सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ मालगुडी डेज… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
1985,86 चा काळ खुप भन्नाट काळ कारणं ह्या वर्षात यवतमाळात आमच्या घरी टिव्ही चे आगमन झाले. ह्या टिव्ही ने सगळ्यांना खिळवून ठेवले होते बघा. जरी वडीलधारी मंडळी ह्या टिव्ही ला इडियट बॉक्स म्हणत असले तरीही ते सुद्धा ह्याच्या समोर ठाण मांडून बसत असत. अर्थात त्या वेळेचे कार्यक्रम पण एकत्रितपणे बघायच्या लायकीचे असायचे म्हणा.
त्यावेळी माझ्या आवडत्या मलिकांपैकी एक मालिका म्हणजे “मालगुडी डेज”.म्हणजेच मालगुडी डेज ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. ह्या मालिकेचे सगळंच अफलातून होत, त्याचे कथानक, मालिकेचे शिर्षक गीत,त्या त्याचे चित्रणआणि त्यात काम करणारे कलाकार. असं वाटायचं ह्यातील एक जरी डावें पडले असते तरी ही मलिका परिपूर्ण न वाटता कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटले असते.
ही मालिका आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज नावाच्या इ.स. १९४३ च्या लघुकथा संग्रहावर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी केले होते. कर्नाटक संगीतकार एल. वैद्यनाथन यांनी स्कोअर तयार केला, तर आरके नारायण यांचा धाकटा भाऊ आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे रेखाटन कलाकार होते. ही मालिका चित्रपट निर्माते टीएस नरसिंहन यांनी बनवली होती. ही मलिका बघुन कित्येकांना मालगुडी हे गाव, स्थान काल्पनिक आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. भारतीय रेल्वेने मालगुडी डेज मालिकेच्या स्थानाला आदरांजली म्हणून भारतातील शिमोगा, कर्नाटक मधील अरसालू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मालगुडी रेल्वे स्थानक ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
ह्या मालिकेतील कथांचे लेखन आर. के. लक्ष्मण.
हे एक भारतीय इंग्रजी साहित्याचे कसदार लेखन करणारे प्रतिभावान लेखक तर होतेच शिवाय अतिशय मानाचे समजण्यात येणारे साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण ह्याचे मानकरी होते. आज त्यांचा स्मृतिदिन.
आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट ‘दि गाईड’ यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला.
आर के नारायण यांचा स्मृतिदिन १३ मे रोजी झाला. मालगुडी डेज सारख्या मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्यात.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈