सौ शालिनी जोशी
विविधा
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा… ☆ सौ शालिनी जोशी ☆
संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्या समकालीन संत महदंबा. यांचा काळ इसवी सन १२४२ ते इ.स.१३१२. या चक्रधर स्वामींच्या शिष्या होत्या. यादवांच्या शेवटच्या काळातील मराठी संत चक्रधर आद्य – क्रांतिकारक, समाजसुधारक होते. सर्व धर्मातील व पंथातील महत्त्वाच्या गोष्टी निवडून त्यांनी महानुभाव पंथाची उभारणी केली. समानतेला महत्त्व दिले. त्यामुळे शूद्र व स्त्रिया आकर्षित झाले.मासिक धर्म,सोयरसुतक, अस्पृश्यता याला त्यांनी विरोध केला. लोकभाषेत पंथाचा प्रसार केला.
महदंबा या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसगाव येथील वायेनायके या दशग्रंथ ब्राह्मणाची मुलगी होत्या.वायेनायके हे प्रतिष्ठित व सुस्थितीतले होते. त्यांच्यामुळे महदंबा यांना परमार्थाची गोडी लागली. त्या प्रज्ञावंत विदूषी झाल्या. एका वादात परप्रांती विद्वानाना जिंकून त्यांनी जैतपत्र मिळवले. तेव्हा राजाने त्याना पाच गावे इमान दिली होती. महदंबा बालविधवा असल्याने माहेरीच राहत असत. प्रथम वडिलांच्या संमतीने त्यानी दारूस नावाच्या एका साधू पुरुषाचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे धर्माचे संस्कार अधिक बळकट झाले. संत चक्रधर हे दारूचे गुरु. त्यामुळे महदंबांची व चक्रधर स्वामी यांची ओळख झाली.
संत चक्रधरांचे विचार महदंबाना पटले. त्या अभ्यासू व बुद्धिमान होत्या. त्या काळात स्त्रियांची स्थिती पशुपेक्षा केविलवाणी, त्यात विधवेचे जीवन म्हणजे शापच. पण महानुभाव पंथातील स्त्रियांना मिळणारी माणूसपणाची वागणूक आणि पुरुषांच्या बरोबरीचे स्थान यांनी महादंबेचे मन जिंकले. त्यांनी चक्रधरांकडे घेऊन वडिलांच्या मनाविरुद्ध संन्यास घेतला. सर्व संत स्त्रियात संन्याशी या एकट्याच होत्या. हिंदू धर्मातील गोत्र,जात, कुल यांना तिलांजली देऊन हिंदू विरोधी मानला गेलेल्या पंथात त्या सामील झाल्या. वैराग्य आणि मनोनिग्रह यांच्या जोरावर वेगळी वाट यशस्वीपणे चोखाळली. पंथातील अनेक स्त्रियांना साधले नाही ते करून दाखवले. पंथाचे कडक आचारधर्म, मठाचे नियम, शिस्त, भिक्षा धर्म हे सगळं त्यानी स्वीकारलं. संन्यास वेश त्यांनी धारण केला. चक्रधर स्वामींच्या पट्ट्य शिष्या झाल्या.त्या आद्य कवियत्री ठरल्या.
लग्नप्रसंगी म्हणावयाची रसाळ अशी गाणी त्यांनी रचली. त्याला धवळे किंवा धवळगीत म्हणतात.
‘कासे पितांबर l कंठी कुंदमाळा l कांतु शोभे सावळा l रुक्मिणीचा l’
अशा या रचना. त्यानी रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. त्यांच्यासाठी गुरु आणि देव कृष्ण एकरूप झालेले. दोघांचा उल्लेख त्यांच्या काव्यात येतो. अशा प्रकारे भक्तीने ओथंबलेल्या पण भाबडी अनुचर नव्हत्या . तर विचारी, जिज्ञासू आणि करारी होत्या .पंथाची धुरा वाहण्यास समर्थ होत्या.लीलाचरित्र हा महानुभावांचा श्रेष्ठ ग्रंथ. महदंबांच्या प्रश्नांना उत्तरे देता देताच या ग्रंथाचा बराचसा भाग तयार झाला. ७० व्या वर्षी गुरुस्मरणात त्यांनी देह सोडला.
चित्र साभार : संत महदंबा यांची संपूर्ण माहिती मराठी – sant sahitya – charitra mahiti abhang gatha granth rachana –
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈