्षानुवर्षे सुरु असणाऱ्या पारंपारिक शिक्षण पद्धतीला छेद देत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धतीत समग्र बदल होत आहेत. ग.दि.मा. यांच्या कवितेत –
” बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु ” असे व्यक्त होतात .
हे नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाल्याच्या वर्षापूर्तीनिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असे म्हणाले की – ‘आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात आहोत.एका प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हा आता अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. नवीन भारत आणि भविष्यासाठी तयार युवा पिढी घडवण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘
हे २१ शतकातील सर्वात दूरदर्शी धोरण आहे – असे मत शिक्षणमंत्री धरमेन्द्र प्रधान यांनी मांडले आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांचा योग्य वापर,शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, क्षमता विकास आणि शिक्षणाच्या माध्यमांमध्ये परिवर्तन घडून येणार आहे.
नवे शैक्षणिक धोरण 2020 हा नक्कीच एक मार्गदर्शक दस्तऐवज आहे. नव्या युगातील नवी आव्हाने लक्षात घेता विविध शैक्षणिक गरजा,संरचनात्मक असमानता आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यामध्ये येणार्या समस्यांचे निराकरण हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या राष्ट्रात शिक्षण क्रांती निर्माण होणार आहे. \ सोबतच शिक्षण व्यवस्थेतील अनेक संकटांना तोंड देण्याचे सर्वात आव्हानात्मक कार्यही या धोरणाद्वारे पूर्ण करायचे आहे.
भारताच्या अफाट लोकसंख्येला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्याद्वारे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या धोरणाच्या अंमलबजावणीवर ठरणार आहे. कोविड महामारीच्या काळात जलद पावले उचलून अवघड निर्णय घेऊन ते पूर्तीस नेण्याचे कौशल्य आपल्या भारताने दाखवून दिले आहे. याच कौशल्याचा फायदा शिक्षण क्षेत्रातही होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी काही राज्यांनी केली आहे तर काही राज्ये त्या प्रक्रियेतून जात आहेत. तरीही अजून लांबचा पल्ला गाठायचा बाकी आहे. याच बरोबर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता संविधान साक्षर व्हावी यासाठी संपूर्ण भारतामध्ये संविधान साक्षर अभियान राबविणे गरजेचे आहे असे वाटते. भारत हे संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपला भारत नवीन क्रांती घडवेल यात तिळमात्र शंका नाही असे वाटते.
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन नवनव्या संकल्पनानी साजरा करताना सर्व भारतीय एक आहेत ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. तरच देशप्रेमाने तिरंगा अभिमानाने लहरत राहील असे मनोमन वाटते .
नव क्रांतीची मशाल हाती
उजळू अंधार अज्ञानाचा
नवनिर्मितीने मार्ग शोधूया
शिक्षणाचा सज्ञानाचा
प्रजासत्ताक हे राष्ट्र आपुले
चला उभारू देश नवा
विकसित करू राष्ट्र आपुले
शिक्षणाचा ध्यास हवा …!
जय भारत…
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
९४२११२५३५७…
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈