सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ मा. द. मा. मिरासदार यांस… ☆ सौ राधिका भांडारकर  

माननीय प्रिय द.मा.मिरासदार यांस,

स.न.वि.वि…

आदरणीय लेखकमहाशय,या क्षणी तुम्हाला संबोधताना,कै. द.मा. मिरासदार असे लिहीताना हात थरथरला म्हणून कै.  हे संबोधनात्मक अक्षर मी टाळले.

कालच तुमच्या निधनाची बातमी ऐकली आणि एक दु:खाची लहर सळसळून गेली.मृत्यु अटळ.मृत्यु सत्य.

तुम्ही चौर्‍याण्णव वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून, लोकांना हसवत, हसत जगाचा निरोप घेतलात. मात्र आमच्यासाठी ,प्रचंड हास्य तुमच्या लेखन प्रपंचातून  ठेवून गेलात….. तुमच्या निखळ हास्यकथा वाचतच खरं म्हणजे आम्ही वाढलो. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. तुम्ही १९६२ सालापासून, महाराष्ट्रात आणि परदेशातही ठिकठिकाणी, कथाकथनाचे कार्यक्रम केलेत आणि आम्हा श्रोत्यांची अपार करमणूक केलीत. ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून, हातवारे करुन तुम्ही बोलू लागलात की एक अद्भुत नाट्यच अनुभवायला मिळायचे.

मराठीतील, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं वि जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांची विनोदी लेखन परंपरा आपण चालू ठेवलीत. व्यंकुची शिकवणी,  माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, माझी पहिली चोरी,भूताचा जन्म अशा अनेक हास्यकथांचे उत्कृष्ट लेखन आणि तितकंच प्रभावी सादरीकरण हे श्रोत्यांना ,चिंता समस्यांपासून दूर नेउन मनमोकळं हंसणं

देत…या सर्वच कथा मनावर कोरलेल्या आहेत.

विसंगतीतून निर्माण होणारा विनोद नेहमीच ऐकणार्‍याला ,जीवनाचा एक सकारात्मक दृष्टीकोन देतो.

एखाद्या घटनेकडे कधी तटस्थपणे,कधी हसत खेळत. विनोदी अंगाने बघायला शिकवतो.यश ,अपयश पचवायची ताकद देतो. द.मा.,तुमच्या लेखनाने हे केले.

आम्हाला समृद्ध केलंत तुम्ही…खूप ऋणी आहोत आम्ही तुमचे…

गप्पागोष्टी, मिरासदारी,गुदगुल्या ,गप्पांगण ,ताजवा असे २४कथासंग्रह तुम्ही आम्हाला दिलेत.एक डाव भूताचा

ह्या  गाजलेल्या चित्रपटाची कथा तुमचीच.त्यातली तुमची हेडमास्तरांची भूमिकाही मनावर ठसली.

तुमच्या बहुतेक कथा ,ग्रामीण जीवनावरच बेतलेल्या आहेत.गणा मास्तर,नाना चेंगट,राम खरात,बाबु पेहलवान,

चहाटळ अनशी,ज्ञानु वाघमोडे अशा एकाहून एक ,गावरान,इब्लीस,बेरकी,वाह्यात ,टारगट क्वचित भोळसटही  पात्रांनी आम्हाला पोट धरुन हसायला लावले आहे.या सर्व पात्रांना आमच्यासाठी एक निश्चित चेहरा दिला.हे सारे चेहरे आमच्या आयुष्याच्या वाटचालीत

हसत हसत सामील झाले.आमचे सोबती बनले.मनुष्य स्वभावाचे,इच्छा आकांक्षाचे, छोट्या छोट्या स्वप्नांचे ,

मनोर्‍यांचे, इमल्यांचे आरसे बनले.भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे ,कावेबाजपणाचे, लबाडीचे

धूर्त राजकारणाचे ,धडे दिले.सर्वार्थाने अचंबीत झालेल्या सर्वसाधारण सामान्य माणसाकडे पहायलाही शिकवलं.

काही गंभीर कथाही तुम्ही लिहील्यात.जसं की ,विरंगुळा

कोणे एके काळी , स्पर्श वगैरे.त्यांतून जीवनातले कारुण्यही तुम्ही  अचूक टिपलेत.पण तरीही तुमचा स्वाभाविक कल हा मिस्कील ,विनोदी लेखनाकडेच राहिला.तिथेच बहरला.

पुण्याच्या साहित्य संमेलनात तुम्ही तुमची ‘भुताची गोष्ट’

ऐकवली होती.सतत दीड तास श्रोतृवर्ग हास्यकल्लोळात डुबला होता.एकेक पात्र रंगतदारपणे डोळ्यासमोर ऊभे केले.तुमच्या आवाजातले चढउतार,कथा फुलवण्याची जबरदस्त क्षमता,नाट्यमयता, अभिनय सारेच सर्वांग सुंदर होते..त्यावेळीही तुमचे वय ऐंशी अधिकच होते…

सलाम तुमच्या कलेला. सलाम तुमच्या लेखनाला…

वि. रा. भाटकर हे विनोदी गद्यप्रकार लिहीणारे… तुमचेच टोपण नाव  होते.

द.मा. भरभरुन दिलंत तुम्ही आम्हा साहित्यप्रेमींना…

खूप  हसवलंत. बोधप्रद करमणुक केलीत .ज्ञानातून मनोरंजन केले.एक मोठ्ठा साहित्य ऐवज आमच्यासाठी ठेवून गेलात….आम्ही खूप कृतज्ञ आहोत!!खूप ऋणात आहोत.

आज तुमच्या अचेतन देहावर भावपूर्ण श्रद्धांजलीचे फुल वाहते!!!

 

तुमची एक

लेखनवेडी,..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments