☆ विविधा ☆ मकर संक्रांत ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

काय आल डोळ्यासमोर मस्त गोल गोल तिळाचे लाडू ना?? आहाहा…. छान गोल आणि गोड त्यात मधेमधे डोकावणारे दाणे आणि वेलदोड्याचा सुवास.

चिक्की गूळापासून बनवलेले लाडू तर अफलातून लागतात. ते असे जेव्हा दाताला चिकटतात तेव्हा ते ओढत खायला खूप मजा येते. एकजीव झालेले तीळ आणि गूळ ह्यांचा खमंग वास कसा घरभर दरवळतो.

काहीजणांना मात्र मऊ वडी आवडते खोबरे आणि दाण्याच कूट घालून केलेली. तोंडात सहज विरघळणारी, पण ती खाण्यात गंमत नसते.

त्याच बरोबर गुळपोळीही आपली उपस्थिती लावते. खमंग खुसखुशीत.. त्यातला गूळ, खोबरे, बेसन पीठ, तिळ कूट, खसखस, जायफळाची पूड दाण्याचे कूट कसे छान एकजीव होते . ही पोळी खाऊन आपले मन कसे तृप्त होते आणि डोळ्यांवर अनावर झापड येते आणि नकळत आपण झोपेच्या स्वाधीन होतो.

गुळपोळी कमी म्हणून की काय,  ती बाधू नये म्हणुन काही जण त्याबरोबर गाजराची खीर खातात. म्हणजे भर दुपारी मध्यांरात्र ही ठरलेली.

दुपार सरते ना सरते तो वर बालगोपाळ वर्दी लावतात आणि तिळगूळ वाटप कार्यक्रम सुरू होतो. छान नटूनथटून गोपाळ कृष्ण, राधा घरी येतात आणि घराचे गोकुळ बनवून जातात. प्रत्येकाच्या हातात असतात छान छोट्या छोट्या वेगवेगळ्या आकाराच्या डब्या.  त्यातून तिळगूळ वाटप करताना खरतर निम्म्याहून अधिक पोटात जात असतो ते वेगळेच.

त्यात घरचे हळदीकुंकू ठरले असेल तर मग काय पहायलाच नको.

एकूण काय हा सण प्रत्येकासाठी काहीना काही तरी वेगळी आठवण घेऊन आलेला असतो.

नवदांम्पत्यानसाठी तो आनंदाचा सण असतो, बाळगोपाळांना बोरन्हाण साजरं करायचं असतं, घराघरातून तिळगूळ वाटायचा असतो, बायकांना मोठा हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करायचा असतो, तर काहींना निव्वळ तिळाची वडी तिळगूळ आणि गुळपोळी खायला मिळते म्हणून हा सण साजरा करायचा असतो.

मकर संक्रांतीला सूर्यनारायण देव मकर राशीत म्हणजेच आपल्या मुलाच्या शनिच्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे शनी देव ह्या महिन्यात विशेष आनंदात असतात.

आणखीन एका गोष्टीला कधी नव्हे ते ह्या महिन्यात महत्त्व येते ते म्हणजे काळ्या रंगाला. जिच्या तिच्या अंगावर काळ्या रंगाची साडी दिसू लागते. अनेक महिने कपाटात रुसलेली साडी आनंदाने बाहेर डोकावू लागते. अगदी काळी पैठणी सुद्धा आपला रुबाब दाखवून जाते.

त्या एका काळ्या रंगात सुद्धा किती त्या छटा पहायला मिळतात म्हणून सांगू. ब्लॅकजेट,चारकोल ब्लॅक, स्टोन ब्लॅक, बापरे बाप. काळ्या रंगाला पण इतक्या रंगछटा असतात ते ह्या सणा निमित्ताने समजते.

असा हा अनेक तर्‍हेने नटलेला आणि सजलेला सण सगळ्यांनसाठी आनंदाचा असतो.

मला एवढेच वाटतेकी जसे गूळ तिळाला घट्ट धरून ठेवतो, जशी गुळपोळी सार्‍या पदार्थांना एकत्र आणते, जसा तिळगूळ आपली गोडी घरा घरातून पोचवतो, तसाच स्नेह, जिव्हाळा आपुलकी आपल्या प्रत्येकाच्या मनात असुदे. पतंग जसा आकाशात उंच भरारी घेत नवचैतन्य , नवे ध्येय घेऊन उंच नभात विहार करतो तसाच नवे ध्येय, नवे चैतन्य आपण आपल्या मनात रुजवू आणि आनंदाने हा सण गूळ पोळीचा आस्वाद घेत साजरा करू.

सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

तिळगूळ घ्या गोड बोला ??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments