विविधा
☆ भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध ! ☆ श्री दर्शन रमेश वडेर ☆
नृसिंहवाडी ते अयोध्या..
भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध !
– दर्शन रमेश वडेर, नृसिंहवाडी
प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या दरबारी होत आहे. अवघा शरयूतीर या हर्षोल्हासाने पुलकित झालाय. रामनामाचा ब्रह्मनाद अवघ्या आसमंताला व्यापून उरतो आहे. संतजनांच्या स्वस्तिपद्मांमुळे अयोध्येच्या पवित्र भूमीत मांगल्याचा उमाळा दाटून आला आहे. “मेरे झोपडीके द्वार आज खुल जायेंगे, राम आयेंगे” असं म्हणणारी माता शबरी असो किंवा रामचंद्रांना हृदयस्थ मित्र मानून गंगेचे पात्र ओलांडून देणारा केवट.. अयोध्येच्या कुठल्याशा कोपऱ्यात बसून ते आज आनंदाने अश्रू ढाळत असतील. वानरराज सुग्रीवाची अवघी वानरसेना अदृश्यरूपाने हा मंदिररुपी सेतू उभारत असेल तो हृदयात ‘जय श्रीराम’चा महामंत्र घेऊनच! कारण ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम प्रभूंच्या मंदिराचे स्वप्न साकार होतंय. क्षीरसागरातले अवघे वैकुंठच अयोध्यानगरीत उतरलंय की काय? असा भास व्हावा, अशी ही दिव्यता हृद्यचक्षूंना कृतार्थ करते आहे. स्वयंवरातल्या सीतामैय्याच्या शृंगारासारखी अयोध्या रुपांकित झाली आहे. भारतवर्षातल्या अनेक सुपुत्रांच्या त्यागानंतर आज अवधनगरीला हे साजिरं रूप मिळालंय. हजारो कारसेवकांच्या प्रयत्नांनी अन् रामजन्मभूमी न्यासाच्या अविरत संघर्षानंतर आजचा हा सोनियाचा दिवस उजाडला आहे. यात आपल्या पुण्यभूमी नृसिंहवाडीचाही एक जिव्हाळ्याचा अनुबंध आहे. गुरुकृपेचा अन्योन्य हृद्य अनुभव देणारा असा हा नृसिंहवाडी ते अयोध्या भक्तीसेतू !
दत्तप्रभूंच्या पद्मयुगुलांनी कृपांकित झालेली पुण्यभूमी नृसिंहवाडी म्हणजे सत्पुरूषांची जननीच! अनेक थोर महात्मे व संतजनांनी या भूमीत भक्तीरसाची उधळण केली अन् कृष्णेचा निळाशार डोह शहारून गेला. “आम्ही दत्ताचे नौकर, खातसो त्याची भाकर” असे म्हणत तिन्ही त्रिकाळ पूजाअर्चा करणारे वाडीचे समस्त पुजारीजन म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरुंचीच लेकरे! याच पवित्र पुजारीकुळात सूर्याचे तेजोवलय मानव देहावर घेऊन जन्माला आलेली एक थोर विभूती म्हणजे ब्रह्मर्षी पं. आत्मारामशास्त्री जेरे! वाडीच्या ज्ञानासनावर विलक्षण गारूड निर्माण करतील अशा मोजक्या मांदियाळीत जेरेशास्त्रींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या विद्वत्तेचा सूर्य जितका प्रखर अन् तेजस्वी तितकाच शारदीय चांदण्यात नाहल्याची अनुभूती देणारा. वेद, उपनिषद, न्याय, वेदांत, मीमांसा अशा धर्मशास्त्राचे त्यांचे ज्ञान अफाट होते. संस्कृत आणि तत्वज्ञानावरील त्यांच्या अभ्यासाचा अधिकार प्रचंड होता. मात्र शिक्षणाचा अन् योग्यतेचा दर्जा असूनही नोकरीसाठी उपेक्षा होत होती. त्यामुळे त्यांनी प.पू. टेंबे स्वामींच्या स्त्रोत्रांचे अखंड अनुष्ठान सुरू केले होते. तेव्हा प.प. शांतानंद स्वामींनी दृष्टांत देत ‘अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान मंदिरात प्राध्यापक म्हणून तुझ्यासाठी जागा आहे.’ असे सांगितले. तेव्हा शास्त्रीबुवांनी तिथे जाऊन अर्ज केला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मुलाखत घेतली अन् त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्त केली. सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, गुरुदेव रानडे अशा ज्ञानी महंतांच्या सानिध्यात शास्त्रीजी संस्कृतचे अध्यापन करू लागले. पुढे कोणत्यातरी कारणाने ते तत्वज्ञान मंदिर बंद पडले अन् शास्त्रीजींना अमळनेर सोडावे लागले. तद्नंतर भागवतावर प्रवचने देत त्यांनी महाराष्ट्रभूमी पाहिली. काही काळ वाईत त्यांचा मुक्काम झाला. मात्र पुढे स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ठाण्यात तत्वज्ञान विद्यापीठ सुरू केले होते. जेरे शास्त्रीजी तिथे अध्यापनासाठी गेले. अन् विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व संस्कृतसारखे अबोध विषय सुसंबोधित करू लागले. त्यावेळी एक पंचविशीतला तरुण ठाण्यात एम.ए. तत्वज्ञान शिकण्यासाठी आला होता. गोरेपान, उंचपुऱ्या आणि जणू तेजोनिधीचेच रूप घेतलेल्या जेरे शास्त्रींकडे पाहून त्या तरुण विद्यार्थ्याच्या मनात आदर उत्पन्न होई. शास्त्रीबुवांच्या अमोघ वाणीने त्याचे मन प्रफुल्लित होऊन जाई. मात्र हा एम.ए. शिकणारा तरुण विचारांनी अगदी बंडखोर वृत्तीचा. देवाच्या अस्तित्वावरच प्रश्न करणारा कट्टर नास्तिकच! देव आहे की नाही? असेल तर तो दिसत का नाही? अशा एक ना अनेक द्विधांनी त्याची मन:वस्था अस्थायी झाली होती. या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. देवाच्या खऱ्या अस्तित्वाला जाणायचे होते. मात्र आजपर्यंत त्याला कुणी काही सांगितलच नव्हतं. याच काळात जेरेशास्त्रींच्या संपर्कात आल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे सत्पुरुषच आपल्याला खरा मार्ग दाखवू शकतील, असा दृढ विश्वास त्याच्या मनात उत्पन्न झाला. अन् शास्त्रीबुवां सोबत त्याची वेदांतचर्चा घडू लागली. परमेश्वराला अनुभवायचे खरे निधान कोणते? याचे निरूपणच शास्त्रीबुवा त्याच्यासमोर करत. मात्र तरीही त्या तरुणाला समाधानाची अवस्था काही मिळत नव्हती. शेवटी शास्त्रीजींनी त्याला उपदेश करत दत्तमहात्म्य या ग्रंथाची पोथी दिली आणि तीन वेळा या पोथीची पारायणे कर, असे सांगितले. अन् त्या तरुणाने तसे केले. दत्तमहात्म्य वाचल्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची त्याची अभिलाषा तृप्त झाली. पूर्णत: नास्तिक असणारा हा तरुण जणू भक्तीप्रवाही न्हावू लागला. शास्त्रीबुवांनी दिलेला उपदेश फळाला आला. किशोर व्यास हे या तरुणाचे नाव. अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूरसारख्या छोट्या खेड्यात राहणारा. पुढे या तरुणाची ईश्वराचे ब्रह्मसत्य जाणून घेण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की, काशीला जाऊन त्याने संन्यस्तधर्म धारण केला. अन् त्यांचे नामाभिधान झाले स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज! गेल्या डिसेंबर महिन्यात दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या दत्त मंदिरात प्रवचनासाठी गोविंददेव गिरी महाराज आले होते. त्यावेळी जेरेशास्त्रींचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला. “शास्त्रीजींचे व्यक्तिमत्त्व बहिस्थ जितके तेजस्वी तितकेच अंत:स्थ तेजस्वी होते. ‘झाला महार पंढरीनाथ..’ हे गीत ऐकताना शास्त्रीजी ढसाढसा रडल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले आहे.” असे ते म्हणाले. हेच गोविन्ददेवजी गिरी महाराज म्हणजे अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमि न्यासाचे कोषाध्यक्ष! देशभरात श्रीराम समर्पणाच्या माध्यमातून सुमारे ४००० कोटी रुपये इतके निधीसंकलन त्यांनी आजपर्यंत केले आहे. हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राम जन्मभूमीवर इतके भव्य मंदिर उभे राहतेय, यामागे कोषाध्यक्ष म्हणून स्वामी गोविंददेव गिरींचा वाटा मोठा आहे. ब्रह्मर्षी आत्मारामशास्त्री जेरेंच्या अनुग्रहाने गिरी महाराजांना परतत्त्वाची दिशा मिळाली. एकाप्रकारे जेरेशास्त्रींनी राम मंदिराच्या उभारणीत शिष्यदान दिले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दत्तभूमी नृसिंहवाडी ते रामभूमी अयोध्या असा भक्तीसेतू पं. आत्मारामशास्त्री जेरे आणि स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या रूपाने आज फलद्रूप झाला आहे. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होताना स्वामी गोविंददेव गिरी तिथे उपस्थित असतील तेव्हा अदृश्य रूपाने तिथे ब्रह्मर्षी पं. आत्मारामशास्त्री जेरेसुद्धा असतील! ईश्वरीय संकेतांचे पूर्वसंदर्भ हे नियतीने आधीच ठरवलेले असतात. ‘दत्तमहात्म्य तीनवेळा वाचा’ हे शास्त्रीजींचे बोल गोविंददेव गिरी महाराजांच्या जीवनात बदल करणारे ठरले. मग माझ्यासारख्या १८ वर्षांच्या मुमुक्षाला ग्रेसांच्या ओळींचा अर्थ इथे उलगडला…
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला..
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला!
© श्री दर्शन रमेश वडेर
नृसिंहवाडी
मो. नं. 8459166409
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈