सौ. वीणा आशुतोष रारावीकर

सौ. वीणा आशुतोष रारावीकर यांनी संगणक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व पदार्थविज्ञान या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे.  एक लोकप्रिय ललित लेखिका म्हणून त्यांचे विविधांगी लिखाण नामवंत वृत्तपत्रे व मॅाम्सप्रेसो या ब्लॅागसाइटवर प्रकाशित झाले आहे. अनेक कथा, लघु कथा, लेख, कविता, पुस्तक परिक्षण, अर्थगर्भ सुविचार, शब्दांकन, कलाकृती असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या स्वतःच्या साहित्य वाचनाचे रेडिओवर कार्यक्रम होत असतात. अर्थगर्भ लिखाण करणाऱ्या या लेखिकेला योगाभ्यास, पर्यटन, वाचन, क्रीडा प्रकार आणि टपाल व चलन संग्रह यातही रुची आहे.

☆ विविधा ☆ भूगोल दिन १४ जानेवारी ☆ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

 

ऐरोली-ठाणे खाडीकिनारी ‘फ्लेमिंगो’ नी बहरलेले दृश्य बघायला छोटी शर्वरी आपल्या आई-बाबां बरोबर गेली होती. पांढरे गुलाबी उंच पक्षी बघून तिला खूप आनंद झाला होता. तिचे प्रश्न चालू झाले, “आई, हे पक्षी कुठून आले? हे किती दिवस इथे राहाणार? मग आपल्या घरी ते परत कधी जाणार? आपण गावाला गेलो की असे दोन महिने कुठे राहातो?” आईला मात्र फ्लेमिंगो आणि त्याबरोबर सेल्फी काढण्यात जास्त रस होता.

“भूगोलाचे ज्ञान हे शाळेत परिक्षेत पास होण्यासाठी मिळवलेले मार्क” अशी समजूती असलेली तिची आई, गौरी. अशा समजूतीत असणारी गौरी ही काही एकटी नाही. भूगोल हे एक शास्त्र आहे आणि त्याला विज्ञान शाखेतील पदवी मिळते. हे देखील अनेक जणांच्या गावी नसते.

अशा पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात चौदा जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो, याची किती जणांना कल्पना आहे?

कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे माजी प्राचार्य आणि राज्यातील थोर भूगोलतज्ज्ञ सी. डी. देशपांडे एक

प्रख्यात व्यक्तिमत्व. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ, त्यांच्या जन्मदिनी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ साजरा करायचा असे ठरले. त्याप्रमाणे पुण्याचे डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली.

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) म्हणतात. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द Geo चा अर्थ Earth किंवा पृथ्वी आणि Graphiya म्हणजे graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे असा होतो. या वरून आपल्या लक्षात येते की पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, तिच्या वरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे.

मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल आणि त्याचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो.

शाळेत असताना गणिताबरोबर सर्वात नावडीचा दुसरा विषय कोणता, यावर बहुतेक सर्व लोकांचे एकमत होईल, तो म्हणजे भूगोल. शाळेत भूगोल शिकवणारा शिक्षक हा तोच विषय घेऊन पदवीधर झाला असेल, हे त्याहून कठिण. मग हा विषय नेहमीच उपेक्षित राहिला, तर त्यात नवल काय?

भूगोल शाळेत शिकतो तसा फक्त राजकीय भूगोलाशी मर्यादित नसतो तर त्याच्या अनेक उपशाखा आहेत.  वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography ) सागरशास्त्र (oceanography), जंगलशास्त्र (forest geography), जैवशास्त्र (biogeography), शेतीविषयक (agriculture), तसेच मानवीशास्त्र. या सर्व शाखांचा आपल्या दैनंदिन जीवनात, राज्याच्या नियोजन आणि विकास क्षेत्र तसेच देशाच्या सीमासुरक्षेतेसाठी देखील उपयोग होत असतो.

असा हा भूगोल अनेक क्षेत्रात उपयोगी पडणारा आणि त्यामधे नोकरी – व्यवसायाच्या संधी असणारा. यामधील काही संधी – कारटोग्राफी (cartography) – नकाशे बनवणाऱ्या व्यक्ती, सव्‍‌र्हेअर – भूमापन, सर्वेक्षण करणे,  ड्राफ्टर, शहर नियोजन, शासकीय कर्मचारी – केंद्र किंवा राज्य सरकारच्या भूविकास, भूनियोजन, भूमापन, भूजलविकास विभाग,  जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) स्पेशालिस्ट, क्लायमेटोलॉजिस्ट – हवामानतज्ञ, वाहतूक व्यवस्थापक, पर्यावरणीय व्यवस्थापन, पर्यटन , डेमोग्राफर – केंद्रीय जनगणना कार्यालय. जी.आय.एस, जी.पी.एस यामधे झालेली प्रगती व त्याची गरज आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही. यावरुन भूगोल विषयाचे महत्व अधोरेखीत होते.

चौदा जानेवारी म्हणजे सूर्याच्या संक्रमणाचा दिवस. मकर संक्रातीचा दिवस यापलीकडे जाऊन तो भूगोल दिन म्हणून साजरा होतो, याची जाणीव सर्वांना व्हावी ही इच्छा. नाही तर आपला भूगोल फक्त प्लस्टीकचा वापर टाळा किंवा गुगल मॅपवर लोकेशन लावण्या पुरताच मर्यादित असतो आणि बाकी सगळा गोल… असं नको व्हायला, म्हणून हा प्रपंच.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments