सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ मराठी भाषा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कवीवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि. वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना नितांत सुंदर अशीच आहे.. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवरून सन्मान देण्यासाठी सन २००० पासून २१ फेब्रुवारी हा ” आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ” साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. या दोन्ही सुदिनाचे औचित्य साधून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस आपल्या मायबोलीच्या सन्मानाचे आहेत.

माझ्या मराठी मातीचा

लावा ललटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

द-याखो-यातील शिळा

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे… भारतभरात आपापल्या संस्कृतीप्रमाणे आणि जातीधर्मा प्रमाणे भाषा बोलल्या जात असल्या तरी देखील माझ्या मराठी भाषेत जो गोडवा सामावलेला आहे त्याची सर इतर कुठल्याही भाषेला नाही…काना, मात्रा, वेलांटी, आकार, ऊकार या सर्वांचा साज लेऊन मराठी पुढे येते त्यावेळी तिचे सौंदर्य काय वर्णावे ?

मराठी भाषा परिपूर्ण माधुर्याने शब्दविलासाने नटलेली, विविध बोलींचे लेणे घेऊन आलेली, साहित्यिकांच्या लेखणीने समृद्ध केलेली मराठी भाषा आपल्या सर्वांचाच मानबिंदू आहे. मराठी भाषेला जो लहेजा आहे तो अन्य कुठल्या भाषेला आहे?  मराठी भाषा वळवावी तशी वळते…एवढा लवचिकपणा कोणत्या भाषेत आहे. आपल्या मराठी भाषेला बोलीभाषांचे ऐश्वर्य लाभलेले आहे. एक ना अनेक अशी कितीतरी वैशिष्ट्ये आपल्या मराठी भाषेची आहेत…

मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात,कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मराठी भाषा एक अमूल्य अशी देणगी आहे. सौंदर्य, माधुर्य आणि विविधतेने/ विविधता यांनी नटलेली..

मराठी भाषा म्हणजे काय ? असा जर कुणी प्रश्न विचारला तर माझे उत्तर असेल… मराठी म्हणजे ज्ञानोबांची ओवी, तुकोबांची वाणी, छत्रपतींची तलवार आणि चक्रधरांचे भाषण धारदार…

मराठी म्हणजे एकनाथांचे भारूड, नवनाथांचे गारुड,, संताजी- धनाजींची स्फूर्ती, सावरकरांची किर्ती, मराठी महन्मंगलम मूर्ती शारदेची…साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून- थटवून सुंदर केलं. आचार विचारांच्या परंपरांनी संस्कृतीची जडणघडण ही केली.

स्वर्गे अमृताची गोडी

चाखून पहा थोडी

वाटे फुलांची परडी

माझी माय ही मराठी

मराठी राजभाषा दिन साजरा करताना मराठी भाषेचे संवर्धन आणि जोपासनेची धुरा अभिमानाने पुढे नेऊया..

सन्मान मराठीचा

अभिमान महाराष्ट्राचा

मराठी भाषा ही खूप श्रीमंत भाषा आहे. तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. ती संतांच्या किर्तने भजन भारूडांनी सजली आहे. आपली मराठी भाषेची सुंदरता आणि संपत्ती ही समजून घ्यावी लागेल आणि समजून द्यावीही लागेल…

मराठीचा ” म” या अक्षरात मी, माझी मराठी, मायबोली अश्या सर्व ” म” कारात मी, माझे, महान, मानसन्मान असे सर्व  ” म” सामावलेले आहेत. म्हणूनच आम्ही बोलतो मराठी असे आमुची मायबोली..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments