सौ शालिनी जोशी
विविधा
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ५ – संत कान्होपात्रा… ☆ सौ शालिनी जोशी ☆
पंढरपूर जवळील मंगळवेढा हे संतांच गाव. संत दामाजी, संत चोखामेळा या मंगळवेढ्याचे होते. येथेच १५ व्या शतकात शामा गणिकेचे पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला. चिखलात उमललेले कमळच हे. अप्रतिम लावण्य आणि गोड गळा तिला लाभला होता. साहजिकच आपलेच काम आपल्या मुलीने करावे अशी तिच्या आईची इच्छा होती. पण पूर्व पुण्याईने कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाची ओढ होती. तिला नृत्य, गायन शिकवणारे गुरुजीही भजने शिकवत असत. त्यामुळे सतत हरिनामात दंग राहणे हाच तिचा छंद झाला. सौंदर्यामुळे मोठमोठ्या सावकारांच्या तिला मागण्या येत असत, पण ती नकार देत असे. त्यामुळे तिचा छळही झाला.
शामा नायकिणीने चिडून तिला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले. पण विठ्ठलाच्या कृपेने तिच्यासाठी तो एकांत ठरला. ती अखंड नामस्मरणात गुंतली. एकादशीचा दिवस होता. वारकऱ्यांचे अभंग ऐकून तिला स्वस्त बसवेना. तिने खिडकीतून उडी मारली आणि वेश बदलून वारीत सामील झाली. हातात वीणा घेऊन वारकऱ्यांबरोबर पंढरीला पोहोचली. चंद्रभागेत स्नान करून, नामदेव पायरीचे दर्शन, घेऊन राऊळी धावली. देहभान विसरून, विठ्ठलाचे अनुपम रूप तिने डोळ्यात साठवले. चरणाला मिठी मारली. नामभक्ती सांगताना ती म्हणते,
घ्यारे घ्यारे मुखी नाम l अंतरी धरोनिया प्रेम ll
माझा आहे भोळा बाप lघेतो ताप हरोनी ll
कान्होपात्रीने मंगळवेढ्याहून पंढरपूरला दर्शनासाठी येण्याचे धाडस केले. ती परत मंगळवेढाला गेली नाही. उलट तीच विठुरायाला प्रश्न करते,
‘पतित पावन म्हणविसी आधी l
मग भक्ता मागे उपाधी कां बरे लावतो?ll’
नामस्मरणातून सुरू झालेल्या कान्होपात्रेचा प्रवास अनुभूती पर्यंत पोहोचला. पांडुरंगाच्या चरणी ती आनंदाने विसावली. कान्होपात्राचे अप्रतिम सौंदर्य बिदरच्या बादशहाच्या कानावर गेले होते. ती लावण्यवती आपली अंकित असावी, अशी ईर्षा बादशहाच्या मनात निर्माण झाली. कान्होपात्रा पंढरपूरला आहे हे कळतात तिला नेण्यासाठी बादशहाचे शिपाई आले. कान्होने मंदिराचा आश्रय घेतला. सरदार शिपायानी मंदिरापर्यंत तिचा पाठलाग केला. मंदिराच्या व्यवस्थापकांना मंदिर ताब्यात घेण्याची धमकी दिली. तेव्हा मंदिर उध्वस्त होण्यापेक्षा मी यवनांसोबत जाते. अशी तयारी कान्होपात्रेने दर्शविली. आणि शेवटचे म्हणून विठ्ठलाच्या चरणावरती डोके ठेवले. तिच्या शुद्ध, अनन्य भावभक्तीला भगवंत पावला. तिची आळवणी ऐकून तिला सगुण रूपात दर्शन दिले. निर्भय केले. पाहता पाहता कान्होपात्रा अदृश्य झाली. दोन चैतन्ये एक झाली. उरले ते शुष्क कलेवर. भक्तीत अडसर आणणाऱ्या यवनाला हात हलवत जावे लागले. त्याप्रसंगी तिने केलेला विठ्ठलाचा धावा,
नको देवराया अंत आता पाहू l प्राण हा सर्वथा जाऊ पाहेll१ll
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले l मजलागी झाले तैसे देवा ll२ll
मोकलून आस झाले उदास l घेई कान्होपात्रेस हृदयांतरी ll३ll.
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी l धावे हो जननी विठाबाई ll ४ll
आपल्या अनन्य भक्ताची आळवणी भगवंतापर्यंत पोहोचली. भगवंताने आपले ब्रीद खरे केले. पंढरपूरच्या मंदिराच्या दक्षिण दरवाजात तिला पुरण्यात आले. तेथे एक तरटीचा वृक्ष उगवला. कानोपात्रीच्या भक्तीची व संतत्वाची ग्वाही तो देतो. त्या झाडाखाली तिची छोटीशी मूर्ती आहे. मंगळवेढा गावात तिचे छोटेसे देऊळ आहे.
अशाप्रकारे कान्होपात्रेचे आयुष्य अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. तिचा शेवटही तसाच थरारक. जन्मजात प्राप्त झालेले उपभोग्य म्हणून जगणे तिने नाकारले. तिने स्वतःची वारकरी संप्रदायातील स्त्रीभक्त, अभंग रचनाकार अशी नवी ओळख निर्माण केली. तिच्या नावे ३३ अभंग आहेत. वारकरी संप्रदायाने तिला मान दिला. कान्होजी संत कान्होपात्रा झाली. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीचे वातावरण नाही. तरीही केवळ भक्तीने तिने ईश्वराजवळ स्थान मिळवले. तोच तिचा सखा, मायबाप, बंधू, भगिनी आणि तारणहार झाला. ‘दिनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती बाही’ दिनोद्धार करावा असे वेदच सांगतात. त्यामुळे मी कुळहीन असले तरी मला भक्तीचा अधिकार आहे. भक्ती मधून स्वतःचा उद्धार करावा असे वेदांत सांगितले आहे. अशी भूमिका घेऊन कान्होपात्रेने भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतला. पतीताना पावन करणाऱ्या विठ्ठलावर सर्व भाग टाकून निष्काम भावनेतून भक्ती केली. भक्तीचे बळ यवन बादशाहालाही कळलं.
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈