सुश्री संगीता कुलकर्णी
☆ विविधा ☆ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक.. महाराष्ट्री प्राकृतचे एक आधुनिक रूप… मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून केलेला दिसून आलेला आहे.. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्वही प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भरही पडत आहे..
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मराठीने फडकवले अटकेपार निशाण
माय मराठीच आहे जगाचा अभिमान
मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी १ जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात येतो..
मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राची खरी ओळख व महाराष्ट्राची संस्कृती असं म्हटले तरी काही वावग ठरणार नाही.. मराठी भाषेचा गोडवा,भाषेची संस्कृती त्यांचे महत्व अगदी जगभरात पोहोचले आहेत. महाराष्ट्रात बाहेरून येणारा प्रत्येक माणूस मराठी भाषा ही कळत नकळतपणे का होईना पण शिकतोच आणि बोलतो सुद्धा..
एखाद्या पर्यटनस्थळाच्या त्या त्या ठिकाणचा उत्सव, त्या त्या पर्यटनस्थळाचा इतिहास, त्याचा भूगोल, आजूबाजूचा परिसर, अश्या विविध गोष्टींचे महत्व आपल्याला माहितीतून समजतो त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि तिचं महत्त्व, तिचा इतिहास, तिच्या विविध बोली, तिचं साहित्य, हजारो मराठी पुस्तके- ग्रंथ, ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेली माहिती, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकताना त्याचे होणारे फायदे, तिच्या समोरची आव्हाने, काळानुरूप नवं स्वीकारण्याची तिची ताकद या आणि अश्या अनेक गोष्टींवर लोकांनी एकत्र यावं, त्यावर चर्चा करावी तिचं महत्त्व जाणून घ्यावं, तिचा प्रचार-प्रसार करावा आणि अश्या दैदीप्यमान इतिहास लाभलेल्या या मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा हा शासनाचा मराठी भाषा पंधरवड्यामागे मुख्य हेतू आहे..
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे अतिशय मोलाचे आहे कारण आपण महाराष्ट्र राज्यात राहतो तो आपल्याला मराठी होण्याचा गर्व आहे. मग मराठी भाषा जतन करणं हे तर आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण शिक्षकवृंद विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषा विषयी प्रेमाचे जतन करू शकतो.
ह्यासाठी आपण अनेक माध्यमातून मराठी भाषेचे जतन करू शकतो. उदा. द्यायचेच झाले तर..मराठी भाषा पुस्तक दिंडी काढणे, मराठी भाषेवर कवी, साहित्यिक, ई. यांचे व्याख्यान आयोजन करणे, मराठी भाषेवर निबंध स्पर्धा, मराठी भाषा शुद्ध लेखन स्पर्धा, मराठी पुस्तके वाचणे, नामांकित लेखिका व लेखक यांच्या पुस्तकांचे अभिवाचन करणे, पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे, मराठी भाषेत शुभेच्छा पत्र तयार करणे, वकृत्व स्पर्धा, मराठी गीत गायन स्पर्धा, मराठी भाषेचे विविध साहित्यिक,कवी,लेखक, लेखिका यांची समग्र माहिती देणे, तसेच मराठी भाषा – कथा कथन इत्यादी..असे विविध उपक्रम राबवून व अनेक प्रकारांनी आपण मराठी भाषेसाठी प्रचार व प्रसार करू शकतो..
महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक वैविध्य जपत मराठी भाषेमध्ये मोठी वैचारिक संपदा निर्माण झाली आहे. विविध लोककला,नाटक, कविता, ग्रंथ असे अनेकानेक उत्तमोत्तम साहित्य लिहिले गेले.. ही वैचारिक संपदा जपण्यासाठी, मराठीचे वैभव वाढविण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे मी इथे मनापासून नमूद करीन..
खरे तर आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची.. मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची नाही का.. !
जसं वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो आणि वर्षभर त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो अगदी त्याचप्रमाणे एक जानेवारीला भाषिक संकल्प करण्यास काहीच हरकत नाही… हो ना…!!
© सुश्री संगीता कुलकर्णी
ठाणे
9870451020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
तुमच्या तारखा चुकलेल्या आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दर वर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा होतो. कृपया आवश्यक ते बदल करावेत.
–
कळावे
धन्यवाद