☆ विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग २ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

त्यातली एक कथा तर मला फारच आवडली. शंकर सगळीकडे संचार करणारा…त्यामुळे  त्याला नाना प्रकारच्या चवदार अन्न पदार्थांची  माहिती असे.

देवी पार्वती म्हणजे हिमालयाची राजकन्या, तिला कुठला स्वैपाक येणार!   शिवाय खाणारे गणेश कार्तिकेय आणि भूतगण म्हणजे जबरे.. त्यामुळे ती आपली दही भात, रोट्या किंवा लचका यापैकी एखादाच पदार्थ पण भरपूर प्रमाणात करे.

शंकराला एकदा कुठेतरी पुरण पोळ्याचा नैवेद्य खायला मिळाला.  झाले,  त्यानी आणि नंदीने कैलास पर्वतावर.. त्या पोळ्यांचे असे काही वर्णन केले की गणेशबाळ आणि कार्तिकेय तर नाचायलाच लागले.  मग पार्वतीने नंदीला पुरणपोळीची कृती विचारायला पिटाळले.  त्याने काहीतरी धांदरटपणाने अर्धवट ऐकून काहीतरी सांगितले. .तरी पार्वतीने. मोठ्या पातेल्यात डाळ शिजवायला ठेवली,  त्यात साखर घालून पुरण शिजवले..त्यात त्या पोरांनी येता जाता भरपूर सुका मेवा ओतला.  .त्यामुळे  पोळ्या काही जमेनात. गणेश तर रडायलाच लागला मग कार्तिकेयाने युक्ती करून पुरण कणकेत भरुन ते गोळे तळायला सांगितले.  तेव्हापासूनच गणपतीला मोदक आवडायला लागले.

ते तळलेले मोदक सगळ्यांनी खाल्ले खरे पण शंकर नंदीला म्हणाले…,  ” पुरणपोळी नाही जमली तुमच्या मातेला..शेवटी मोदक खायला घातला… ” असे म्हणून हसू लागले.  पार्वतीला राग आला. दुस-या दिवशी तिने पुन्हा  पुरणाचा घाट घातला, पोरांना तिथे फिरकायचे नाही अशी सक्त ताकीद केली.   पहिली पोळी नंदीला खायला घातली,  नंदी बिचारा काहीच बोलला नाही.  गणपती,  कार्तिकेय आणि भूतगण तर काय काहीही खायचे…त्यांना सगळेच आवडायचे.. पण शंकराने मात्र पार्वतीची खूप चेष्टा केली.  पार्वतीला पहिल्यांदा राग आला पण नंतर तिला वाईट वाटले.

मग तिने  स्वतःच्या अन्नपूर्णा रुपात परत येण्यासाठी ईश्वराची दस-यापासून पाच दिवस आराधना केली आणि कोजागिरीला ती काशीक्षेत्रात अन्नपूर्णेच्या रुपात प्रगट झाली.

आता ती केवळ दृष्टीने पदार्थातील मर्म जाणू लागली आणि तिच्यासारखा उत्तम रांधणारा त्रिखंडात कोणी उरला नाही.  एवढेच कशाला चांगले रांधता येण्यासाठीही लोक तिची प्रार्थना करू लागले…लग्नामध्ये वधूला तिची आई अन्नपूर्णेची मूर्ती देऊ लागली….

अशा प्रकारच्या गंमतशीर कथा असलेली आणि देवांचे मनुष्य रुप कल्पून गाणी गातात… कथा सांगतात. शेवटी सर्वजण फेर धरून नाचतात.

माळी पौर्णिमेची देवी म्हणजे अर्थातच अन्नपूर्णा…पार्वतीदेवी,  त्या पाच दिवसात तिची,  तिच्या परिवारासह मनोभावे पूजा केली जाते.

वर्षभर खाण्याची ददात पडू नये असे आशीर्वाद मागितले जातात.  दुसर्‍या दिवशी सर्व मंडपी तिथेच धावड्याच्या किंवा मोहाच्या झाडाखाली ठेवून परत घरी जातात.

तिस-या दिवशी पुन्हा नैवेद्य  घेऊन जातात आणि आपापल्या मंडपी आणि एखादी दिवणाल घरच्या अंगणात ठेवण्यासाठी घेऊन येतात…

असे म्हणतात की त्या मंडपात शंकर पार्वती पाखरांच्या रूपात येऊन भाजीपाल्याचे बियाणे ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा धान्याचा साठा संपत आलेला असतो आणि धुवांधार पावसामुळे बाहेर जायची सोय नसते त्यावेळी अंगण भरून रानभाज्या उगवतात.  भूकेची आणि औषधाचीही तरतूद झालेली असते.

ता.  क.  मराठवाडा आणि विदर्भातील काही खेडेगावात मातीच्या शिड्या करून त्यावर या दिवसात पणत्या लावतात, तिथे कोजागिरीला ‘माडी पौर्णिमा’ असेही म्हणतात.

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments